‘एलआयसी’चा शेअर तेजीत; ‘ग्रे मार्केट’मध्ये प्रिमीयम पाच पटीने वाढला!

किरकोळ आणि संस्थात्मक गुंतवणूकदार आतुरतेने ज्याची वाट पाहत आहेत त्या ‘एलआयसी’ ने (gray market) ग्रे मार्केटमध्ये धुमाकूळ घातला आहे. आयपीओची घोषणा झाल्यानंतर चार दिवसात एलआयसीच्या शेअर प्रिमीयममध्ये पाच पटीने वाढ झाली आहे. आज सोमवारी २ मे २०२२ रोजी एलआयसीचा ग्रे मार्केटमधील प्रति शेअर प्रिमियम ८५ रुपयांवर गेला आहे.
येत्या ४ मे पासून एलआयसीची भागविक्री खुली होणार आहे. तत्पूर्वी (gray market) ग्रे मार्केटमध्ये ‘एलआयसी’च्या शेअरचा बोलबाला आहे. आज सोमवारी एलआयसीचा शेअर प्रिमीयम ८५ रुपयांवर गेला. इश्यू प्राईसच्या जवळपास १० टक्के अधिक दर सध्या ग्रे मार्केटमध्ये आहे. हा ट्रेंड कायम राहिला तर गुंतवणूकदार लिस्टींगवेळी चांगली कमाई करतील, असा अंदाज गुंतवणूक तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे.
ग्रे मार्केटमध्ये गेल्या आठवड्यात शुक्रवारी एलआयसी शेअर प्रिमीयम ७० रुपये इतका होता. तर गुरुवारी तो ५० रुपये इतका होता. २३ एप्रिल २०२२ रोजी एलआयसीचा शेअर प्रिमीयम केवळ १५ रुपये इतका होता.
एलआयसीच्या एका समभागाच्या खरेदीसाठी ९०२ रुपये ते ९४९ रुपये हा दरपट्टा घोषित करण्यात आला आहे. एलआयसी पाॅलिसीधारकांना या भागखरेदीवर ६० रुपये प्रतिसमभाग सवलत देणार आहे. अन्य किरकोळ गुंतवणूकदारांना ४५ रुपये सवलत दिली जाणार आहे.बड्या गुंतवणूकदारांसाठी (अॅंकर इन्व्हेस्टर) एलआयसीचा आयपीओ आजपासून २ मे २०२२ खुला झाला आहे. वैयक्तिक गुंतवणूकदारांकरिता ४ मे २०२२ पासून सबस्क्रिप्शन सुरु होणार आहे.
ग्रे मार्केट म्हणजे काय?
ग्रे मार्केट ही मुख्यत: वित्तीय रोख्यांची अनियंत्रित आणि अनधिकृत बाजारपेठ आहे. या बाजारातील व्यवहार हे साधारणपणे तेव्हा होतात जेव्हा एखादा समभागाचे बाजारातील व्यवहार काही कारणाने स्थगित अथवा निलंबित केलेले असतात किंवा बाजारात सूचिबद्धता होऊन अधिकृत व्यवहार सुरू होण्यापूर्वी नवीन समभाग / रोख्यांची खरेदी आणि विक्री ग्रे मार्केटमध्ये सुरू असते. म्हणजे प्रत्यक्ष शेअर बाजारात समभागांची खरेदी अथवा विक्री होतच नाही. ग्रे मार्केट हे नवीन समभागाला मिळू शकणारी मागणी आणि त्याची गुंतवणूकदारांमधील लोकप्रियता जोखण्याचे एक माध्यमही मानले जाते.
हेही वाचा :