नागपूर : गणेशोत्सवात मिरवणुकीदरम्यान मंडळांकडून डीजे(dj) लावले जातात. त्यामुळे ध्वनी प्रदूषण होते. ही गंभीर बाब लक्षात घेत पोलिसांनी सर्व सार्वजनिक मंडळ आणि भक्तांना मिरवणुकीत डीजे न लावण्याची विनंती केली आहे. यानंतरही कोणी डीजे लावला तर पोलिस गुन्हा नोंदविण्यासोबतच म्युजिक सिस्टमही जप्त करतील, असा इशारा पोलिस आयुक्त रवींद्रकुमार सिंगल यांनी दिला आहे.
पोळ्यालाही पोलिसांनी हीच भूमिका घेत आयोजकांना डीजे(dj) न लावण्याची विनंती केली होती. त्यानंतरही तीन ठिकाणी डीजे लावण्यात आले. पोलिसांनी आयोजकांसोबतच ‘डीजे’ वाल्यांवरही गुन्हा नोंदविला आणि त्यांचे म्युजिक सिस्टमही जप्त केले आहे.
पोलिस आयुक्त म्हणाले की, पारंपरिक वाद्य यंत्र वाजवण्यावर कोणत्याही प्रकारची बंदी नाही. मात्र, त्याच्यासोबत हाय डॉल्बी साऊंडवाले डीजे सिस्टम राहणार नाही. कोणत्याही इलेक्ट्रॉनिक उपकरणाच्या माध्यमातून पारंपरिक वाद्य यंत्रांचा आवाज वाढविण्यात आला तरीही पोलिस ध्वनी प्रदूषणसह विविध कलमान्वये गुन्हे नोंदवतील, असे त्यांनी सांगितले.
मंडळांसोबत आधीच बैठक घेऊन दिशा-निर्देश देण्यात आले आहेत. यावेळी 1400 च्या आसपास सार्वजनिक गणेश मंडळांनी पोलिसांची परवानगी मागितली आहे. सर्व मंडळांना कार्यक्रमस्थळी स्वयंसेवकांची पुरेशी व्यवस्था करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. तसेच मोठ्या आयोजन स्थळांवर सीसीटीव्ही कॅमेरे लावावे लागतील. मूर्ती पीओपीची असू नये हे स्वतः गणेश मंडळांनी ठरवायचे आहे.
जिल्हाधिकाऱ्यांनी सामाजिक दृष्टिकोणातून चांगली संकल्पना मांडली आहे. त्यांनी सर्व गणेश मंडळांना रक्तदान शिबिर आयोजित करण्याचे आवाहन केले आहे. कार्यक्रमस्थळी महिला आणि मुलांसाठी माहिती फलक लावण्याचे निर्देशही देण्यात आले आहेत. सर्व ठाणेदारांनी त्यांच्या भागात होणाऱ्या कार्यक्रमाची यादी ठेवावी.
हेही वाचा:
विधानसभा निवडणुकीसाठी भाजपची मेगा प्लॅनिंग
11 वर्षाच्या मुलीवर मौलानाचा तीन महिन्यांपासून अत्याचार
गणपती बाप्पाच्या नावापुढे ‘मोरया’ का म्हटलं जातं?