एटीएमचा सायरन वाजला अन्‌ चोरटे पळाले

गॅस कटरच्या सहाय्याने एटीएम फोडत असताना सायरन वाजल्याने चोरट्यांनी धूम ठोकली. शिवतेजनगर, चिखली येथील युनियन बॅंकेच्या एटीएममध्ये 17 लाख रुपयांची रोकड होती. हि घटना मंगळवारी (दि. 14) पहाटे घडली.

अशोक वाघमारे यांनी याबाबत चिखली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी तीन चोरट्यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

चिखली पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सतीश माने यांनी दिलेल्या माहितीनुसार, युनियन बॅंकेचे चिखलीतील शिवतेजनगर परिसरात एटीएम आहे. या एटीएममध्ये चोरी करण्यासाठी तीन चोरटे आले. त्यांनी गॅस कटरच्या सहाय्याने एटीएम फोडण्याचा प्रयत्न केला. मात्र युनियन बॅंकेच्या नियंत्रण कक्षाला याबाबतची माहिती मिळाली. त्यांनी नियंत्रण कक्षातून सायरन वाजविला. तसेच याबाबतची माहिती पिंपरी चिंचवड पोलिसांच्या नियंत्रण कक्षाला दिली.

सायरन वाजताच चोरट्यांनी धूम ठोकली. घटनेची माहिती मिळताच पोलिसांचा मोठा फौजफाटा घटनास्थळी दाखल झाला. पोलिसांच्या हाती सीसीटीव्ही फुटेज लागले आहे. या फुटेजच्या आधारे चिखली पोलीस आणि गुन्हे शाखेने तपासाला सुरुवात केली आहे.

Advertisement

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *