या गुंतवणूकदारांना अच्छे दिन! महिनाभरात शेअरमध्ये मोठी वाढ..!

उद्योजक मुकेश अंबानी यांच्या रिलायन्स इंडस्ट्रीजच्या (ril share price) शेअरने पुन्हा एकदा तेजीची वाट धरली आहे. मागील एका महिन्यात रिलायन्स इंडस्ट्रीजच्या शेअरमध्ये १४ टक्के वाढ झाली आहे. याच दरम्यान बेंचमार्क सेन्सेक्स ३ टक्क्यांनी वधारला आहे. रिलायन्सच्या शेअर तेजीबाबत जाणकार वेगवेगळे अंदाज व्यक्त करत आहेत.
भांडवली बाजारात शुक्रवारी घसरण झाली होती. बाजार बंद होताना सेन्सेक्स २३३ अंकांनी तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी ६९ अंकांनी घसरला होता. मात्र या पडझडीत देखील रिलायन्स इंडस्ट्रीजच्या शेअरमध्ये वाढ झाली होती. बाजार बंद होताना ( ril share price)चा शेअर १८.८० रुपयांनी वधर्न २५९६.७० रुपयांवर बंद झाला.
रिलायन्सचा शेअर त्याच्या सार्वकालीन उच्चांकी स्तरापासून अवघा ५ टक्के दूर आहे. मागील एक महिन्यात या शेअरमध्ये १४ टक्के वाढ झाली आहे. या तेजीमागे सिंगापूरमधील ग्रॉस रिफायनरी मार्जिन वाढल्याचे कारण आहे. यामुळे रिलायन्स समूहाला मोठा आर्थिक हातभार मिळणार आहे.
रशिया आणि युक्रेन युद्धानंतर जगभरात इंधन व्यवसाय तेजीत आहेत. त्याचा लाभ रिलायन्सला देखील झाला आहे. जागतिक कमॉडिटी बाजारात तेल आणि वायूंच्या किमतीत वाढ झाली. यामुळे कंपनीच्या सिंगापूर ग्रॉस रिफायनरी मार्जिनमध्ये चांगलीच वाढ झाली आहे. त्याशिवाय रिलायन्स समूह बदलत्या काळानुसार अपारंपरिक ऊर्जा क्षेत्रात देखील आपला विस्तार करत आहे. ज्यामुळे वृद्धीच्या अनेक संधी रिलायन्सला उपलब्ध होणार आहेत.
एचडीएफसी सिक्युरिटीजचे शेअर विश्लेषक अब्दुल करीम यांच्या मते रिलायन्स ही खासगी क्षेत्रातील मोठी इंधन उत्पादक आणि वितरक कंपन्यांपैकी आहे. त्याशिवाय कंपनीचा टेलीकॉम आणि रिटेल व्यवसायात देखील विस्तार आहे. मागील तीन आठवड्यात कंपनीच्या शेअरमध्ये मोठी वाढ झाली आहे. कच्च्या तेलाच्या किमतीत झालेली वाढ आणि पेट्रोल-डिझेलच्या शिल्लक साठ्याने रिलायन्सच्या पेट्रोकेमिकल व्यवसायाचे मार्जिन सुधारेल, असे त्यांनी सांगितले.
लवकरच ३००० रुपयांवर जाईल
रिटेल व्यवसायाचा विचार केला तर अमेझॉनसोबत कायदेशीर लढाई सुरु असताना देखील रिलायन्सने फ्युचर रिटेलबरोबरच करार पूर्ण केला आहे. नुकताच रिलायन्सकडून फ्युचरच्या २०० बिग बझार स्टोअरचा ताबा घेण्यात आला. याशिवाय जिओसाठी दूरसंचार सेवेच्या दरात झालेली वाढ फायदेशीर ठरणार आहे. त्यामुळे शेअर बाजार विश्लेषक रिलायन्स इंडस्ट्रीजमधील तेजीबाबत आश्वासक आहेत. नजीकच्या काळात तो ३००० रुपयांपर्यंत जाईल, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
हेही वाचा :