देशात कोरोनाची तिसरी लाट केव्हा येणार? किती घातक असणार? BHUच्या शास्त्रज्ञांनी सांगितलं

देशात आलेली कोरोनाची दुसरी लाट ओसरत चालली आहे. मात्र तिसऱ्या लाटेचा धोका कायम आहे. तिसरी लाट थोपवण्यासाठी लसीकरण मोहिमेला वेग दिला जात आहे. याच पार्श्वभूमीवर आशियातील सर्वात मोठं निवासी विद्यापीठ असलेल्या बनारस हिंदू विद्यापीठाच्या जंतू विभागाच्या शास्त्रज्ञांनी केलेल्या संशोधनातून दिलासादायक बाब समोर आली आहे.

गेल्या अनेक दिवसांपासून केरळ आणि ईशान्येकडे असलेल्या राज्यांमध्ये कोरोना रुग्णांची संख्या वाढली आहे. त्यामुळे तिसऱ्या लाटेची शक्यता वाढली. त्यानंतर आता बनारस हिंदू विद्यापीठाच्या शास्त्रज्ञांनी केलेल्या संशोधनातून महत्त्वाची माहिती समोर आली आहे. तिसरी लाट किमान तीन महिन्यांनी येईल. ही लाट रोखण्यात लसीकरण अभियान महत्त्वाची भूमिका बजावेल. कोरोनातून बरे झालेल्या आणि लसीकरण झालेल्या लोकांना सुरक्षा मिळेल. पहिल्या आणि दुसऱ्या लाटेच्या तुलनेत या लाटेत लहान मुलं सुरक्षित असतील, असं संशोधन सांगतं.

कोरोनाची तिसरी लाट अद्याप तीन महिने दूर आहे. ही लाट फारशी घातक असणार नाही, असं बनारस हिंदू विद्यापीठाच्या जंतू विज्ञान विभागाचे प्राध्यापक जानेश्वर चौबे यांनी सांगितलं. ‘केरळ आणि ईशान्येकडच्या राज्यांमध्ये कोरोनाचे रुग्ण वाढले आहेत. केरळमधल्या ४० टक्के लोकांमध्ये सीरी पॉझिटिव्हिटी तयार झाली आहे. उत्तर प्रदेशात ७० टक्के लोकांमध्ये सीरी पॉझिटिव्हिटी तयार झाली होती,’ असं चौबे म्हणाले.

‘केरळमध्ये रुग्णसंख्या एका महिन्यानंतर कमी होईल. तिथली परिस्थिती उत्तर प्रदेशसारखी होईल. आता तिसरी लाट येणार नाही. दर तीन महिन्यांनी एँटिबॉडीचं प्रमाण कमी होईल. तेव्हा तिसरी लाट येऊ शकते. मात्र लसीकरण वेगानं सुरू असल्यानं कोरोनाशी दोन हात करण्यात यश येईल. रोगप्रतिकारशक्ती ७० टक्क्यांच्या वर गेल्यावर कोरोनाचा संसर्ग होण्याची शक्यता मावळेल,’ अशी माहिती चौबेंनी दिली.

Advertisement

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *