चारशे वर्षानंतरही तुकोबांचे अभंग दिशादर्शक

Smart News:- श्री संत तुकाराम महाराज म्हटले की, त्यांचे अभंग डोळ्यासमोर उभे राहतात. आपल्या अभंगातून त्यांनी समाजाला दिशा दिली. समाजातील वाईट प्रवृत्ती दूर करून प्रबोधन केले. विठ्ठल भक्त असलेल्या तुकोबारायांचे विचार प्रेरणादायी आहेत. या महान संतांचा जन्म महाराष्ट्रातीलच एका गावात झाला. जाणून घेऊ त्यांच्या गावाविषयी.
पुणे जिल्ह्यातील पुणे शहरापासून पंचवीस किलोमीटर अंतरावर असलेल्या श्री क्षेत्र देहू येथे सोळाव्या शतकात तुकोबारायांचा जन्म झाला (माघ शुद्ध पंचमी). पंढरपूरचा पांडुरंग हे त्यांचे दैवत. तुकोबारायांनी अनेक अभंग लिहिले, त्यातून विविध गोष्टींवर परखड भाष्य केले. चारशे वर्षानंतरही त्यांचे अभंग दिशादर्शक ठरत आहेत. देहूतील इंद्रायणी नदीलगत असलेल्या मुख्य देऊळवाड्याच्या उजव्या बाजूलाच तुकोबारायांचे राहते घर आहे. येथे तुकोबारायांची मूर्ती असून दररोज पूजा होते. दर्शनासाठी हे घर खुले असते. अनेक भाविक याठिकाणी येत असतात.
घरापासूनच जवळ असलेल्या देऊळवाड्यात विठ्ठल रुक्मिणीची स्वयंभू मूर्ती आहे. तुकोबारायांनी याच मूर्तीची भक्ती केली. येथे भजन, कीर्तन करायचे. या मूर्तीसमोरच भव्य भजनी मंडप असून आजही येथे राम कृष्ण हरीचा गजर सुरु असतो. या मंडपावर देवदेवतांच्या मुर्ती कोरल्या आहेत. संपूर्ण देऊळवाडा दगडात बांधलेला आहे. या देऊळवाड्यात तुकोबारायांच्या शिळा मंदिरासह गणपती, हनुमान, श्रीराम व महादेवाचेही मंदिर आहे. शिळा मंदिरातील शिळा म्हणजे म्हणजेच तुकोबारांयांची गाथा इंद्रायणी नदीत बुडविल्यानंतर तुकोबाराय ज्या शिळेवर (पाषाण) अनुष्ठानाला बसले होते ती शिळा होय. ही शिळा आजही या मंदिरात आहे. सध्या या मंदिराच्या जीर्णोद्धाराचे काम सुरु आहे. लाखो भाविक या शिळेवर नतमस्तक होतात.
देऊळवाड्याला तीन भव्य महाद्वार असून त्यावर नगारखाना आहेत. आजही येथे पहाटे व सायंकाळी चौघडा वादनची सेवा दिली जाते. पश्चिम दरवाजातून पवित्र इंद्रायणी नदीचे दर्शन होते. तसेच येथूनच घोरावडी, भांडारा व भामचंद्र डोंगर नजरेस पडतात. तर उत्तर दरवाजातून बाहेर पडताच समोरच तुकोबारायांचे चिरंजीव पालखी सोहळ्याचे जनक तपोनिधी नारायण महाराज यांची समाधी आहे. येथूनही इंद्रायणी नदीकडे जाण्यास मार्ग आहे. तसेच देऊळवाड्यात वड, पिंपळ व उंबर हे तीन भव्य वृक्षही आहेत. त्यालगतच तुकोबारांयांचा हस्तलिखित गाथाही येथे पहायला मिळतो. देऊळवाडा व तुकोबारायांचे घर या दोन्हीच्या मध्ये इनामदार वाडा आहे. आषाढी वारीसाठी तुकोबारायांची पालखी मार्गस्थ झाल्यानंतर पहिला मुक्काम या वाड्यात असतो. येथेही दर्शनासाठी गर्दी असते.
देऊळवाड्यातून बाहेर पडल्यानंतर डाव्या बाजूला जाणाऱ्या रस्त्याने काही अंतर गेल्यानंतर वैकुंठगमनस्थान आहे. येथून तुकाराम महाराजांचे फाल्गुन वद्य द्वितीयेला वैकुंठगमन झाले अशी श्रद्धा आहे. तो दिवस म्हणजेच तुकाराम बीज. दरवर्षी मार्च महिन्यात येणारी तुकाराम बीज मोठया उत्साहात साजरी केली जाते. राज्याच्या कानाकोपऱ्यातून लाखो भाविक या सोहळ्यासाठी हजेरी लावतात. आठ दिवस अगोदरच ठिकठिकाणी हरिनाम सप्ताह सुरु असतात. विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. बीजेच्या दिवशी सकाळी दहाच्या सुमारास मुख्य देऊळवाड्यातून तुकोबारायांची पालखी हरिनामाच्या गजरात वैकुंठगमन स्थानाकडे मार्गस्थ होते. त्याठिकाणी ‘वाढ वेळ झाला उभा पांडुरंग, वैकुंठा श्रीरंग बोलावितो’ या अभंगावर कीर्तन सुरु असते. बरोबर दुपारी बारा वाजता वैकुंठगमनाचा मुख्य सोहळा पार पडतो.
हा सोहळा याचि देही याचि डोळा अनुभवण्यासाठी इंद्रायणी तिरी लाखो भाविक जमलेले असतात. नजर जाईल तिकडे वैष्णवांचा मेळा नजरेस पडतात. येथे तुकोबारायांचे मंदिर असून त्यामध्ये विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती आहे. मंदिरासमोरच नंदुरकीचा भव्य वृक्ष असून या वृक्षाला अनन्य साधारण महत्व आहे. तुकाराम बीजेच्या दिवशी वैकुंठगमन प्रसंगी या वृक्षाची पाने सळसळतात, अशी भाविकांची श्रद्धा आहे. त्यामुळे या वृक्षाचे दर्शन घेण्यासाठी भाविक गर्दी करतात. येथे काही वर्षांपूर्वीच तुकोबारायांच्या जीवनावरील म्युरल्स साकारले आहेत. तसेच शेजारीच भव्य भक्त निवासही उभारले आहे. या मंदिरापासून डाव्या बाजूला एक किलोमीटर पुढे गेल्यानंतर इंद्रायणी नदीच्या तीरालगत छोटे मंदीर आहे. येथे तुकोबारायांच्या गाथा बुडविल्याची आख्यायिका आहे. येथील मंदिरात विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती आहे. तुकोबाराय येथे ध्यानाला येत असत. येथे त्यांनी अनेक अभंग रचल्याचे बोलले जाते. येथे चिंचेचा मोठा वृक्ष
असून येथील वातावरण नेहमीच प्रसन्न असते. अनेकजण दर्शनासाठी येतात.
काही वर्षांपूर्वी या मंदिरपासून जवळच नवीन गाथा मंदीर उभारण्यात आले आहे. मंदिरात प्रवेश करताच तुकोरायांच्या भव्य मूर्तीचे दर्शन होते. येथे तुकोबारायांच्या गाथेतील अभंग संगमरवरावर कोरले असून त्यांच्या जीवनातील चांगले-वाईट प्रसंगही साकारण्यात आले आहेत. भक्त निवास, ध्यान मंदीरही आहे.तसेच तुकोबाराय ज्या डोंगरावर ध्यानाला जायचे. ते डोंगरही देहूपासून काही अंतरावरच आहेत. भंडारा डोंगर सात किलोमीटर, घोरवडी आठ तर भामचंद्र डोंगर अकरा किलोमीटरवर आहे. येथेही तुकोबारायांचे मंदिर आहेत. देहूत दर्शनाला येणारे भाविक येथेही भेट देत दर्शन घेतात. काही भाविक महिन्याच्या प्रत्येक एकादशीला देहूत दर्शन घेऊन पायी तिन्ही डोंगराची प्रदक्षिणा पूर्ण करतात.
तुकोबारायांनी पंढपूरच्या पांडुरंगाची भक्ती केली. त्यांनी दरवर्षी आषाढी पायी वारी केली. ही परंपरा आजही अखंड सुरु आहे. श्री क्षेत्र देहूतून दरवर्षी आषाढी वारीसाठी तुकोबारायांचा पालखी सोहळा लाखो भाविकांसह पंढरीकडे मार्गस्थ होतो. राज्याच्या कानाकोपऱ्यातील , विविध भागातील शेकडो दिंड्या या सोहळ्यात सहभागी होतात. अबाल वृद्धांचा यामध्ये समावेश असतो. भक्ती, शिस्त, आपुलकी, प्रेम अशा अनेक गोष्टी यामध्ये पाहायला मिळतात. दिंड्याचे अजोड व्यवस्थापन व कुटूंबासारखे सर्व नियोजन असते. प्रत्येकाला लाडक्या विठुरायाच्या भेटीची ओढ असते. वीस दिवसांच्या या भक्तिरसाच्या सोहळ्यात भाविक न्हाऊन निघतात.
Smart News:-
कार्यकर्ते ट्रॅफिकमध्ये अडकले, राज ठाकरेंनी भाषणाची वेळ बदलली
राज ठाकरे देखील ‘या’ ग्रुपच्या डान्सचे फॅन, मराठी लोकांना केलं आवाहन
मुंबईकरांवरचं प्रेम कामातून दिसलं पाहिजे, मेट्रोच्या श्रेयवादावरून मुख्यमंत्र्याचा भाजपवर निशाणा
विनाहेल्मेट प्रवास करणाऱ्यांवर होणार धडक कारवाई..!