ठाकरे गटाला मोठा दिलासा!

शिंदे गटाच्या मागणीवरून निवडणूक आयोगाने सुरू केलेल्या कार्यवाहीला स्थगिती देण्याच्या शिवसेनेच्या याचिकेवर सुनावणी घेण्यास (Supreme Court) सर्वोच्च न्यायालयाने तयारी दर्शवली आहे.  शिवसेनेच्या इतर याचिकांसोबत या नव्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालय १ ऑगस्ट रोजी सुनावणी घेणार आहे.

एकनाथ शिंदे गटाकडून शिवसेनेवर ठोकलेल्या दाव्यानंतर केंद्रीय निवडणूक आयोगाने शिंदे व ठाकरे गटांना शिवसेनेवरील दाव्याबाबतची सर्व कागदपत्रे व पुरावे सादर करण्याचे आदेश दिलेले होते. (Supreme Court) आयोगाने सुरू केलेल्या या कार्यवाहीला स्थगिती दिली जावी, अशी विनंतीची याचिका शिवसेनेकडून सोमवारी सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आली आहे.

खरी शिवसेना कोणाची, यावरून ठाकरे आणि शिंदे गट एकमेकांविरोधात उभे ठाकले आहेत. बंडखोर एकनाथ शिंदे गटाने खरी शिवसेना आमचीच असल्याचे सांगत काही दिवसांपूर्वी निवडणूक आयोगात धाव घेतली होती. आयोगाने गेल्या आठवड्यात यासंदर्भात आवश्यक ती कागदपत्रे सादर करण्याचे निर्देश दोन्ही गटांना दिले होते. निवडणूक आयोगाकडून सुरू करण्यात आलेल्या या कार्यवाहीला आता ठाकरे गटाने सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले आहे.

महाराष्ट्रातील सत्तासंघर्षावर आधीपासूनच सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरू असल्याने निवडणूक आयोग शिंदे गटाच्या मागणीवर कार्यवाही करू शकत नाही, असा युक्तिवाद ठाकरे गटाकडून याचिकेत करण्यात आला आहे. आयोगाने दोन्ही गटांना कागदपत्रे सादर करण्यासाठी येत्या ८ ऑगस्टपर्यंतची वेळ दिलेली आहे.

दोन्ही बाजुंचे म्हणणे ऐकून घेतल्यानंतर खरी शिवसेना कोणाची, याबाबतचा कौल आयोग देणार आहे. विशेष म्हणजे दोन्ही गटांकडून शिवसेना पक्ष व धनुष्यबाण या निवडणूक चिन्हावर दावा ठोकण्यात आलेला आहे. सत्तासंघर्षावरील सर्वोच्च न्यायालयातली पुढील सुनावणी येत्या १ ऑगस्टला होणार आहे. त्यामुळे ठाकरे गटाने दाखल केलेल्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालय कोणती भूमिका घेते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

हेही वाचा :


लोकप्रिय अभिनेते डेव्‍हिड वॉर्नर यांचे निधन

Leave a Reply

Your email address will not be published.