लग्नाचा बनाव करत 11 लाखांची फसवणूक

ऑनलाइन विवाह नोंदणी संकेतस्थळावर ओळख झालेल्या एका व्यक्तीने महिलेशी लग्न करण्याचे आमिष दाखवून ओळख वाढवली. त्यानंतर महिलेचा विश्वास संपादन करून तिच्याकडून 11 लाख चार हजार रुपये घेतले. लग्नाचे बनावट प्रमाणपत्र महिलेला पाठवून व्यवसायासाठी तिच्या नावावर 80 लाख रुपये कर्ज काढण्याची मागणी केली. यासाठी महिलेने नकार दिला असता आरोपीने महिलेला धमकी दिली. याप्रकरणी तोतया पतीवर फसवणुकीचा गुन्हा दाखल करीत त्याला बेड्या ठोकल्या आहे.

प्रेमराज थेवराज (रा. सिव्हिलायझेशन कॉलनी, नगनलू पार्ट 1, चेन्नई, तामिळनाडू) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. याबाबत पीडित महिलेने रविवारी (दि. 12) निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. हा प्रकार 27 एप्रिल 2020 ते 11 सप्टेंबर 2021 या कालावधीत संभाजीनगर चिंचवड येथे घडला. फिर्यादी आणि आरोपीची एका विवाह नोंदणी संकेतस्थळावर ओळख झाली. आरोपीने फिर्यादी सोबत लग्न करतो असे सांगून दोन ते तीन महिने फोनवर बोलून फिर्यादीचा विश्वास संपादन केला. आरोपीला पैशांची गरज आहे असे खोटे सांगून फिर्यादीकडून 11 लाख चार हजार पाचशे रुपये घेतले.

लग्न करण्यासाठी आरोपीने फिर्यादी यांना चेन्नई येथे बोलावून घेतले. खोटे बोलून फिर्यादीच्या लग्नाच्या फॉर्मवर सह्या घेतल्या. त्यानंतर फिर्यादी यांना लग्नाचे खोटे प्रमाणपत्र पाठवून तू माझी पत्नी झाली आहे, मला व्यवसायासाठी 80 लाख रुपये कर्ज तुझ्या नावावर काढून दे, अशी आरोपीने मागणी केली. फिर्यादी यांनी त्यास कर्ज काढून देण्यास नकार दिला. त्यावरून आरोपीने फिर्यादी यांच्या आई वडिलांचे बरेवाईट करण्याची धमकी दिली. याप्रकरणी फिर्यादी यांनी पोलिसात धाव घेत गुन्हा नोंदवला. पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.

Advertisement

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *