एप्रिल फुल नव्हे हा तर सुखद धक्का! या शेअरची कमाल!

नवीन आर्थिक वर्षाच्या पहिल्याच दिवशी ‘पेटीएम’च्या (paytm share) गुंतवणूकदारांना सुखद धक्का बसला. आज शुक्रवारी सकाळी बाजार सुरु होताच वन ९७ कम्युनिकेशनचा शेअर १० टक्क्यांनी वधारला. भांडवली बाजारात प्रवेश केल्यापासून मागील पाच महिन्यात पेटीएमच्या शेअरने तेजीची वाट धरली. आज शेअरमधील तेजीने गुंतवणूकदारांचा जीव भांड्यात पडला

सध्या शेअर बाजारात वन ९७ कम्युनिशेन्सचा भाव ५७४.४५ रुपये आहे. त्यात ८.७६ टक्के वाढ झाली आहे. बाजार खुला होताच तासाभरात वन ९७ कम्युनिशेन्सचा भाव ५८२.४० रुपयांवर गेला होता. काल गुरुवारी तो ५२८.२० रुपयांवर बंद झाला होता. आयपीओमध्ये शेअर (paytm share) प्राप्त झालेल्या गुंतवणूकदारांनी मागील सहा महिन्यात जवळपास ७५ टक्के पैसे गमावले आहेत.

पेटीएम पेमेंट बँक लिमिटेडला नवीन ग्राहक जोडण्यास रिझर्व्ह बँकेने मनाई केली होती. त्याचाही मोठा फटका शेअरला बसला होता. आयटी ऑडिट कंपनीची तातडीने नियुक्ती करण्याचे निर्देश रिझर्व्ह बँकेने दिले होते. या कारवाईनंतर कंपनीच्या शेअरमध्ये जवळपास १० ते १५ टक्के घसरण झाली होती. यापूर्वीच अनेक ब्रोकर कंपन्यांनी पेटीएमचे शेअर मूल्य ६५० ते ७०० च्या दरम्यान राहील, असा अंदाज वर्तवला आहे.

भविष्यात वृद्धीच्या अपेक्षा
शेअरमधील घसरणीची गंभीर दखल मुंबई शेअर बाजाराने घेतली होती. कंपनीला २२ मार्च २०२२ रोजी बीएसईने पत्र पाठवले होते. या पत्रावर तत्काळ पेटीएमकडून प्रतिसाद देण्यात आला होता. कंपनीची पाळेमुळे भक्कम आहेत. कंपनी भविष्यात वृद्धीच्या अपेक्षा व्यक्त करते, असा दावा पेटीएमने केला होता. कंपनी शेअरबाबत वेळोवेळी शेअर बाजाराला माहिती देईल, अशी ग्वाही पेटीएमने शेअर बाजाराला दिली होती .

बाजार भांडवलात झाली प्रचंड घसरण
‘पेटीएम’च्या वन ९७ कम्युनिकेशन्सचा आयपीओ नोव्हेंबर २०२१ मध्ये शेअर बाजारात धडकला होता. कंपनीने समभाग विक्रीतून १८३०० कोटींचे भांडवल उभारले मात्र पहिल्याच दिवशी शेअरमध्ये सपाटून घसरण झाली होती. आयपीओसाठी प्रती शेअर २१३० रुपये भाव ठेवण्यात आला होता मात्र प्रत्यक्षात शेअर नोंदणीवेळी तो १९ टक्के गडगडला. त्यानंतर मागील पाच महिन्यात त्यात प्रचंड घसरण झाली आहे. पेटीएमचे आयपीओवेळी १.५ लाख कोटींचे बाजार भांडवल होते ते आता ४४००० कोटी इतके खाली आले आहे.

हेही वाचा :


जेनेलिया दिसणार लवकरच ‘या’ अभिनेत्यासोबत..!

Leave a Reply

Your email address will not be published.