इथे गांजा सहज मिळतो युवा पिढीला पोखरतो

कोल्हापूर/विशेष प्रतिनिधी : गेल्या काही महिन्यांपासून कोल्हापूर शहर आणि आसपासच्या परिसरात गांजाचा (ganja) गाजावाजा सुरू आहे. गांजाच्या आहारी तरुण वर्ग जाऊ लागला आहे आणि आता तर तंबाखूजन्य पदार्थ जसे कोणत्याही पान टपरीवर अगदी सहजपणे मिळतात तितक्याच सहजपणे आता आरोग्याला घातक असणारा गांजा मिळू लागला आहे.

पालकांचे जसे या गंभीर बाबीकडे दुर्लक्ष झाले आहे अगदी तसेच दुर्लक्ष पोलीस प्रशासनाचे सुद्धा झाले आहे आणि त्यामुळेच गांजा(ganja) विक्रीचा व्यवसाय जोर धरू लागला आहे. देशी आणि विदेशी दारूच्या तुलनेत गांजाची नशा स्वस्त असल्यामुळे”गांजेकस”तरुणांची संख्या दिवसेंदिवस वाढू लागली आहे. कोल्हापूर पोलिसांनी आता गांजा विक्री विरोधी, गांजाच्या आयाती विरोधी भूमिका घेऊन प्रत्यक्ष कारवाईला सुरुवात केली असली तरी त्यांनी उचललेले हे पाऊल थोडे उशिराचे झाले आहे असे दुर्दैवाने म्हणावे लागेल.

हिंदू धर्मामध्ये देवाच्या नावाने नदीत परडी सोडली जाते किंवा रस्त्यावरच्या तीकटीवर, गावकुसाबाहेर, निर्मनुष्य ठिकाणी खर्डी मध्ये उतारा ठेवण्याची प्रथा आहे. एका विशिष्ट नावाच्या देवाला नैवेद्य द्यायचा असेल किंवा परडी सोडावयाची असेल तर त्यामध्ये गांजा ठेवला जातो. हा धार्मिक विधीचा भाग समजून घरामध्ये दहा ग्रॅम गांजा ठेवण्याची अनुमती हिंदू धर्मीयांना देण्यात आलेली आहे. पण परवानगी असली तरी कुणीही आपल्या घरात अशा प्रकारे गांजा ठेवत नाहीत.

परडी साठी किंवा उताऱ्यावर ठेवण्यासाठी गांजा(ganja) हवा असेल तेव्हा पूर्वी तो बिंदू चौकात मिळायचा. तिथे काही फकीर गांजा ओढत बसायचे. त्यांना दोन चार रुपये दिले की थोडासा गांजा मिळायचा. तेव्हा गांजा हा ठराविक मंडळीच ओढायचे. त्यामुळे गांजाची चर्चा होत नसे. या मंडळींना हा गांजा कुठून मिळायचा हे समजायचे नाही. कारण त्याची चौकशी करण्याची वेळ यावी असे गंभीर काही घडत नव्हते. नशिबात तरुणाई गांजाकडे आकर्षित तेव्हा झालेली नव्हती. काही वर्षांपूर्वी कोल्हापुरात ब्राऊन शुगरचे व्यसन काही तरुणांना जडले होते.

ही नशा मुंबईत मोठ्या प्रमाणावर केली जायची. पण त्याचे लोन कोल्हापूर सह उर्वरित महाराष्ट्रात आले नव्हते. पण अचानक ब्राऊन शुगरची नशा करणारे तरुण आढळून आले. या ब्राऊन शुगर बद्दल पालकांनी पोलिसांकडे तक्रार केल्यानंतर पोलिसांनी त्याची गांभीर्याने दखल घेऊन तपास सुरू केला. महापालिकेच्या जवळ असलेल्या गल्लीमध्ये काहीजण हा नशीला पदार्थ महाग किमतीने विकत होते.

लक्ष्मीपुरी पोलिसांनी त्यांच्या मुस्क्या आवळल्यानंतर, अशा प्रकारची नशा करण्याचे प्रमाण कमी झाले. त्यानंतर कोल्हापूर शहर आणि आसपासच्या परिसरात, उपनगरामध्ये हुक्का पार्लर हा नवीनच प्रकार सुरू झाला. त्यावरही पोलिसांनी धाडी घेतल्यानंतर हुक्का पार्लर आज शोधूनही सापडत नाहीत.

गेल्या दोन-तीन वर्षा पासून गांजाची नशा करणाऱ्या तरुणांची संख्या वाढू लागली. दिग्विजय पेट्रोल पंपा नजीकच्या रस्त्यावर गांजा ओढणाऱ्या तरुणांची टोळकी वाढू लागली. नंतर अशा प्रकारची गांजाची नशा करणारे तरुण शहराच्या इतर भागातही दिसू लागले. आणि गेल्या काही महिन्यांपासून तर गांजाची(ganja) विक्री जोरात सुरू झाली. इतक्या मोठ्या प्रमाणावर गांजाची आयात होत असताना पोलीस मात्र अनभिज्ञ होते. किंबहुना गांजाची विक्री आणि गांजाची नशा करणारे तरुण इकडे पोलीस प्रशासनाचे कमालीचे दुर्लक्ष झाले आणि हळूहळू गांजाचा गाजावाजा वाढू लागला. त्यानंतर मात्र पोलीस प्रशासन खडबडून जागे झाले आणि त्यांच्याकडून तपास सुरू झाला. गांजाची आयात करणारे लोक पोलिसांना सापडू लागले. हा गांजा नेमका कुठून येतो इथपर्यंत मात्र पोलीस अद्याप पोहोचलेले नाहीत.

देशी आणि विदेशी दारूच्या किमती वाढू लागल्या. ही नशा खिशाला परवडणारी नव्हती. म्हणून मग दारूच्या किमतीच्या तुलनेत स्वस्त नशा म्हणून गांजाकडे व्यसनी लोक आकर्षित होऊ लागले. गांजाची नशा बराच वेळ रेंगाळत राहते. गांजा ओढल्याचा वास येत नाही. भूक चांगली वाढते. यामुळे गांजेकस तरुणांची संख्या नजरेत भरावी इतक्या प्रमाणात वाढू लागली. आता या गांजाच्या व्यसनातून तरुणाईला बाहेर कसे काढायचे हाच मोठा प्रश्न आहे. कोणत्याही मार्गाने गांजाची आयात कोल्हापुरात किंवा जिल्ह्यात होऊ नये याची काटेकोरपणे खबरदारी पोलिसांनी घेतली तर या नशेतून तरुणाई बाहेर येईल.

अन्यथा जोपर्यंत गांजा(ganja) सहजपणे मिळतो तोपर्यंत त्याची नशा करणाऱ्यांची संख्या कमी होणार नाही. गांजाची कहाणी अगदी सुरस आहे. महाराष्ट्रात अहमदनगर येथे अर्थात आत्ताच्या अहिल्यानगर येथे गांजाची निर्मिती मोठ्या प्रमाणावर केली जात असे. ब्रिटिश काळात गांजा वनस्पतीची लागवड ही कायदेशीर समजली जात होती. पश्चिम बंगालमध्ये गांजाची शेती परवाना घेऊन केली जात असे. या गांजा लागवडीपासून ब्रिटिश सरकारला महसूलही मिळत होता. स्वातंत्र्योत्तर काळात गांजा लागवडीवर कायद्याने बंदी घालण्यात आली.

ज्याला वनस्पतींचे ज्ञान आहे, जो शेतकरी आहे त्याला गांजा वनस्पती ओळखता येते. सर्वसामान्य माणसाला मात्र ही वनस्पती ओळखता येत नाही. उभ्या पिकात अगदी चोरून या वनस्पतीची लागवड केली जाते. गांजा ही वनस्पती कशी ओळखायची याचे मार्गदर्शन पोलिसांना सुद्धा केले जातेच असे नाही. एखाद्या जाणकार माणसाला सोबत घेऊनच पोलीस गांजा लागवडीचा शोध घेतात.

हेही वाचा :

महाशिवरात्रीपासून या राशीच्या लोकांना मिळणार भरपूर पैसा, यश आणि वैवाहिक सुख

किल्ल्यावर एकही अतिक्रमण राहणार नाही; शिवजयंतीला मुख्यमंत्री फडणवीसांचा शिवनेरीवरुन शब्द

हात आणि पायांच्या बोटांना सूज येते वेदना होतात मग ही लक्षणे असू शकता काय कराल