त्याग म्हणजे सहयोगाची भावना

Smart News:-त्याग म्हणजे सहयोगाची भावना

Smart News:- स्थितप्रज्ञ होण्यासाठी ज्या गोष्टी लागतात त्यांतली पहिली गोष्ट आहे त्याग (sacrifice). त्यागाचा साधासरळ अर्थ आहे दूर सारणे. दूर करणे. सोडणे. यात अनेक नावडत्या गोष्टी आपल्याला सोडायच्या आहेत. त्यांचा त्याग करायचा आहे. आणि आवडत्या गोष्टींचाही त्याग करायचा आहे. नावडत्या गोष्टी सोडणं सोपं असतं. पण आवडत्या गोष्टी सोडणं कठीण असतं.

अगदी त्या वाईट असल्या तरी आपल्याला सोडवत नाही. उदा. व्यसन किंवा वाईट सवयी. त्या सुटता सुटत नाहीत. कारण त्या आपल्याला आवडतात. आळशीपणा आवडतो. सकाळी उठण्याचा कंटाळा येतो. कारण रात्री आपण टीव्ही-मोबाईलमध्ये रात्र घालवलेली असते. त्यांचा अतिरेक वाईट आहे हे माहित असूनही त्यांचा मोह सुटत नाही. जेवतांनाही मोबाईल लागतो, संडासातही मोबाईल लागतो लोकांना. त्याग कसा करायचा हे समजण्याआधी त्याग म्हणजे काय हे देखील सांगायला पाहिजे. अलिकडे आपल्याला त्याचाही विसर पडला आहे.

आपल्याकडे म्हण आहे, एक तीळ सात जणांमध्ये वाटून खाणे. त्याचा शब्दशः अर्थ घेऊ नका. भावार्थ घ्या. म्हणजे वाटून घेणे हे यात महत्त्वाचे आहे. एक भाकर असेल तर दोघांत अर्धी अर्धी खा. असा त्याचा अर्थ. वाटून घेण्यासाठी आपल्याला आपला हक्क सोडावा लागतो. त्याग तिथे येतो. काहीतरी सोडणे ज्याच्यामुळे कोणालातरी उपयोग होईल, काही चांगलं काम घडू शकेल. आईवडील आपल्या मुलांसाठी त्याग करतात. स्वतः उपाशी राहतील, पण मुलांना खाऊ घालतील.

स्वतः ज्या गोष्टी त्यांना करता आल्या नाहीत त्या गोष्टी मुलांसाठी करतील. त्यासाठी हवे ते कष्ट उपसतील. मोठे बहिण भाऊ लहान भावाबहिनींसाठी असाच त्याग करतात. त्याची कितीतरी उदाहरणं तुम्हालाही माहित आहेत. पण अलिकडे ही त्यागाची भावना स्वार्थी त्यागात उतरली आहे. त्यागासाठी वाटून घ्यावं लागतं हे वरती सांगितलंय. त्यांतूनच सुख-दुःख वाटून घेण्याची संकल्पना आली. सुख वाटलं तर वाढतं आणि दुःख वाटलं तर कमी होतं. आता मात्र आपण वेगळा अर्थ घेतोय त्याचा.

आपण स्वतःचं सुख वाटून घेत नाही इतरांसोबत. परके सोडाचा, आपले मित्र नातेवाईक रक्ताच्या भावाबहिणींसोबत आईवडीलांसोबतही आपण आपलं सुख वाटून घेत नाही. पण त्याचवेळी इतरांच्या सुखात आपल्याला वाटा हवा असतो. आपण इतरांचं दुःख वाटून घेत नाही पण आपलं दुःख इतरांनी वाटून घ्यावी अशी मात्र आपली अपेक्षा असते.

त्याग राहिला नाही. स्वार्थ उरलाय केवळ. त्यामुळे आपले नातेसंबंध प्रचंड बिघडले आहेत. आपण त्याग करायला तयार नाही, तडजोड करायला तयार नाही. मग नाती टिकणार तरी कशी? जरा विचार करा की स्वातंत्र्यासाठी ज्या हजारो लोकांनी आपल्या आयुष्याचा त्याग केला त्यांनीही केवळ आपला स्वार्थ पाहिला असता तर आपल्याला स्वातंत्र्य लाभलं असतं का? आपल्या आईवडीलांनी गरीबीत दिवस काढले पण आपल्यासाठी त्यांनी एक चांगलं भविष्य निर्माण करण्याची संधी मिळवून दिली.

