उन्हाळ्यात टायफॉइडच्या या लक्षणांकडे दुर्लक्ष करू नका

health news- ऋतु बदलामुळे किंवा प्रतिकूल हवामानामुळे बऱ्याचदा संसर्गजन्य आजारांचा सामना करावा लागतो. या आजारांची सर्दी, खोकला, थंडी, ताप ही सर्वसामान्य लक्षणं असू शकतात. जीवाणू किंवा विषाणूंमुळे असे आजार होण्याचा धोका असतो. टायफॉइड अर्थात विषमज्वर हा असाच एक संसर्गजन्य आजार आहे. जगभरातील लोकांना या आजाराचा धोका आहे. सर्वसाधारणपणे उन्हाळ्यात टायफॉइडचा धोका अधिक असतो. या आजारामुळे रुग्णांमध्ये अनेक बदल आणि समस्या दिसून येतात. लक्षणं दिसू लागल्यावर वेळीच उपचार केले तर या आजारामुळे निर्माण होणारा संभाव्य धोका टळू शकतो. त्यामुळे टायफॉइडची लक्षणं आणि त्यावरील उपचारांबाबतची माहिती असणं आवश्यक आहे.
टायफॉइड हा साल्मोनेला टायफी (Salmonella typhi) या बॅक्टेरिया अर्थात जीवाणूमुळे होतो. साल्मोनेला टायफी हा जीवाणू सर्वसामान्यपणे दूषित पाणी, दूषित अन्न किंवा संसर्ग झालेल्या व्यक्तीच्या संपर्कात आल्याने पसरतो. दरवर्षी जगभरातले 27 दशलक्षांपेक्षा अधिक लोक या आजाराचा सामना करतात. भारत, आग्नेय आशिया, आफ्रिका, दक्षिण अमेरिकेसह अनेक देशांमध्ये या आजाराचा अधिक धोका आहे. त्यातही लहान मुलांना (Children) टायफॉइडचा धोका अधिक असतो.(health news)
मुलांमध्ये या आजाराची लक्षणं प्रौढ व्यक्तींच्या तुलनेत कमी असतात. टायफॉइड झालेल्या बहुतेक रुग्णांवर अॅंटिबायोटिकच्या (Antibiotic) मदतीनं उपचार सुरू केले जातात. त्यामुळे त्यांना काही दिवसांत बरं वाटू लागतं. टायफॉइडच्या गुंतागुंतीमुळे फार कमी लोकांचा मृत्यू होऊ शकतो. टायफॉइड तापावर लस केवळ अंशतः प्रभावी आहे. ही लस सामान्यतः अशा लोकांसाठी असते, ज्यांना कदाचित या रोगाची लागण झालेली असते किंवा जे अशा ठिकाणी प्रवास करत असतात, जिथं टायफॉइड ताप सामान्य आहे.
टायफॉईड अर्थात विषमज्वराची लक्षणं सर्वसाधारणपणे अन्य संसर्गजन्य आजारांप्रमाणे असू शकतात. त्यात तीव्र ताप जो 104.9 फॅरेनहाइट किंवा 40.5 अंश सेल्सिअसपर्यंत असतो. डोकेदुखी, पोटदुखी, बद्धकोष्ठता किंवा जुलाब होणं, थकवा, अशक्तपणा, स्नायूंमध्ये वेदना होणं, घाम येणं, कोरडा खोकला, भूक न लागणं, अंगावर व्रण उठणं, पोटाला सूज येणं या लक्षणांचा समावेश असतो.
टायफॉइडपासून बचाव करण्यासाठी काही उपाययोजना करणं आवश्यक आहे. पिण्याचं पाणी स्वच्छ असावं, स्वच्छता, योग्य उपचार आणि देखभाल केल्यास टायफॉइडचा ताप नियंत्रणात येऊ शकतो. टायफॉइडचा ताप कमी होण्यासाठी लस हा सर्वोत्तम उपाय आहे.
टायफॉइड तापाचा धोका अधिक असलेल्या भागात तुम्ही प्रवास करणार असाल तर लस घेणं आवश्यक आहे. गरम पाणी आणि साबणानं हात धुवावेत. कच्चे पदार्थ खाणं टाळावं. फळं साल काढून खावीत. संसर्ग पसरू नये यासाठी गर्दीपासून दूर राहावं. जेवण एकट्यानं करावं, दुसऱ्यांसोबत ते शेअर करू नये.
बाजारातील तयार अन्नपदार्थांचं सेवन टाळावं. मांस, मासे, मटणासारखे पचायला जड पदार्थ खाणं टाळावं. मद्यपान, धूम्रपान यापासून दूर राहावं. हे उपाय केल्यास टायफॉइडचा रुग्ण लवकर बरा होऊ शकतो. तसंच टायफॉइडचा धोकादेखील टळतो.
हेही वाचा: