अजित पवार मोदी सरकारवर संतापले…

अजित पवार मोदी सरकारवर संतापले…

केंद्रात भाजपाचं सरकार (central government) आल्यापासून देशात एकता, अखंडता आणि सर्वधर्मसमभावाच्या विचारांना धक्का देण्याचं काम सुरु आहे. लोकशाही व्यवस्था आणि राज्यघटनेला झुंडशाहीचे धक्के देऊन मोडून काढण्याचा प्रयत्न सुरु असून हे गंभीर आहे अशी टीका राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली आहे. राष्ट्रवादीच्या २२ व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी त्यांनी तौक्ते चक्रीवादळामुळे झालेलं नुकसान, मराठा आरक्षण अशा अनेक मुद्द्यांवर भाष्य केलं.“भाजपाच्या विचाराचं सरकार आल्यानंतर देशात एकता, अखंडता आणि सर्वधर्मसमभावाच्या विचारांना धक्का देण्याचं काम सुरु आहे. लोकशाही टिकवून ठेवणाऱ्या संस्था मोडीत काढल्या जात आहेत. लोकशाहीचा चौथा स्तंभ असणाऱ्या पत्रकारितेची अवस्था गंभीर आहे. सगळे पत्रकार एकाच सुरात, भाषेत कसं ट्वीट करतात हे पाहिल्यामतर लोकशाही संकटात असलेली भीती निर्माण होते,” असं अजित पवार यांनी म्हटलं आहे.“लोकशाही व्यवस्था आणि राज्यघटनेला झुंडशाहीचे धक्के देऊन मोडून काढण्याच प्रयत्न सुरु असून हे गंभीर आहे. लोकशाही आणि राज्यघटना टिकवण्याचं आव्हान आपल्यासमोर आहे. राष्ट्रवादी अशा लोकशाहीविरोधी विचारांविरोधात शक्तीविरोधात ठामपणे उभी राहील,” असा विश्वास अजित पवार यांनी यावेली व्यक्त केला.

“जात पात पंथ भेदभाव न करता राष्ट्रवादीची वाटचाल सुरू आहे. आव्हानं येत असतात. शरद पवारांनी राष्ट्रवादीची स्थापना स्वाभिमानानं केली. राष्ट्र हा व्यापक विचार ठेवून पक्षाची स्थापना केली. अनेक क्षेत्रांत काम करणाऱ्या नेत्यांच्या कार्यकर्त्यांची फळी त्यांनी उभी केली. या सगळ्यांमुळेच पक्षाचा वर्धापन दिन साजरा करतोय,” असं अजित पवार यावेळी म्हणाले.“राष्ट्रवादी महाराष्ट्राच्या मातीशी नातं सांगणारा पक्ष आहे, जनतेशी नाळ जुळलेला हा पक्ष आहे. आज करोनाचं संकट आहे. सरकार स्थापन केल्यावर चार महिन्यात करोनाचं संकट आलं. विरोधक वेगवेगळा प्रचार करतात पण सर्वोच्च न्यायालयानं, मुंबई हायकोर्टानं कौतुक केलं आहे. जगात काय चाललंय हे आपण पाहिलं, तसंच देशात यमुना, गंगेच्या तीरावरील दुर्दैवी चित्र आपण पाहिलं,” असं अजित पवारांनी यावेळी सांगितलं.

“केंद्राचं (central government) सहकार्य मिळवण्याचा प्रयत्न आपण सगळे करत आहोत. पण राष्ट्रवादीचा कार्यकर्ता प्रत्येकवेळी मदतीसाठी बाहेर येतो. आजपर्यंत हा प्रयत्न आपण सगळ्यांनी केला. करोना संकट दूर होईपर्यंत हे करावच लागणार आहे. आव्हानांचं रुपांतर संधीत करणं आवश्यक आहे,” असं आवाहन यावेळी त्यांनी केलं.

user

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *