भारतात लसचे ४१ कोटी डोस दिले

भारतात आतापर्यंत कोरोना प्रतिबंधक लसचे

Advertisement
(Vaccines) ४१ कोटी डोस देण्यात आले. यापैकी ३५ कोटींपेक्षा जास्त डोस हे सीरम इन्स्टिट्युटच्या कोविशिल्ड लसचे तर ५.४५ कोटी डोस हे भारत बायोटेक कंपनीच्या कोवॅक्सिनचे आहेत.  जागतिक आरोग्य संघटनेच्या आंतरराष्ट्रीय लसीकरण कार्यक्रमासाठी लस निर्मिती करणाऱ्या मोठ्या निर्मात्यांपैकी एक सीरम इन्स्टिट्युट आहे. यामुळे सीरमकडे लस उत्पादनाची मोठी क्षमता आहे. मात्र कोरोना संकटामुळे संपूर्ण जगात एकाचवेळी लससाठी मोठी मागणी निर्माण झाली. जगातील कोणत्याही कंपनीकडे एवढी प्रचंड मागणी एका वर्षात पूर्ण करण्याची क्षमता नाही. सीरमने लस निर्मिती भारतात करत असल्यामुळे भारतीय नागरिकांच्या मागणीला प्राधान्य देण्याचा निर्णय घेतला.

मात्र विशिष्ट लसची निर्मिती वाढवताना कच्चा माल, निर्मिती प्रक्रिया आणि वितरण या सर्व गोष्टींमध्ये समन्वय आणि सातत्य राखणे आवश्यक आहे. या गुंतागुंतीच्या प्रक्रियेला अंमलात आणण्यासाठी वेळ लागतो. पण मोठी क्षमता असलेल्या सीरम कंपनीसाठी त्यांची लस निर्मिती क्षमता वाढविणे इतर कंपन्यांच्या तुलनेत सोपे होते. यामुळे सीरम इन्स्टिट्युट ऑफ इंडिया या कंपनीने क्षमता वाढवून मोठ्या प्रमाणावर लस निर्मिती सुरू केली आहे. सध्या सीरमचे मासिक उत्पादन ११ कोटी डोसच्या घरात पोहोचले आहे. भारत बायोटेक कंपनीनेही टप्प्याटप्प्याने लस निर्मितीच्या क्षमतेते वाढ करण्यास सुरुवात केली आहे. आतापर्यंत भारत बायोटेक कंपनीचे मासिक उत्पादन अडीच कोटी डोसच्या घरात पोहोचले आहे. सप्टेंबर २०२१ पर्यंत क्षमता आणखी वाढवून भारताला ४८ कोटी डोस पुरवण्याचा प्रयत्न सीरम करत आहे. तसेच भारत बायोटेक कंपनी सप्टेंबर २०२१ पासून दर महिन्याला दहा कोटी डोस एवढ्या प्रमाणात कोवॅक्सिनची निर्मिती करण्यासाठी तयारी करत आहे.

भारत सरकारने ‘आत्मनिर्भर भारत’ अंतर्गत सीरम इन्स्टिट्युट ऑफ इंडिया आणि भारत बायोटेक या दोन्ही कंपन्यांना मोठी आर्थिक मदत दिली आहे. या मदतीच्या जोरावर दोन्ही कंपन्या लस निर्मितीची क्षमता वाढवत आहेत. कोविशिल्ड आणि कोवॅक्सिनचे उत्पादन सुरू असतानाच सीरम रशियाच्या स्पुटनिक व्ही लसचे वर्षाला ३० कोटी डोस भारतात तयार करण्यासाठी तयारी करत आहे. या व्यतिरिक्त भारत सरकारने स्पुटनिक व्ही लसचे ३३ लाख डोस आयात केले आहेत. यामुळे मोठ्या प्रमाणावर लसीकरण करणे शक्य होणार असल्याची माहिती भारत सरकारने दिली.

Advertisement

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *