मराठ्यांना खुशाल आरक्षण द्या, पण त्यांच्या जमिनी अन् कारखाने आमच्या नावावर करा; ओबीसी बांधव खवळले

राज्य सरकारने ओबीसी आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला(reservation system) स्वतंत्र प्रवर्गातून आरक्षण द्यावं. तसेच सगेसोयरे अधिसूचना लागू करू नये, अशी मागणी करत ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाके उपोषणाला बसले आहेत. गेल्या १० दिवसांपासून जालना जिल्ह्यातील वडीगोद्री येथे त्यांचं उपोषण सुरू आहे. हाके यांच्या या उपोषणाची धग आता खेड्यापाड्यात पसरली आहे. अनेक ओबीसी बांधवांनी त्यांना जाहीर पाठिंबा दिला आहे.

बीडच्या आष्टी तालुक्यातील खिळद येथील ओबीसी(reservation system) बांधवांनी हाके यांच्या समर्थनार्थ आमरण उपोषण सुरू केलं आहे. गेल्या ३ दिवसांपासून हे उपोषण सुरू असून प्रशासनाकडून अद्याप या उपोषणाची दखल घेण्यात आलेली नाही. त्यामुळे ओबीसी बांधव आक्रमक झाले आहे. मराठा समाजाच्या आरक्षणाला आमचा विरोध नाही. पण त्यांना स्वतंत्र आरक्षण द्यावं, अशी मागणी आंदोलकांनी केली आहे.

राज्य सरकारला जर मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण द्यायचं असेल, तर त्यांच्या जमिनी आणि कारखाने आमच्या नावावर करावेत, असं आव्हान पाटण येथील आंदोलकांनी सरकारला दिलं आहे. यावेळी त्यांनी सरकारविरोधात घोषणाबाजी देखील केली आहे. दुसरीकडे हाके यांना पाठिंबा देण्यासाठी नांदेड येथून मोठ्या प्रमाणावर ओबीसी बांधव वडीगोद्रीकडे रवाना झाले आहेत.

शुक्रवारी लक्ष्म हाके यांच्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी कंधार, लोहा तालुक्यातून तब्बल २०० गाड्यांचा ताफा वडीगोद्रीकडे रवाना झाला होता. आज नांदेडच्या भोकर तालुक्यातून जवळपास २५० गाड्यांचा ताफा वडीगोद्रीकडे रवाना झाला आहे. राज्य सरकारने सगेसोयरेचा जीआर काढू नये, ओबीसी आरक्षणामधून इतरांना आरक्षण देण्यात येऊ नये, अन्यथा रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन करणार असा इशारा या ओबीसी बांधवांनी दिला आहे.

दुसरीकडे मुंबईत बैठक घेतल्यानंतर राज्य सरकारचं शिष्टमंडळ आज लक्ष्मण हाके यांची भेट घेणार आहे. या शिष्टमंडळात मंत्री छगन भुजबळ, गिरीश महाजन, अतुल सावे, उदय सामंत, धनंजय मुंडे, संदीपान भुमरे, गोपीचंद पडळकर आणि प्रकाश शेंडगे यांचा समावेश असेल. त्यामुळे आज हाके यांच्या उपोषणावर तोडगा निघणार का? याकडे सर्वांचं लक्ष लागून आहे.

हेही वाचा :

3,300 वर्षांपूर्वीच्या जहाजाचा समुद्रात शोध

पेपर लीक करणाऱ्यांना जबर दंडाचा फटका 10 वर्षांचा कारावास ते 1 कोटींचा दंड..

धावत्या कारमध्ये स्विमिंग पूल बनवणे पडले महागात!