अकरावी प्रवेशाच्या मॉक अर्ज भरण्याची प्रक्रिया आजपासून…!

आता इयत्ता अकरावीच्या प्रवेशाची (11th Admission process) लगबग सुरू झाली आहे. आज 23 मे ते 27 मे दरम्यान विद्यार्थ्यांना ऑनलाईन अर्ज (online application) भरण्याचा सराव करता (मॉक अर्ज) येणार आहे. प्रत्यक्षात 30 मेपासून प्रवेश अर्जाचा पहिला भाग तर 10 वीच्या निकालानंतर प्रवेश अर्जाचा दुसरा भाग भरता येणार आहे , अशी माहिती शिक्षण विभागाने दिली आहे. विद्यार्थ्यांना इयत्ता अकरावी प्रवेशासाठी ऑनलाईन अर्ज भरावे लागणार आहे. राज्यातील मुंबई, ठाण्यासह, पुणे, पिंपरीचिंचवड, अमरावती आणि नागपूरमध्ये केंद्रीय ऑनलाईन पद्धतीने अकरावीची प्रवेश प्रक्रिया राबवली जाणार आहे. तसं पत्रक काढून शिक्षण विभागाने या संदर्भातील माहिती दिली आहे. त्यामुळे महाविद्यालयात प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांची अकरावी प्रवेशाची उत्कंठा संपुष्टात येणार आहे.
अर्ज भरण्याचा सराव म्हणजे काय?
केंद्रीय ऑनलाईन पद्धतीने विद्यार्थ्यांना ऑनलाईन अर्ज (online application) भरता येणार आहे. 30 मे पासून ही प्रक्रिया सुरू होईल. त्यापूर्वी आजपासून ते 27 मेपर्यंत विद्यार्थ्यांना ऑनलाईन अर्ज भरण्याचा सराव करता येणार आहे. प्रत्यक्षात अर्ज भरताना कोणत्याही चुका होऊन अर्ज बाद होऊ नये म्हणून आजपासून ते 27 मे पर्यंत मॉक डेमो रजिस्ट्रेशन म्हणजे अर्ज भरण्याचा सराव करता येणार आहे.
पहिल्यांदाच ऑफलाईन परीक्षा
दोन वर्ष कोरोनाचं संकट होतं. त्यामुळे विद्यार्थ्यांना ऑनलाईन परीक्षा द्यावी लागली होती. यंदा पहिल्यांदाच इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांना ऑफलाईन पद्धतीने परीक्षा देता आली होती. एकट्या ठाणे जिल्ह्यातूनच 1 लाख 22 हजार 269 विद्यार्थी परीक्षेला बसले होते.
प्रवेश प्रक्रिया अशी असणार
विद्यार्थ्यांना 27 मेपर्यंत अर्ज भरण्याचा सराव करता येणार आहे. त्यानंतर सराव केलेली ही माहिती 28 मे रोजी नष्ट करता येईल. त्यानंतर 30 मे रोजी प्रत्यक्षात अर्ज भरता येणार आहे. प्रत्यक्षात अर्ज भरण्याचे दोन टप्पे करण्यात आले आहेत. पहिल्या टप्प्यात 30 मे रोजी विद्यार्थ्यांना वैयक्तिक माहिती भरायची आहे. त्यानंतर दहावीचा निकाल लागल्यानंतर विद्यार्थ्यांना पसंतीच्या महाविद्यालयांची निवड करावी लागणार आहे. तसेच अर्जात टक्केवारी नमूद करता येणार आहे. प्रवेश प्रक्रियेची अधिक माहिती जाणून घ्यायची असल्यास http://11thadmission.org.in या वेबसाईटला भेट द्यावी. शाळा आणि ज्युनिअर कॉलेजसाठी प्रशिक्षण वर्गातून पालक आणि विद्यार्थ्यांना माहिती द्यावी ,असंही आवाहन शिक्षण संचालक महेश पालकर यांनी केलंय.
हेही वाचा :