‘कुणी जमुना, कुणी घ्या लेमन’; वेगवेगळ्या फ्लेवर्समधील ‘लय भारी’ चहा

Tea

जाऊ दे याఽఽर, आता त्याला काही बोलू नको, सकाळी वॉकिंगला गेल्यावर कॅन्टीनमध्ये चहा(Tea) घेत समजावून सांगू…गडबडीत कशाला सांगतोय, दुपारी जमुना घेत प्लॅनिंग करूयात…सोलापुरात हे संवाद सर्रास कानावर पडतात..चहाशौकीन सोलापूरकरांचं असं सारं कॅन्टीनवरच ठरतं.

आता अचानक चहाचा विषय कशाला? तुम्हाला प्रश्न पडला असेल.. आंतरराष्ट्रीय चहा दिवस आहे ना शनिवारी, म्हणूनच हे चहापुराण. काही शक्कल लढवायची असेल, कुणाला काही सुनावायचे असेल अथवा उगीचच गप्पा मारायच्या असतील तर आमचे सोलापूरकर थेट कॅन्टीनचा रस्ता धरतात..बरं आवडीनं चहा पिणाऱ्यांची संख्याही काही कमी नाही..रामलाल चौकात राहणाऱ्या एखाद्याला जर जमुना किंवा उकाळा प्यायची हुक्की आली तर तो आपली गाडी काढेल, चौपाडातील मित्राला मागे बसवले अन जाईल चाटी गल्लीत. ‘जमुना’ घ्यायला.. शशिकांत पवार यांनी या स्पेशल चहाचं नाव ‘गंगा जमुना’ ठेवलंय. लोक त्याला जमुना म्हणतात.. चहामध्ये कधी काळे मिरे असतात का? पण ‘जमुना’मध्ये असतात. शिवाय वेलची, जायफळ, अद्रक अन लवंगही! एक एक घोट अगदी तरतरी आणणारा. चाटी गल्लीतील व्यापाऱ्यांच्या व्यवसायाचा प्रारंभ हा चहा घेतच होतो.. उकाळा प्यायचा असेल तर बदाम, पिस्ता अन् विलायचीची चव तुम्हाला खूष करून टाकते.

अमृततुल्य चहा(Tea) तर साऱ्या शहरवासींना ठाऊक आहे. एखादा चहाप्रेमी कधी काळी मशीद, पत्रा तालीम, एसटी स्टँडवर आला की, संतोष पवारांच्या ”अमृततुल्य”ची टेस्ट घेतोच. या चहाचं कॉम्बिनेशन इतकं अनोखं की, ही चव फक्त इथेच घेता येते.. जणू अमृतच.
”रा बावा”… म्हणत पूर्व भागातील सरगम कॅन्टीनमध्ये सर्वांचे सन्मानपूर्वक स्वागत होते. नागेश सरगम यांच्या या कॅन्टीनमध्ये दररोज गप्पांची मैफल रंगते. राजकारणावर तर जोरजोरात चर्चा होते. इथे तुम्हाला लेमन, ग्रीन चहा तर मिळतोच, पण कोरोनाचा दुश्मन आयुष काढाही मिळतो.

दोन घागरी चहा !

इंद्रभुवनाच्या पाठीमागे शुभराय गॅलरीजवळ लक्ष्मीबाई डुंबाळे यांची कॅन्टीन आहे. त्या सकाळपासून अविरत चहा तयार करत असतात. त्यांच्या लेमन चहाचं गिऱ्हाईकच हटत नाही..काळ्या चहामध्ये अद्रक, पुदिना अन लिंबाच्या चकतीनं सजवलेला चहाचा कप पाहिला की, टेस्टची आयडिया येते..एक तिथं दोन कप चहा पिला जातो..दिवसात दोन घागर चहा विकला जातो..लक्ष्मीबाई सांगत होत्या. माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे अन युवा नेते रोहित पवार यांनीही त्यांचा चहा घेऊन कौतुक केलं.

शहरातील ‘टी’ स्पॉट

सोलापुरात चहाचे अनेक लोकप्रिय ठिकाणं आहेत..सात रस्ता चौकात आलं की, ‘इंडिया’चा चहा भर रस्त्यावर उभे राहून पिल्याशिवाय अस्सल चहाशौकीन पुढे जातच नाही..तिथलं बूस्टही छान असतं.
जर तुम्हाला मधुमेह आहे आणि थोडा गोड चहा(Tea) घ्यायचा आहे, तर ‘जी’ चा लाईट चहा प्यायला आसरा चौकात यावेच लागेल.
जिल्हा परिषदेच्या आवारात लॉकडाऊन पूर्वी खजूर चहा मिळायचा आता तो नाही, पण तिथला लेमन चहाही मस्त आहे.
बेगम पेठेतील इराणी चहाही खास आहे. पण तुम्हाला रात्री दहानंतर बाहेरचा फक्कड चहा पिण्याची इच्छा झाली तर बिनधास्त विजापूर वेसेत या. त्यानंतर अपरात्रीही चहा प्यायचा असेल तर बारा इमाम चौकातील मोहोळकर कॅन्टीन तुमच्या सेवेला सज्ज असेल.

Smart News:-

राज ठाकरेंच्या उद्याच्या सभेचे टिझर पे टिझर, पिक्चर अभी बाकी है..;


आता फोन आल्यावर नंबरसह केवायसीनुसार नावही दिसणार..!


टाकळीत दोन मोटारींचा भीषण अपघात, ‘एअर बॅग’मुळे सहाजणांचे जीव वाचले!


सांगली :आपत्ती व्यवस्थापन प्रात्यक्षिके झाली, आता गाठोडे बांधा…!


Leave a Reply

Your email address will not be published.