चेहऱ्यावरचे काळे डाग घालवण्याचे घरगुती उपाय!

मनुष्याला लाभलेला ‘चेहरा’ ही त्याला मिळालेली एक प्रकारची नैसर्गिक देणगीच आहे कारण हास्य, दु:ख, लोभ, पाप, पुण्य, क्रोध यांसारख्या नानाविध भावना या चेहऱ्यावरूनच कळतात. चेहऱ्यावर आपले व्यक्तिमत्व अवलंबून आहे आणि चेहऱ्यावरूनच बऱ्याच वेळा माणसांची पारख केली जाते. एवढे महत्व असणाऱ्या चेहऱ्यावर पिंपल्स, सुरकुत्या आणि सर्वात महत्वाचे म्हणजे काळे डाग (Black Spots) जर दिसू लागले तर त्या व्यक्तीला अवघडल्यासारखे वाटते त्याचबरोबर त्यांचा आत्मविश्वासही कमी व्हायला लागतो.

मग अशावेळी अनेकजण बाजारात उपलब्ध असणाऱ्या विविध क्रीम्स, पार्लर किंवा इतर औषधांचा सर्रास वापर सुरु करतात पण या सगळ्या प्रयोगात शरीराला किंवा चेहऱ्याला त्यांचे साईड इफेक्ट्स भोगायला लागतात. चेहऱ्यावर काळे डाग येण्याची प्रमुख कारणे म्हणजे अनुवंशिक, सतत सूर्यकिरणांच्या संपर्कात येणे, हार्मोनल बदल, वाढते वय, प्रदूषण ही आहेत असे अनेक तज्ज्ञांनी अभ्यासातून सिद्ध केले आहे. तुम्ही सुद्धा चेहऱ्यावर येणाऱ्या काळ्या डागांनी (black spots) त्रस्त आहात का? मग खाली दिलेले काही सोपे आणि नैसर्गिक घरगुती उपाय तुम्हाला चेहऱ्यावरील काळे डाग घालवण्यास नक्कीच मदत करतील.

काकडीचा रस आणि गुलाब पाणी: त्वचेच्या सौंदर्यासाठी आणि चेहर्‍याला लावण्याकरिता विविध प्रकारचे लेप सुचविले आहेत परंतु त्यामध्ये सर्वाधिक उपयुक्त ठरणारा लेप म्हणजे काकडीचा रस आणि गुलाब पाणी यांच्या मिश्रणातून तयार होणारा लेप. हे मिश्रण दिवसातून दोन वेळा चेहर्‍यावर लावावे, नंतर चेहरा कोमट पाण्याने धुवावा. काकडी आणि गुलाब पाण्याचा उपयोग चेहर्‍याच्या त्वचेला थंडाई पोचविण्याससुद्धा कारणीभूत ठरतात.

हळदीची पेस्ट : हळद ही फार पूर्वीपासून त्वचेचे सौंदर्य वाढविण्यासाठी वापरली जात आहे. हळद आणि चंदन यांच्या वापराबाबत तर लोकांमध्ये खूप उत्सुकता आहे. थोडीशी हळद घेऊन तिच्यामध्ये थोडासा लिंबाचा रस टाकावा आणि कच्चे दूध मिसळून त्यांची पेस्ट तयार करावी. हा थर चेहर्‍यावर वाळेपर्यंत ठेवावा आणि नंतर थंड पाण्याने धुवावा.

मध आणि लिंबाचा रस: मध आणि लिंबाचा रस यांचे मिश्रण चेहऱ्यावरील काळ्या डागांसाठी उपयुक्त ठरते. दोन चमचे मधामध्ये थोडासा लिंबाचा रस मिसळून चेहर्‍यावरच्या गडद काळ्या डागांवर लावावा. काही मिनिटे हा थर चेहर्‍यावर ठेवावा आणि चेहरा थंड पाण्याने धुवावा. चेहरा तजेलदार होतो.

चंदनाचा लेप: चेहऱ्यावरील उजळपणा टिकवून ठेवण्यासाठी चंदनाचा उपयोग आयुर्वेदातसुद्धा केला जातो. चंदन गुलाबपाणी अथवा दुधात मिक्स करून याचा लेप चेहऱ्यावरील काळ्या डागांवर लावल्यास ते डाग लवकर निघून जाण्यास मदत होते व त्वचेला उजाळाही येतो.

लिंबाचा रस: फक्त लिंबाचा रस सुद्धा अनेकदा यासाठी वापरला जातो. लिंबाच्या रसात व्हिटॅमिन ‘सी’ चे मुबलक प्रमाण असते जे चेहऱ्यावरील काळे डाग कमी करण्यास मदत करतात. विशेषत: आपल्या शरीराचे घोटे, कोपरे आणि गुडघे अधिक काळे पडत असतात. त्यांना लिंबाचा रस चोळावा आणि पंधरा मिनिटानंतर ते भाग पाण्याने धुवून टाकावे. तिथली त्वचा सामान्य होते. लिंबाच्या रसाने चेहर्‍याची कातडी निरोगी होते. ज्या व्यक्तींची त्वचा अधिक सेन्सिटिव्ह असेल त्यानी लिंबाच्या रसात मध नक्की मिसळावे. (black spots)

बटाटा: बटाटा हा तर आपल्या सगळ्यांच्या घरात उपलब्ध असतोच. बटाट्यामध्ये नैसर्गिक ब्लिचिंगचे घटक उत्तम प्रमाणात उपलब्ध असतात जे चेहऱ्यावरील काळ्या डागांवर परिणामकारक ठरतात. बटाटा कापून तो थोड्या वेळासाठी पाण्यात भिजवून ठेवा आणि मग चेहऱ्यावर जिथे काळे डाग असतील तिथे हा बटाटा चोळा. याच्या नियमित वापराने होणारे परिणाम तुम्हाला नक्कीच दिसून येईल.

ताक: ताक जसे पोटाला थंडावा देण्यासाठी वापरले जाते तसेच ते चेहऱ्यावरील काळ्या डागांसाठीदेखील उपयुक्त आहे. चेहऱ्यावरील काळ्या डागांवर ताक लावून साधारण १५-२० मिनीटांनी तुमचा चेहरा धुवा.

कोरफड: अनेक सोंदर्यप्रसाधनांमध्ये कोरफडीचा वापर हा केलाच जातो तो तिच्यामध्ये असणाऱ्या अनेक औषधी गुणांमुळे. कोरफडीचा गर अथवा रस चेहऱ्यावरील काळ्या डागांवर लावा आणि नंतर थोड्या वेळाने तुमचा चेहरा कोमट पाण्याने धुवा. दिवसातून दोनवेळा नियमितपणे हा उपाय केल्यास चेहऱ्यावरील काळे डाग नक्कीच कमी होतील.

हेही वाचा :


भूल भुलैया 2 चे टायटल ट्रॅक आउट..!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *