‘उद्धवजी, माझं घर तोडलं होतं तुम्ही…’ कंगनाचा तो व्हिडिओ पुन्हा चर्चेत!

राज्याच्या राजकारणानं आता सगळ्यांना संभ्रमित केलं आहे. काय चाललं आहे, काय होणार आहे हा प्रश्न सगळ्यांनाच पडला आहे. विधानसभा निवडणुकीनंतर सगळं काही बदललं आहे. सत्तांतराची समीकरणं वेगळ्या दिशेनं चालली आहेत. यासगळ्यात मनोरंजन क्षेत्रातील वेगवेगळ्या सेलिब्रेटींनी प्रतिक्रिया देण्यास सुरुवात केली आहे. त्यात मराठी मनोरंजन विश्वातील काही अभिनेत्यांनी सध्याच्या राजकीय घडामोडींवर प्रतिक्रिया देऊन चाहत्यांचे लक्ष वेधून घेतले आहे. यासगळ्यात बॉलीवूडची क्वीन म्हणून ओळखली जाणाऱ्या (kangana ranaut) कंगनाचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. तो व्हिडिओ जुनाच असून सध्याच्या राजकीय परिस्थितीवर भाष्य करणारा असल्यानं त्याच्यावर नेटकऱ्यांनी प्रतिक्रिया देण्यास सुरुवात केली आहे.
तुम्हाला कदाचित आठवत असेल तर, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मुंबई महानगर पालिकेला कंगनाच्या (kangana ranaut) घराबाबत जे आदेश दिले होते त्याची तातडीनं कारवाई करण्यात आली होती. त्यात कंगनानं जे अतिक्रमण केले होते. ते हटविण्यात आले होते. यानंतर चवताळलेल्या कंगनानं सोशल मीडियावर शिवसेना आणि सेनेतील काही नेत्यांवर टीका करण्यास सुरुवात केली होती. कंगना ही नेहमीच तिच्या वादग्रस्त वक्तव्यांसाठी ओळखली जाणारी सेलिब्रेटी आहे. तिच्या यापूर्वीच्या वक्तव्यावरुन सोशल मीडियावर झालेला वादही अनेकांनी पाहिला आहे.
सध्या शिवसेनेचे मंत्री एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरीनंतर राज्याच्या राजकारणानं वेगळं वळण घेतलं आहे. यासगळ्या परिस्थितीवर मार्मिक भाष्य करणारा कंगनाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हाय़रल झाला आहे. त्याचं झालं असं की, काल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी फेसबूक लाईव्हद्वारे जनतेला संबोधित करताना आता आपण वर्षा बंगल्यावर न राहता पुन्हा मातोश्रीला राहायला जातो आहोत. असे सांगितले. त्यानंतर धाकड गर्ल कंगनाचा व्हिडिओ नेटकऱ्यांचे लक्ष वेधून घेताना दिसतो आहे.
सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या त्या व्हिडिओमध्ये कंगना म्हणते की, आदरणीय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे साहेब तुम्हाला काय वाटतं, तुम्ही काही फिल्म माफियाच्या सहकार्यानं माझं घर तोडलं. तुम्ही माझ्यावर सुड उगवला आहे. आज माझं घर तुटलं आहे उद्या तुमच्यावर देखील….अशा शब्दांत कंगनानं आपला राग व्यक्त त्या व्हिडिओच्या माध्यमातून व्यक्त केला होता.
हेही वाचा :