या कारणामुळे गुंतवणूकदारांची कोटींची कमाई..!

भांडवली बाजारात (capital market) आज सोमवारी पहिल्या दिवशी तेजीची लाट धडकली आहे. चौफेर खरेदीने सेन्सेक्समध्ये तब्बल १४०० अंकांची वाढ झाली आहे. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी ३६६ अंकानी वधारला असून त्याने १८००० अंकांचा टप्पा ओलांडला आहे. आजच्या तेजीने गुंतवणूकदारांच्या मालमत्तेत तब्बल तीन लाख कोटींची वाढ झाली आहे.
आज बाजार (capital market) खुला होताच सेन्सेक्स आणि निफ्टीने तेजीची वाट धरली. बँका, वित्त संस्था, आयटी, मेटल, एफएमसीजी या क्षेत्रात खरेदीचा ओघ दिसून आला. निर्देशांकाच्या तेजीत एचडीएफसी आणि एचडीएफसी बँक या दोन्ही शेअरनी मोठं योगदान दिलं. एचडीएफसीचे एचडीएफसी बँकेत विलीनीकरण होणार या वृत्तानंतर दोन्ही शेअरला अप्पर सर्किट लागले. दोन्ही शेअर १५ टक्क्यांनी वाढले आहेत.
सेन्सेक्स मंचावरील ३० पैकी २३ शेअर तेजीत आहेत. ज्यात आज बजाज फायनान्स, रिलायन्स, एल अॅंड टी, भारती एअरटेल, आयसीआयसीआय बँक, कोटक महिंद्रा बँक, हिंदुस्थान युनिलिव्हर या महत्वाच्या शेअरमध्ये मोठी वाढ झाली आहे. तर एसबीआय, अल्ट्राटेक सिमेंट, इन्फोसिस, अॅक्सिस बँक, महिंद्रा अॅंड महिंद्रा या शेअरमध्ये घसरण झाली आहे.
सध्या मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स १३५० अंकांनी वधारला असून तो ६०६२७ अंकावर आहे. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी ३६३ अंकांनी वधारला असून तो १८०३४ अंकांच्या पातळीवर आहे. ९ जानेवारी २०२२ नंतर पुन्हा एकदा निफ्टीने १८ हजार अंकांची पातळी ओलांडली आहे.
यापूर्वी शुक्रवारच्या सत्रात दोन्ही निर्देशांकांत मोठी वाढ झाली होती. बीएसई सेन्सेक्स ७०८ अंकांनी वाढून ५९,२७६ वर बंद झाला होता. सेन्सेक्स मिडकॅप ३३५ अंकांनी वाढला आणि त्याचा सत्र शेवट २४,४४३ वर झाला होता. बीएसई स्मॉलकॅप ४८३ अंकांनी वाढला आणि २८,६९९ वर स्थिरावला होता.
हेही वाचा :