उन्हाळी लागल्यावर उपाय काय माहितीयं का?

आयुर्वेदात उन्हाळी(Ayurveda) लागल्यावर नेमके काय करावे, यासंबंधी नैसर्गिक उपाय सांगितले आहेत. तरीदेखील खूपच त्रास होत असल्यास वैद्यकीय तज्ज्ञांचा सल्ला घेऊन दवाखान्यातून उपचार घेणे चांगले, असे तज्ज्ञ सांगतात.

सोलापूर : उन्हाळा अर्थातच ग्रीष्म ऋतू स्वतःच्या सर्व शक्तीने तळपणारा सूर्य आपल्या उष्ण तीक्ष्ण किरणांनी सृष्टीतील सर्व घटकातील स्निग्धांशाचे, सारभागाचे, सारयुक्त जलीय अंशाचे अधिक प्रमाणात शोषण करतो. त्यामुळे रसाप्क्षय (शक्ती कमी) व शरीरात वात दोषांची वृद्धी होते.(Ayurveda) हा थकवा भरून काढण्यासाठी आयुर्वेदात विविध खाण्डव, पानक, सार, सिद्ध जलाचा प्रयोग करावा असे सांगितले जाते.

सोलापूरचे तापमान सध्या ४० अंश सेल्सिअसपेक्षाही जास्त आहे. अनेकांना उन्हाचा त्रास होतो तर काहींना उन्हाळीचा त्रास जाणवतो. अशावेळी आयुर्वेदात रामबाण उपाय सांगितले आहेत. तरीपण, जेव्हा कडक उन्ह असते त्यावेळी शक्यतो घराबाहेर पडू नये. अत्यावश्यक कामासाठी बाहेर पडताना डोक्यावर, डोळ्यावर व अंगात सुती कपडे जरुरी आहेत. आयुर्वेदात उन्हाळी लागल्यावर नेमके काय करावे, यासंबंधी नैसर्गिक उपाय सांगितले आहेत. तरीदेखील खूपच त्रास होत असल्यास वैद्यकीय तज्ज्ञांचा सल्ला घेऊन दवाखान्यातून उपचार घेणे चांगले, असे तज्ज्ञ सांगतात.

उन्हाळ्यात पाणी किती प्यावे?

तहान लागली की पाणी प्यावे, त्यासाठी शरीराचे घड्याळ समजून घ्यावे. उगाचच अमूकवेळी इतके पाणी प्यावे असे काही ठरवू नये. तहान लागली की तहान भागेपर्यंत पाणी प्यावे हे शास्त्रसंयुक्त व तब्येतीसाठीही योग्य आहे. उन्हातून आल्यानंतर फ्रीजमधील बाटली काढून बाटलीनेच वरून पाणी पिणे शरीराला त्रासदायक असते. उन्हातून आल्यानंतर थोडावेळ बसा आणि नंतर ग्लासमधे ओतून पाणी प्यावे. खूप थंड, बर्फ टाकलेले पाणी पिऊ नये. माठातील पाणी अगदी उत्तम. त्यातही वाळा टाकलेले अधिक उत्तम मानले जाते.

उन्हाळी लागल्यास काय करावे?

लघुशंका करताना दाह होत असल्यास धने, खडीसाखर, तुळशीचे बी घालून पाणी प्यावे. शरीरातून बाहेर पडणाऱ्या मूत्राचे स्वरूप व प्रमाण, यावरून पाणी योग्य प्रमाणात पिले की नाही हे समजते. मूत्र प्रवृत्ती योग्य प्रमाणात व काहीही त्रास न होता होत असल्यास पाण्याचे प्रमाण बरोबर आहे असे समजावे. उन्हाळे लागली असल्यास रात्री झोपताना मातीच्या मटक्यात खडीसाखर, धने व सब्जा बी (तुळशीच्या बिया) पाण्यात भिजत घालावे व सकाळी कुस्करून गाळून प्यावे. उन्हामध्ये अधिक फिरणे झाल्यामुळे डोळ्यांची जळजळ होत असल्यास डोळ्यांवर दुधाच्या किंवा गुलाब जलाच्या पट्ट्या ठेवाव्यात. तसेच उन्हातून आल्यावर ताबडतोब डोळे थंड पाण्याने धुवून न घेता थोड्या वेळाने धुवावेत.

हेही वाचा :

एप्रिल महिना सिनेरसिकांसाठी ठरणार खास, ३ जबरदस्त चित्रपट येणार भेटीला

वानखेडेमध्ये आज खरंच हार्दिकमुळे पोलीस चाहत्यांवर कारवाई करणार? MCA म्हणालं, ‘प्रेक्षकांच्या..’

‘शरद पवारांनी आदेश दिला तर मी..’; पृथ्वीराज चव्हाण अगदी स्पष्टच बोलले! राज्याच्या राजकारणात मोठा ट्विस्ट