पण आपण पैसा मिळताच हे सारं विसरलो. आणि पैसा सहज मिळाला की त्याची किंमत राहत नाही. तुमच्या मुलांमध्ये त्यागाची भावना वाटून घेण्याची भावना येणार नाही. लहान मुलाला जर मोठ्या भावाचे कपडे वापरायला सांगितले तर त्याला वाईट वाटेल त्याचा अपमान वाटेल. त्याचा मोठा भाऊही त्याच्यासाठी काही करण्याची शक्यता कमीच आहे. कारण त्यालाही सारं सहज मिळालं आहे. त्याग काय असतो हे त्याला आम्ही शिकवलं नाही. दोष आमचाही आहे.

त्यागाची भावना जर आपल्या रोजच्या जगण्यात नसेल, घरच्या वागण्यात नसेल तर समाजातही देशातही ती भावना उतरत नाही. आम्ही बसने प्रवास केला तर गरजू लोकांना आपली जागा सोडायलाही तयार नसतो. एखाद्या गरजू माणसाला पैशांची थोडी मदत करायलाही तयार नसतो. आपलं सुख आपल्या जवळची जास्तीची गोष्ट एखाद्यासोबत जर आपल्याला वाटून घेता येत नसेल तर आपण करोडो रुपये कमावले तरीही त्याला काहीच अर्थ नाही. तुम्ही कोट्यधीश व्हाल पण माणूस म्हणून तुम्ही भिकारीच रहाल. आपण सुदामाच्या मुठभर पोह्याची आजही आठवण ठेवतो. कारण त्याच्याकडे तेवढेच पोहे होते. तेही त्याने आपल्या मित्राला देऊन टाकले.

रावणाची लंका सोन्याची होती म्हणे. पण त्याची आठवण आपल्याला राहत नाही. त्याचा उल्लेखही फारसा करत नाही. रावणानं कधी दानधर्म केल्याचं आठवत नाही. कर्ण आठवतो. ज्यानं सर्वस्वाचा त्याग केला. बाजीप्रभू आठवतो. तानाजी आठवतो. भगतसिंह आठवतो. त्यागाचा अर्थ विसरू नका. नावडत्या गोष्टी सोडाच. पण ज्या आवडत्या गोष्टींमुळे तुमचं नुकसान होत असेल त्याचाही त्याग करा. आणि लोकांच्या देशाच्या भल्यासाठी अनेक चांगल्या गोष्टींचा त्याग करण्याचीही तयारी ठेवा.

ज्या क्षणी अर्जुनाने आपले गुरू बंधू नातेवाईक यांच्या विषयीच्या मायाममतेचा त्याग केला, तेव्हाच तो युद्धासाठी सज्ज होऊ शकला. कर्तव्यापुढे मोहत्याग करावाच लागतो. आयुष्यात प्रगती करायची असेल तर या त्यागाची सवय लावून घ्या. कारण काहीतरी दिल्याशिवाय काही मिळत नाही. काही सोडल्याशिवाय काही धरताही येत नाही हे कधी विसरू नका.

 

Smart News:-

NCB: 500 कोटी रुपयांच्या हेरॉईन ड्रग सह ९ जणांना अटक


नाशिक जिल्‍ह्यात ‘रोहयो’ अंतर्गत २२ हजार मजुरांच्या हाताला काम


गायक सिद्धू मूसेवाल हत्ये प्रकरणी 6 जणांना पंजब पोलीसांच्या ताब्यात


सैन्यातील अधिकाऱ्यावरच जातपंचायतीचा बहिष्कार, कोल्हापुरातील धक्कादायक प्रकार


मुंबई : सीजन हॉटेलमध्ये 7 वर्षांच्या मुलीचा कुजलेला मृतदेह

Leave a Reply

Your email address will not be published.