पुण्यात प्रशिक्षणासाठी गेलेल्या नागपूरच्या 12 पोलिसांना कोरोनाची लागण, पोलीस दलात खळबळ

पुण्यात प्रशिक्षणासाठी  गेलेले नागपूरचे 12 पोलीस कर्मचारी नागपूरला परतताच कोरोना पॉझिटिव्ह  आढळून आले आहेत. यामुळे नागपूर पोलीस  दलात मोठी खळबळ उडाली आहे. पॉझिटिव्ह आढळलेल्या 12 पैकी 9 कर्मचाऱ्यांच्या लसीचे दोन्ही डोस  अनेक आठवड्यापूर्वी झालेले आहेत. नागपुरात कोरोनाचा ग्राफ उतरत असताना बाहेरून नागपुरात परतणारे अनेक जण कोरोना बाधित आढळून आल्याने त्यांच्या संपर्कातील व्यक्तींचे कॉन्टॅक्ट ट्रेसिंग  सुरु करण्याची गरज आहे.

30 ऑगस्टला नागपूर पोलीस दलातील सर्व 31 पोलीस स्टेशन मधील गुप्त वार्ता विभागातील प्रत्येकी एक पोलीस कर्मचारी व विशेष शाखेतील 2 असे एकूण 33 पोलीस कर्मचारी पुणे येथील महाराष्ट्र गुप्तवार्ता अकादमी  येथे 10 दिवसांच्या ट्रेनिंगसाठी गेले होते. ट्रेनिंग आटोपून ते पुन्हा नागपूरमध्ये आल्यावर एका पोलीस कर्मचाऱ्याला ताप व खोकला सारखी सौम्य लक्षणे जाणवली. पोलीस रुग्णालयातील डॉक्टरांनी त्या पोलीस कर्मचाऱ्याला कोरोना टेस्ट करुन घेण्याचा सल्ला दिला. त्यानुसार त्याने कोरोना टेस्ट केली असता ती पॉझिटिव्ह आली.

एका पोलीस कर्मचाऱ्याची कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आल्याने पुण्याला गेलेल्या इतर पोलिसांची कोरोना चाचणी करण्यात आली.पुण्यात गेलेल्या 33 पैकी 20 पोलिसांची टेस्ट करण्यात आली.यामध्ये 12 जणांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला आहे.सध्या पोलीस विभाग महापालिकेच्या मदतीने लक्ष ठेऊन आहे.पॉझिटिव्ह आलेल्या कर्मचाऱ्यांना कुठलाही विशेष त्रास नसून कोरोनाची सौम्य लक्षणे असल्याची माहिती पोलीस अधिकाऱ्यांनी दिली.

Advertisement

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *