आधुनिक शेतीचा नवा आदर्श! सांगलीच्या पठ्ठ्यानं केली कमाल, 25 गुंठ्यात घेतलं 4 लाखांचं उत्पन्न

सांगली जिल्ह्यातील वाळवा तालुक्यातील आष्टा येथील एका २६ वर्षीय तरुणाने आधुनिक पद्धतीने शेती(agriculture) करत मिरची पिकातून भरघोस उत्पन्न मिळवले आहे. अवघ्या २५ गुंठे क्षेत्रात त्याने तब्बल ४ लाखांचे उत्पन्न मिळवून एक नवा आदर्श निर्माण केला आहे. विशेष म्हणजे हा तरुण कृषी पदवीधर असून त्याने वडील आणि तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली ही किमया साधली आहे.

प्रणव शिंदे असे या तरुण शेतकऱ्याचे(agriculture) नाव आहे. त्यांनी आपल्या २५ गुंठे शेतामध्ये हिरव्या मिरचीचे पीक घेतले. लागवड करण्यापूर्वी त्यांनी जमिनीची योग्य मशागत केली. त्यासाठी त्यांनी सहा ट्रॉली शेणखत वापरले. तसेच उभी-आडवी नांगरट करून बेड तयार केले. सप्टेंबर महिन्यात त्यांनी रोपवाटिकेतून ७८६ सेमीनस जातीची सुमारे चार हजार मिरचीची रोपे खरेदी केली.

प्रणव यांनी रोपांची लागवड पाच बाय सव्वा फुटावर केली. या मिरचीला ठिबक सिंचनाद्वारे नियमित पाणी दिले. तसेच, मिरचीवर बुरशी, करपा, अळी या रोगांसाठी वेळोवेळी कीटकनाशकांची फवारणी केली. मिरचीच्या पिकाच्या व्यवस्थापनासाठी त्यांनी रणजीत तळप यांचे मार्गदर्शन घेतले.

रोप लागवडीनंतर वीस दिवसांनी काठी आणि तारेच्या सहाय्याने मिरचीच्या झाडांना आधार दिला. तणांचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी मल्चिंग पेपरचा वापर केला. तसेच, पाण्याचा योग्य वापर व्हावा यासाठी संपूर्ण पिकाला ठिबक सिंचन पद्धतीने पाणीपुरवठा केला.

प्रणव शिंदे यांनी योग्य नियोजन, आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर आणि अनुभवी लोकांच्या मार्गदर्शनाच्या आधारे मिरची पिकातून भरघोस उत्पन्न मिळवले आहे. त्यांचा हा उपक्रम इतर शेतकऱ्यांसाठी, विशेषतः तरुण शेतकऱ्यांसाठी प्रेरणादायी आहे.

हेही वाचा :

नेटफ्लिक्सचा चाहत्यांना झटका, प्लॅनच्या किंमती पुन्हा वाढवल्या

केंद्रीय लोकसेवा आयोगाकडून पदभरती जाहीर, सरकारी नोकरीसाठी ‘असा’ करा अर्ज

घटस्फोटाच्या चर्चांदरम्यान चहलची आणखी एक पोस्ट, म्हणाला “खरं प्रेम…”