चंद्रमुखी’ मध्ये रंगणार ‘अमृता- प्राजक्ताची’ जुगलबंदी

सध्या सर्वत्र ‘चंद्रमुखी’ चा बोलबाला आहे. या सौंदर्यवतीने सर्वांवर जादू केली आहे. आपल्या दिलखेचक सौंदर्याने, नृत्याने सर्वांना घायाळ करणारी ‘चंद्रा’ आता सवाल जवाबचा तडका घेऊन प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. यात अमृता खानविलकर आणि प्राजक्ता माळीमध्ये रंगलेली जबरदस्त जुगलबंदी पाहायला मिळत आहे. यापर्वी या चित्रपटातील (movie) ठुमकेदार लावणी, तरल प्रेमगीत, कृष्णप्रेम व्यक्त करणाऱ्या, श्रृंगाराने सजलेल्या चंद्राची बैठकीची लावणी आपल्या समोर आली आहे. आता सवाल जवाबचा फड रंगला आहे. या लावणीला गुरू ठाकूर यांनी शब्दबद्ध केले असून त्याला अजय-अतुल यांचे दमदार संगीत लाभले आहे. तर मधुरा दातार, प्रियांका बर्वे आणि विश्वजीत बोरवणकर यांच्या आवाजाने रंगत आणली आहे. दिपाली विचारे यांचे नृत्यदिग्दर्शन असलेला हा ठसकेदार लावणीचा प्रकार आता प्रेक्षकांना भुरळ घालत आहे.
चित्रपटाचे (movie) दिग्दर्शक प्रसाद ओक यांनी सांगितलं की, ‘’ या चित्रपटात आम्ही श्रृंगारीक लावणी, बैठकीची लावणी, सवाल जवाब असे लावणीचे विविध प्रकार हाताळले आहेत. या निमित्ताने लोककलेचा समृध्द वारसा पुन्हा प्रेक्षकांसमोर आणण्याचा प्रयत्न केला आहे. ‘चंद्रमुखी’तील इतर गाण्यांप्रमाणे सवाल जवाबची रंगलेली ही चुरसही रसिकांना भावेल.’’ ‘प्लॅनेट मराठी’चे संस्थापक, प्रमुख अक्षय बर्दापूरकर म्हणतात, ‘’लावणी ही आपली लोककला आहे. ज्यांचे जतन होणे अत्यंत गरजेचे आहे. सवाल जवाबचा प्रकार गेल्या अनेक वर्षांपासून लावणीप्रधान चित्रपटातून कालबाह्य झाला होता. मात्र ‘चंद्रमुखी’च्या माध्यमातून आम्ही तो पुन्हा प्रेक्षकांसमोर आणण्याचा प्रयत्न केला आहे.’’