शाहरुख खानचा ‘मन्नत’ बंगला ट्विटरवर का होतोय ट्रेंड?

बॉलिवूडचा किंग खान अर्थात अभिनेता शाहरुख खानचा (shah rukh khan) मुंबईतील ‘मन्नत’ (Mannat) हा बंगला पर्यटकांसाठी आणि शाहरुखच्या चाहत्यांसाठी जणू पर्यटन स्थळच आहे. मुंबईतील (Mumbai) आणि मुंबईबाहेरील असंख्य चाहते दररोज या बंगल्याबाहेर सेल्फी किंवा फोटो काढतात. सध्या हाच ‘मन्नत’ ट्विटरवर जोरदार ट्रेंड होतोय.
अचानक शाहरुखचा (shah rukh khan)बंगला ट्विटरवर चर्चेत येण्यामागचं कारण काय असा प्रश्न तुम्हालाही पडला असेल. तर यामागचं कारण म्हणजे शाहरुखच्या या बंगल्याची बदललेली ‘नेमप्लेट’. काही चाहत्यांनी नुकतीच ‘मन्नत’ला भेट दिली असून याठिकाणी त्यांनी फोटो काढले. यावेळी त्यांना बंगल्याची नवी नेमप्लेट पहायला मिळाली. याच नेमप्लेटचा फोटो चाहत्यांनी सोशल मीडियावर पोस्ट केला असून शाहरुखच्या अनेक फॅन पेजेसवर तो शेअर केला जात आहे. त्यामुळेच ट्विटरवर ‘मन्नत’ बंगला ट्रेंडमध्ये आहे.
चाहत्यांनी केवळ नव्या नेमप्लेटचा फोटोच शेअर केला नाही तर शाहरुख आणि गौरीच्या या बंगल्याचे आधीचे नेमप्लेटसुद्धा काहींनी शेअर केले. या ट्विट्सनुसार, आतापर्यंत शाहरुखच्या या बंगल्याची नेमप्लेट चौथ्यांदा बदलण्यात आली आहे. ‘मन्नत, लँड्स एंड’ असं या नव्या नेमप्लेटवर लिहिल्याचं पहायला मिळतंय. शाहरुखचा ‘मन्नत’, अमिताभ बच्चन यांचा ‘जलसा’ आणि सलमान खानचा ‘गॅलेक्सी’ या ठिकाणांना भेट दिल्याशिवाय अनेकांचं मुंबई दर्शन पूर्ण होत नाही. शाहरुख त्याच्या वाढदिवशी किंवा इतर काही खास प्रसंगी बंगल्याबाहेर जमलेल्या चाहत्यांची भेट घेतो.
शाहरुख ‘पठाण’ या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. यामध्ये त्याच्यासोबत अभिनेत्री दीपिका पदुकोण, जॉन अब्राह्म आणि डिंपल कपाडिया यांच्या भूमिका आहेत. 25 जानेवारी 2023 रोजी हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. शाहरुखने नुकतीच त्याच्या आणखी एका चित्रपटाची घोषणा केली. दिग्दर्शक राजकुमार हिरानी यांच्यासोबत तो ‘डंकी’ या चित्रपटात काम करणार असल्याचं कळतंय.
हेही वाचा: