भारताचे माजी क्रिकेटपटू सुनील गावसकर यांनी भारतीय क्रिकेट(cricketers) संघाला प्रशिक्षण देणाऱ्या टीमला फैलावर घेतलं आहे. ऑस्ट्रेलियात आयोजित करण्यात आलेल्या बॉर्डर-गावसकर चषक स्पर्धेत भारताचा 1-3 ने दारुण पराभव झाल्यानंतर गावसकरांनी सपोर्टींग स्टाफवर निशाणा साधला आहे. गावसकरांनी आपण प्रशिक्षण देणाऱ्या टीमलाही जाब विचारला पाहिजे असं मत व्यक्त केलं आहे. सीडनीमधील अखेरच्या कसोटीत भारताचा पराभव झाल्यानंतर ते बोलत होते.
1-3 ने भारताचा पराभव झाल्यापासून सातत्याने भारतीय क्रिकेटपटूंवर(cricketers) टीका होत असतानाच गावसकरांनी प्रशिक्षकांनाही तितकाच दोष द्यावा लागेल असं म्हटलं आहे. राहुल द्रविडकडून संघाचं प्रशिक्षकपद हाती घेतल्यानंतर गौतम गंभीरने फलंदाजीचा प्रशिक्षक म्हणून बीसीसीआयला अभिषेक नायरला नियुक्त करण्यास भाग पाडलं.
तसेच गंभीरच्या हट्टापायी बीसीसीआयने रयान टेन डोशेतला फिल्डींग कोच आणि दक्षिण आफ्रिकेचा माजी क्रिकेटर मॉर्ने मॉर्केलला गोलंदाजीचा प्रशिक्षक म्हणून नियुक्त केलं. मात्र या चौघांनाही संघाच्या कामगिरीवर काही विशेष प्रभाव पाडता आल्याचं आतापर्यंत दिसलेलं नाही. यावरुनच गावसकरांनी संताप व्यक्त केला आहे.
“तुमचा कोचिंग स्टाफ काय करतोय?” असा सवाल गावसकरांनी भारतीय संघाच्या कामगिरीबद्दल बोलताना केला आहे. “तुमच्याकडे गोलंदाजीचा प्रशिक्षक आहे. तुमच्याकडे फलंदाजीचा प्रशिक्षक आहे. हे दोघं काय करतात? आपण न्यूझीलंविरुद्ध 46 वर बाद झालो.
इतर सामन्यांमध्येही ज्या पद्धतीने आपल्या फलंदाजांनी बचाव केला ते पाहता फलंदाजीमध्ये काहीच दम नव्हता असेच म्हणावे लागेल. इथे (ऑस्ट्रेलियामध्येही) आपली फलंदाजी फारशी छान किंवा सक्षम म्हणावी अशी झाली नाही. त्यामुळेच त्यांना असा प्रश्न विचारला पाहिजे की, बाबांनो तुम्ही केलं तरी काय? आम्हाला कोणताही सकारात्मक बदल का दिसत नाहीये?” असं गावसकरांनी संतापून म्हटलं आहे.
“आम्ही असंही समजून घेतलं असतं की त्यांची गोलंदाजी फारच उत्तम होती आणि आपल्या फलंदाजांना त्यांच्यासमोर उभेच राहता आले नाही. चांगल्या गोलंदाजांसमोर खेळताना सर्वोत्तम फलंदाजांनाही अडचणीचा सामना करावा लागतो. मात्र गोलंदाजीही फारशी प्रभावी नव्हती.
मग मला सांगावे की प्रशिक्षकांनी नेमकं काय काम केलं? तुम्ही विचाराल की आपण फलंदाजीचा क्रम बदलला पाहिजे का? पण माझं म्हणणं असे आहे आपण सहाय्यक प्रशिक्षकच बदलले तर? इंग्लंडला जाण्याआधी आपल्याकडे अजूनही 2 ते 3 महिन्यांचा कालावधी आहे,” असं गावसकरांनी सूचक पद्धतीने म्हटलं आहे.
“तुम्ही संघासाठी काय केलं असं मी त्यांना (प्रशिक्षकांना) विचारु इच्छीतो. तुम्ही भारतीय क्रिकेटमध्ये सुधारणा व्हावी यासाठी काय प्लॅनिंग केलं आहे? सतत खालीच जात राहिलो तर यातून काहीच मिळणार नाही. तुम्हाला त्यांच्या तंत्रात सुधारणा घडवून आणावी लागेल. जे तुम्ही केलेलं नाही. त्यामुळेच फलंदाजांना तुम्हाला धावा का करता येत नाही असा प्रश्न विचारताना, प्रशिक्षकांनाही तुम्ही काय केलं? असा प्रश्न विचारलाच पाहिजे,” असं गावसकरांनी म्हटलं आहे.
हेही वाचा :
रजनीकांतच्या चाहत्यांसाठी मोठी बातमी; ‘कुली’ चित्रपटाबाबत सामोरे आले रहस्य
धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याचा सस्पेन्स संपला; कॅबिनेट बैठकीला जाण्यापूर्वी स्वतः केला खुलासा
प्रसिद्ध अभिनेत्रीला निर्घृणपणे संपवलं: 15 तुकडे करुन 2 महिने फ्रिजमध्ये लपवले शरीर!