अपघात विमा मिळवण्यासाठी, एकाच कुटुंबात, एका दिवसात पाच अपघात झाल्याचा बनाव!

एकाच दिवशी कुटुंबातील पाच सदस्यांचा अपघात झाल्याची घटना गुजरात मध्ये समोर आली होती. सुरुवातीला गुजरातमधील या कुटुंबाला अपघातांमुळे जबर धक्का बसला असल्याचे सर्वांना वाटले. मात्र कंपन्यांकडून अपघात विमा (accident insurance) मिळवण्यासाठी हा बनाव रचला असल्याचे एका तपासात दिसून आले आहे.

राजकोटमधील 40 वर्षीय व्यक्ती आणि त्याच्या चार नातेवाईकांनी वेगवेगळ्या ठिकाणी अपघात झाल्याचे सांगितले. यावेळी ते स्वतंत्र गाड्याही चालवत होते, परंतु सर्व अपघात एकाच दिवशी घडल्याचा दावा त्यांनी केला. या कुटुंबाने या वर्षी मार्चमध्ये वेगवेगळ्या कंपन्यांकडे विम्याचे दावे दाखल केले होते. दोन विमा कंपन्यांनी (accident insurance) हा बनाव अनुभवला आणि त्यांची फसवणूक करण्याच्या प्रयत्नाची चौकशी करण्यासाठी राजकोट, अमरेली आणि अहमदाबाद येथील पोलिसांकडे त्यांनी अर्ज सादर केले.

गुजरात पोलिस आणि विमा कंपन्यांच्या सूत्रांनी सांगितले की तरुण कांटारिया, त्याचा मेहुणा जी डी राठोड, तरुणाचा भाऊ कौशल, त्याचा चुलत भाऊ गगन कंटारिया आणि त्याची पत्नी भूमी यांनी नोव्हेंबर 2021 मध्ये वेगवेगळी वाहने खरेदी केली होती. या कुटुंबाने उच्च श्रेणीतील कार, प्रीमियम सेडान आणि SUV चा समावेश असलेल्या विमा पॉलिसी घेतल्या होत्या. यांनी मिळून सुमारे 68,000 रुपये वार्षिक प्रीमियम भरला होता. म्हणजेच अपघातानंतर त्यांचा एकूण पेआउट क्लेम 80 लाख रुपये होता.

या वर्षी जानेवारीमध्ये, त्यांनी पुन्हा पाच वाहने खरेदी केली, त्यांचा विमा काढला आणि अपघातात झालेल्या नुकसानीसाठी सुमारे 40 लाख रुपयांची मागणी केली. या वेळी कुटुंबाने खरेदीची मूळ कागदपत्रे सादर न केल्याने संबंधित खासगी विमा कंपनीने रक्कम देण्यास नकार दिला. मात्र कुटुंबीयांनी पोलिसात तक्रार दाखल करून रक्कम मंजूर करून घेतली.

एका इन्शुरन्स फर्मच्या सूत्राने टाइम्स ऑफ इंडियाला दिलेल्या माहितीनुसार इन्शुरन्स कंपन्यांनी या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी पोलिसांकडे याचिका सादर केल्या. यावेळी आम्हाला असे आढळून आले की सर्व तथाकथित अपघातांमध्ये, गाडीचे नुकसान एका अर्थमूव्हरने केले आहे. राजकोट आणि अमरेली पोलिसांच्या सूत्रांनी सांगितले की, सेकंड-हँड कार वापरून विमा पेआउटचा दावा करण्याची ही एक मोडस ऑपरेंडी आहे.

अलीकडेच अशी अनेक प्रकरणे समोर आली आहेत ज्यात एखादी व्यक्ती सेकंड-हँड कार खरेदी करते, त्यावर जास्तीत जास्त विमा घेते, नंतर संपूर्ण पेआउटचा दावा करण्यासाठी खोट्या अपघातात तिचे नुकसान करते, एका पोलिस अधिकाऱ्याने सांगितले, की असे लोक अपघात वास्तविक दिसण्यासाठी व्यावसायिक ड्रायव्हर्स, विमा कंपनीचे कर्मचारी आणि अर्थमूव्हर्सचे ऑपरेटर यांची मदत घेतात. एका प्रकरणात, एका व्यक्तीने अपघाताचा दावा नाकारल्याबद्दल विमाकंपनीच्या माणसाला धमकी दिल्याने अहमदाबाद पोलिसांकडे एक तक्रार दाखल करण्यात आली होती. यानंतर हा प्रकार उघडकीस आला आहे.

हेही वाचा :


शिंदे गटाला मोठा झटका! गटनेतेपदी अजय चौधरींना मान्यता…

Leave a Reply

Your email address will not be published.