सोन्याच्या दरात सहाव्या दिवशी घसरण…

gold

सोने (gold) खरेदी करण्याची सध्या योग्य वेळ आहे. लग्नसराईचा हंगाम असूनही जागतिक बाजारात मंदीमुळे सोन्याच्या दरात  सलग सहाव्या दिवशी घसरण झाली. सोमवारीही सोन्याचा भाव 0.44 टक्क्यांनी घसरला. आठवडाभरातच त्याच्या किमती 1,600 रुपयांनी कमी झाल्या आहेत.

मल्टीकमोडिटी एक्सचेंज (MCX) वर, 24-कॅरेट शुद्धतेच्या सोन्याची (gold) फ्युचर्स किंमत सोमवारी सकाळी 0.44 टक्क्यांनी किंवा 230 रुपयांनी घसरून 52,030 रुपये प्रति ग्रॅम झाली. चांदीच्या दरातही घसरण झाली आणि फ्युचर्सचा भाव 1.25 टक्क्यांनी किंवा 829 रुपयांनी घसरून 65,717 रुपये प्रति किलो झाला. गेल्या सहा व्यापार सत्रांमध्ये सोन्याच्या दरात प्रति 10 ग्रॅम सुमारे 1600 रुपयांची घसरण झाली आहे.

यूएस फेड रिझर्व्हने चलनविषयक धोरणे कडक करण्याचे आणि व्याजदरात वाढ करण्याचे संकेत दिल्यानंतर सोन्याच्या दरात घसरण सुरूच आहे. जागतिक बाजारात सोन्याच्या स्पॉट किमतीने दोन आठवड्यांच्या नीचांकी पातळी गाठली आहे. सोमवारी सकाळी सोन्याची स्पॉट किंमत 0.3 टक्क्यांनी घसरून 1,923.74 डॉलर प्रति औंस झाली. 7 एप्रिलनंतरची ही सर्वात कमी किंमत आहे.

सोन्याव्यतिरिक्त इतर मौल्यवान धातूंच्या स्पॉट किमतीतही घट झाली आहे. चांदी 1 टक्क्यांनी घसरून 23.89 डॉलर प्रति औंस, प्लॅटिनम 0.4 टक्क्यांनी घसरून 927 डॉलर आणि पॅलेडियम 2.9 टक्क्यांनी घसरून 2,305.69 डॉलरवर आले. सोन्याच्या दरात घसरण होण्यामागे डॉलरची मजबूती हेही प्रमुख कारण असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.

पुढील महिन्यात अमेरिकन फेड रिझर्व्हने व्याजदरात वाढ केल्यानंतर सोन्या-चांदीच्या दरात आणखी घसरण होईल, असे तज्ज्ञांचे मत आहे. जागतिक बाजारात सोने प्रति औंस $1,905 पर्यंत जाऊ शकते, तर भारतीय बाजारात ते 52 हजारांच्या खाली जाईल. सोने 51,650 ते 52,500 रुपये प्रति 10 ग्रॅमच्या श्रेणीत राहील, असा तज्ञांचा अंदाज आहे.

हेही वाचा:


माधव गोडबोले यांचे पुण्यात निधन…


सचिनची कन्या लवकरच करू शकते बॉलिवूड डेब्यू?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *