राष्ट्रवादी काँग्रेस २२वा वर्धापन दिन -राजकीय मुत्सद्दीपणाच्या जोरावर शरद पवारांनी अनेकदा आश्चर्याचे धक्के दिले…

राष्ट्रवादी काँग्रेस २२वा वर्धापन दिन -राजकीय मुत्सद्दीपणाच्या जोरावर शरद पवारांनी अनेकदा आश्चर्याचे धक्के दिले…

राष्ट्रवादी काँग्रेस २२वा वर्धापन दिन साजरा करत आहे. काँग्रेसमधून निलंबित करण्यात आल्यानंतर शरद पवारांनी स्वतंत्र मोट बांधत राष्ट्रवादी काँग्रेसची (political party) बीजं पेरली. तिच राष्ट्रवादी काँग्रेस आज राज्यातील सत्तेत महत्त्वाच्या भूमिकेत वावरताना दिसत आहे. राष्ट्रवादी काँग्रेस हा शरद पवारांचा पक्ष स्थापनेचा दुसरा प्रयत्न होता. त्यापूर्वीही त्यांनी असाच एक प्रयत्न केला होता, मात्र तो फार काळ तग धरू शकला नाही.शरद पवार यांनी आपल्या राजकीय मुत्सद्दीपणाच्या जोरावर राजकीय वर्तुळालाच नव्हे, तर राजकारणाची जाण असलेल्या सर्वसामान्यांनाही अनेकदा आश्चर्याचे धक्के दिले आहेत. २०१९च्या विधानसभा निवडणुकीनंतर आकाराला आलेल्या महाविकास आघाडी सरकारमागे पवारांचं बुद्धीचातुर्य होतं, हे सर्वश्रुत आहे. पण, हा पवारांनी केलेला पहिलाच प्रयोग नव्हता. जनता पक्षाला सोबत घेऊन चालवलेलं पुलोदचं सरकार असो की, काँग्रेसमधून बाहेर पडल्यानंतर त्यांच्यासोबत पुन्हा आणलेलं आघाडी सरकार!शरद पवारांनी १९९९ मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना केली. पण, त्यापूर्वीही त्यांनी काँग्रेसमधून बाहेर पडून वेगळी वाट धरली होती. शरद पवारांनी समाजवादी काँग्रेस नावाचा पक्षही स्थापन केला होता. १९८० मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत समाजवादी काँग्रेसने ५४ जागा जिंकल्या होत्या. या काळात शरद पवार विरोधी पक्षनेते झाले होते. मात्र हा पक्ष १९८६ मध्ये पुन्हा काँग्रेसमध्ये विलीन करण्यात आला. त्यामुळे समाजवादी काँग्रेसच्या निमित्ताने त्यांनी सुरू केली वाट पुन्हा काँग्रेसला जाऊन मिळाली.

त्यानंतर शरद पवारांनी काँग्रेसमध्ये राहून राजकीय कर्तृत्व दाखवलं. पुढे १९९९ मध्ये सोनिया गांधी यांच्या परदेशी नागरिकत्वाच्या मुद्द्यांचा वाद उभा राहिला. याच मुद्द्यावरून शरद पवारांसह पी.ए. संगमा, तारिक अन्वर यांना काँग्रेसमधून सहा वर्षांसाठी निलंबित करण्यात आलं.काँग्रेसनं घेतलेल्या या निर्णयानंतर शरद पवार यांनी पुन्हा एकदा नवी वाट निवडत नवीन पक्षाची मुहूर्तमेढ रोवली, तो पक्ष म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस! १९९९ मध्ये अस्तित्वात आलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसनं राज्यात आपलं अस्तित्व अबाधित राखलं. प्रचंड राजकीय स्पर्धेतही पवारांनी पक्षाला राज्यात वजन मिळवून दिलं. इतकंच नाही तर महत्त्वाची बाब म्हणजे स्थापनेपासून राष्ट्रवादी काँग्रेस (political party) मधला काही काळ सोडला तर सातत्याने सत्तेत आहे.

user

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *