जनआक्रोश आंदोलनात कामगारांचा एल्गार

संयुक्त किसान मोर्चा, कामगार संघटना संयुक्त कृती समिती, महाविकास आघाडी यांच्या वतीने सोमवारी (दि. 27) भारत बंद जन आक्रोश आंदोलन पुकारण्यात आले होते. या अंतर्गत पिंपरीतील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा चौकात आंदोलन करण्यात आले. शेतकरी व कामगार विरोधी कायदे मागे घ्यावेत, यासाठी करण्यात आलेल्या या आंदोलनात अन्यथा अधिक तीव्र आंदोलन आगामी काळात केले जाईल, असा इशारा कामगार संघटना संयुक्त कृती समितीच्या भारत बंद आंदोलनात देण्यात आला.

यावेळी राष्ट्रवादी कॉंग्रेस शहराध्यक्ष संजोग वाघेरे पाटील, राष्ट्रवादी महिला शहराध्यक्षा वैशाली काळभोर, ज्येष्ठ कामगार नेते अजित अभ्यंकर, लता भिसे, मानव कांबळे, मारुती भापकर, अरुण बोऱ्हाडे, अनिल रोहम, पांडूरंग गडेकर, दिलीप पवार, पुष्पा शेळके, संदिपान झोंबाडे, लक्ष्मण रुपनर, निरज कडू, वसंत पवार, किरण भुजबळ, सुनिल देसाई, शशिकांत धुमाळ, अशा विविध कामगार संघटनांच्या प्रतिनिधींनी सहभाग घेतला होता.

यावेळी ज्येष्ठ कामगार नेते अजित अभ्यंकर म्हणाले की, एफडीआय या गोंडस नावाखाली भांडवलदारांना सवलती देऊन गरीबांचे शोषण करणारी यंत्रणा केंद्र सरकार उभी करीत आहे. भारतात उत्पादीत होणारे इंधन आणि आयात केलेले इंधन नफेखोरीच्या उद्देशाने एकाच दराने सरकार विकत आहे. आयता मिळालेला देश भाजपाने विकायला काढला आहे. हे सरकार गोरगरीबांचे, शेतकरी – कामगारांचे नसून भांडवलदारांचे आहे अशी टीका अभ्यंकर यांनी केली.

राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष संजोग वाघेरे म्हणाले की, पिंपरी चिंचवड महापालिकेपासून दिल्लीच्या संसदेपर्यंत भाजपाची भ्रष्टाचाराबाबत ख्याती आहे. पिंपरी चिंचवड स्मार्ट सिटीच्या अंतर्गत त्यांनी भ्रष्टाचाराचे नवीन कुरण तयार केले आहे. प्रचंड भ्रष्टाचार या मनपात आहे. या विरुध्द पुढील काळात एकजुटीने मोठा लढा उभारु.

Advertisement

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *