RBI ची मोठी कारवाई! ‘या’ ४ बड्या बँकांवर लादले निर्बंध; पैसे काढण्यावरही मर्यादा

गेल्या अनेक महिन्यांपासून रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (reserve bank of india) विविध बँकांवर धडक कारवाई करत, दंड करणे, निर्बंध लादण्याची प्रक्रिया वेगवान पद्धतीने सुरू केल्याचे पाहायला मिळत आहे.

यातच आता रिझर्व्ह बँकेने (reserve bank of india) आणखी ४ बँकांवर बंदी घातली आहे. ग्राहकांसाठी हा मोठा धक्का आहे. या चार बँकांशी संबंधित ग्राहक आता फक्त आरबीआयने निश्चित केलेल्या मर्यादेतूनच पैसे काढू शकतात.

साईबाबा जनता सहकारी बँक, द सूरी फ्रेंड्स युनियन को-ऑपरेटिव्ह बँक लि., सुरी (पश्चिम बंगाल) आणि नॅशनल अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक लि., बहराइचवर निर्बंध लादण्यात आले आहेत. या बँकांची ढासळती आर्थिक स्थिती पाहता हे पाऊल उचलण्यात आले आहे.

पैसे काढण्यावर निर्बंध

रिझर्व्ह बँकेने लादलेल्या निर्बंधांनुसार, साईबाबा जनता सहकारी बँकेचे ठेवीदार २० हजार रुपयांपेक्षा जास्त काढू शकत नाहीत. सुरी फ्रेंड्स युनियन को-ऑपरेटिव्ह बँकेसाठी ही मर्यादा ५० हजार रुपये आहे, तर नॅशनल अर्बन को-ऑपरेटिव्ह बँकेच्या ग्राहकांसाठी आता पैसे काढण्याची मर्यादा प्रति ग्राहक १० हजार रुपये करण्यात आली आहे. रिझर्व्ह बँकेने बिजनौर-आधारित युनायटेड इंडिया को-ऑपरेटिव्ह बँक लिमिटेडवर अनेक निर्बंधांसह ग्राहकांकडून पैसेकाढण्यावर निर्बंध लादले आहेत. बँकिंग नियमन कायदा, १९४९ अंतर्गत मध्यवर्ती बँकेने ४ सहकारी बँकांना या सूचना दिल्या आहेत, ज्या सहा महिन्यांसाठी लागू केल्या जातील. याशिवाय आरबीआयने फसवणुकीशी संबंधित काही नियमांचे उल्लंघन केल्याबद्दल त्यांनी सूर्योदय स्मॉल फायनान्स बँकेला ५७.७५ लाख रुपयांचा दंड ठोठावला असल्याचे सांगितले.

दरम्यान, यापूर्वीही रिझर्व्ह बँकेने दोन सहकारी बँकांवर निर्बंध लादले होते. या दोन्ही बँकेतील खातेधारक आता आपल्या खात्यातून पैसे काढू शकणार नाहीत किंवा कोणताही व्यवहार करता येणार नाही. रिझर्व्ह बँकेकडून कारवाई करण्यात आलेल्या या दोन बँकांमध्ये कर्नाटकस्थित श्री मल्लिकार्जुन पट्टण सहकारी बँक लिमिटेड आणि महाराष्ट्रातील नाशिक जिल्हा गिरणा सहकारी बँकेचा समावेश आहे.

Smart News :


अशाप्रकारे एकाच मोबाईलमध्ये चालवा ५ सिम

Leave a Reply

Your email address will not be published.