लोकअदालतमध्ये दावे निकाली काढण्यात पुणे अव्वल

लोकअदालतमध्ये दावे निकाली काढण्यास पुणे जिह्याने राज्यात पहिला क्रमांक पटकाविला आहे. पुणे जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या वतीने पुणे व पिंपरी-चिंचवड शहरासह जिल्ह्यात आयोजित लोकअदालतीत एकूण 2 लाख 40 हजार 119 दावे निकाली काढले आहेत. तब्बल 129 कोटी 35 लाख 40 हजार 207 रुपयांची भरपाई वसूल करण्यात आली.

Advertisement

प्रमुख जिल्हा न्यायाधीश व पुणे जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे अध्यक्ष संजय देशमुख आणि सचिव प्रताप सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यातील सर्व न्यायालयांमध्ये लोकअदालतीचे आयोजन करण्यात आले होते. यंदाच्या लोकअदालतीत प्रथमच वाहतूक नियमांच्या उल्लंघनाबद्दल वाहतूक पोलिसांनी वाहनचालकांना आकारलेल्या दंडात्मक ई-चलनाचे दोन लाखांहून अधिक दावे निकाली काढण्यासाठी ठेवले होते. त्यातील 1 लाख 55 हजार 469 दाव्यांचा निपटारा झाला असून, 6 कोटी 61 लाख 66 हजार 300 रुपये दंड वसूल केला आहे.

याशिवाय दाखलपूर्व आणि प्रलंबित असे एकूण 1 लाख 65 हजार 132 दावे तडजोडीसाठी ठेवले होते. त्यापैकी 64 हजार 650 दावे निकाली काढून, 122 कोटी 73 लाख 73 हजार 907 रुपयांची भरपाई वसूल करण्यात प्राधिकरणाला यश आले. राज्यभरात आयोजित लोकअदालतीत ई-चलनासह दाखलपूर्व व प्रलंबित दाव्यांपैकी एकूण 7 लाख 73 हजार 898 दावे निकाली निघाले. त्यापैकी 2 लाख 40 हजार दावे पुणे जिल्ह्यातील लोकअदालतीत निकाली काढले आहेत. त्यामुळे राज्यात सर्वाधिक दावे पुणे जिल्ह्यात निकाली निघाले आहेत.

सर्वाधिक भरपाई वसूल करण्याचा विक्रम

यंदाच्या लोकअदालतीत सर्वाधिक दावे निकाली काढून, सर्वाधिक भरपाई वसूल करण्याचा विक्रम नोंदला गेला आहे, असे प्राधिकरणाचे सचिव प्रताप सावंत यांनी सांगितले. या सर्व दाव्यांच्या सुनावणीसाठी 125 पॅनेल नियुक्‍त केले होते. करोनाच्या पार्श्‍वभूमीवर लोकअदालतीचे कामकाज प्रत्यक्ष तसेच ऑनलाइन पद्धतीनेही चालविण्यात आले. अनेक वर्षे प्रलंबित दावे तडजोडीने निकाली निघाल्याने पक्षकारांनी समाधान व्यक्त केले.

Advertisement

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *