मुंबई : राज्यामध्ये विधानसभा निवडणुकीनंतर जोरदार राजकारण(political issue) रंगले आहे. प्रतिष्ठेची मानली जाणारी ही निवडणूक महायुतीच्या बाजूने निकाल देणारी ठरली. महायुतीला पूर्णपणे एकतर्फी यश मिळाल्यामुळे सर्वांना आश्चर्याचा धक्का बसला आहे. तर दुसऱ्या बाजूला महाविकास आघाडीचा दारुण पराभव झाल्यामुळे मित्रपक्षांमध्ये अस्वस्थता दिसून येत आहे. राज्यामध्ये लवकरच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूका आहेत. यामध्ये महाविकास आघाडीचा एक महत्त्वाचा घटक असलेल्या शिवसेना ठाकरे गटाने स्वबळावर निवडणूक लढण्याचा निर्णय घेतलेला आहे.
राज्यामध्ये मागील पाच वर्षापासून अनेक महानगरपालिकांमध्ये प्रशासनराज सुरु आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचं घोंगडं भिजत पडलं आहे. आता लोकसभा व विधानसभा निवडणुकीनंतर महापालिकेच्या निवडणुकीचे बिगुल वाजण्याची शक्यता आहे. त्यामुळे सर्वच राजकीय पक्ष जोरदार तयारीला देखील लागले आहेत.
मात्र विधानसभा निवडणुकीचा(political issue) लागलेला धक्कादायक निकाल महाविकास आघाडीच्या मित्रपक्षांच्या जिव्हारी लागला असून यापुढे सावधगिरी बाळगली जात आहे. त्यामुळे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये शिवसेना ठाकरे गट हा पक्ष मुंबईपासून नागपूरपर्यंत सर्व महापालिका निवडणूका स्वबळावर लढणार असल्याचे खासदार संजय राऊत यांनी घोषित केले आहे.
खासदार संजय राऊत यांनी मुंबईमध्ये माध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले की, मुंबईपासून नागपूर महापालिका आम्ही स्वबळावरुन लढणार, मुंबईसह नागपूर महापालिका आम्ही स्वबळावर लढू, काय होईल ते होईल, एकदा आम्हाला पाहायचंच आहे, अशी मोठी घोषणा शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केली. नागपूरला सुद्धा आम्ही स्वबळावर लढणार आहोत. याबाबत आम्हाला उद्धव ठाकरे यांनी संकेत दिले आहे. कार्यकर्त्यांना संधी मिळत नाही. कार्यकर्त्यांना संधी मिळाली पाहिजे म्हणून स्वबळावर लढणार असल्याचे संजय राऊत म्हणाले आहेत.
विधानसभा निवडणुकीनंतर महाविकास आघाडीमध्ये अंतर्गत धुसफूस सुरु झाली. दारुण पराभव झाल्यामुळे नेत्यांचे मनोबल खचले आहे. त्याचबरोबर अनेक मातब्बर नेते घरी बसून आहेत. महाविकास आघाडीमधील मित्रपक्ष पराभवाचं खापर एकमेंकावर फोडत आहेत. त्याचबरोबर आघाडीमध्ये समन्वय नाही, बोलणी नाही अशी टीका मित्रपक्षच करत आहेत. त्याचबरोबर मुद्दाम जागावाटपला उशीर केला गेला असल्याचे आरोप देखील कॉंग्रेसने केला होता.
यामुळे महाविकास आघाडीमध्ये भांडण सुरु झाली असल्याचे दिसून येत आहे. त्याचबरोबर जेष्ठ नेते शरद पवार यांनी चक्क भाजपची मातृसंस्था असलेल्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघ अर्थात आरएसएसचे कौतुक केले आहे. त्यामुळे शरद पवार यांची भाजपसोबत वाढती जवळीक ही देखील चर्चेचा विषय ठरत आहे.
तर दुसऱ्या बाजूला आमदार आदित्य ठाकरे यांनी देखील मुख्यमंत्री फडणवीसांची पाच वेळा भेट घेतली आहे. त्यामुळे लवकरच राज्याच्या राजकारणामध्ये मोठे बदल आणि उलथापालथ होणार असल्याचे स्पष्ट दिसून आहे. महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा मोठा राजकीय भूकंप होणार असल्याचे संकेत आहेत.
हेही वाचा :
पवार गटातील खदखद बाहेर भाकरी फिरवण्याची मागणी
मकर संक्रांतीच्या आधी सूर्यदेव चमकवणार ‘या’ राशींचे नशीब; धनाचा होणार वर्षाव
महाविकास आघाडीत फुट? संजय राऊतांनी केली मोठी घोषणा