‘नेट’ची तयारी कशी कराल?

विद्यापीठ अनुदान आयोगाने (U.G.C.) २७ मार्च २०२४ रोजी एक सूचना जारी केली असून, त्यात असे नमूद केले आहे की, पीएचडी करण्यासाठी नेट परीक्षा अनिवार्य आहे.

डॉ. सय्यद इलियास, सहयोगी प्राध्यापक

विद्यापीठ अनुदान आयोगाने (U.G.C.) २७ मार्च २०२४ रोजी एक सूचना जारी केली असून, त्यात असे नमूद केले आहे की, पीएचडी करण्यासाठी नेट परीक्षा अनिवार्य आहे. या सूचनेनुसार जून २०२४ पासून नेट पास होणाऱ्यांसाठी तीन वेगवेगळ्या श्रेणी तयार केल्या गेल्या आहेत. पहिल्या श्रेणीत नेट उत्तीर्ण होणारे विद्यार्थी पी.एच.डी. प्रवेशास पात्र होतील, तसेच त्यांना जेआरएफ मिळेल.

त्याबरोबरच सहायक प्राध्यापक म्हणून त्यांची नियुक्ती करण्यासही ते पात्र ठरतील. दुसऱ्या विभागात पीएचडी प्रवेशासाठी पात्र होतील, परंतु जेआरएफ मिळणार नाही व सहायक प्राध्यापक पदासाठी पात्र असतील. तिसऱ्या विभागात फक्त पीएचडी प्रवेशासाठी पात्र असतील, तसेच त्यांना जेआरएफ मिळणार नाही व सहायक प्राध्यापक पदासाठीही पात्र नसतील. त्यामुळेच आपण आता यूजीसी सीएसआयआर नेट परीक्षेची तयारी कशी असावी? याचा आढावा आपण या लेखात घेणार आहोत.

यूजीसी सीएसआयआर नेट परीक्षेला विज्ञान आणि तंत्रज्ञान क्षेत्रात ज्युनिअर रिसर्च फेलो किंवा सहायक प्राध्यापक होण्याची इच्छा असलेले उमेदवार या परीक्षेला बसू शकतात. ही परीक्षा पाच विषयांसाठी घेतली जाते – रसायनशास्त्र, पृथ्वीविज्ञान, भौतिक विज्ञान, जीवनविज्ञान आणि गणितविज्ञान. प्रश्नपत्रिका प्रत्येक विषयासाठी तीन भागांमध्ये विभागली आहे- भाग A, भाग B आणि भाग C. भाग A हा सामान्य योग्यतेचा असतो व तो सर्वांसाठी समान असतो. भाग B आणि C मध्ये उमेदवारांच्या संबंधित विषयाचे प्रश्न असतात.

महत्त्वाच्या टीप्स

परीक्षा पॅटर्न आणि मार्किंग स्कीम
अभ्यासक्रमाची तपशीलवार माहिती घेतल्यानंतर, उमेदवाराने परीक्षा पॅटर्न आणि मार्किंग स्कीम समजून घेतली पाहिजे. विविध विषयांसाठी असलेल्या एकूण प्रश्नांची संख्या, जास्तीत जास्त प्रश्नांची संख्या आणि विभागीय गुण वेगवेगळे आहेत. वेगवेगळ्या विषयांसाठी निगेटिव्ह मार्किंगही असते. हे सर्व नीट समजून घ्या.

अभ्यासाची सर्वोत्तम साधने
पुस्तके उमेदवारांना त्यांच्या विषयांचे मूलभूत ज्ञान देतात. योग्य पुस्तके आणि नोट्सशिवाय महत्त्वाच्या संकल्पना शिकता येत नाहीत व स्पष्टही होत नाहीत. त्यामुळे पुस्तकांची निवड काळजीपूर्वक करा. पुस्तके वाचताना स्वतःसाठी नोट्स काढा.

कट ऑफ जाणून घ्या
नेटसाठी कट ऑफ जाणून घेणे आवश्यक मानले जाते. उमेदवारांनी त्यांच्या संबंधित श्रेणीतील कट ऑफ, तसेच सर्वाधिक कट ऑफ असलेली श्रेणी जरूर पाहावी. निवडीची जास्तीत जास्त शक्यता तसेच, आपल्या पसंतीची संस्था मिळावी यासाठी कट ऑफचा अंदाज घेणे आवश्‍यक ठरते.

अभ्यासाची योजना
निर्धारित वेळेत अभ्यासक्रम समजून घेण्यासाठी योग्य योजना आखणे आवश्यक आहे. सीएसआयआर नेटच्या तयारीसाठी योग्य वेळापत्रकाशिवाय अभ्यास करणे शक्य होणार नाही. तयारी दरम्यान सातत्य राखणेही महत्वाचे आहे; अन्यथा, उमेदवार महत्त्वाच्या संकल्पना चुकू शकतात.

‘लाइफ सायन्स’ची तयारी
पेशींची रचना, अनुवांशिकता आणि उत्क्रांती यांसह जीवशास्त्राची मूलभूत तत्त्वे समजून घ्या. संकल्पना समजून घेण्यासाठी आकृती आणि विविध मार्गदर्शकांची मदत घ्या. उमेदवाराने अभ्यासाची आवृत्ती करण्यासाठी, नवीन शिकण्यासाठी आणि जुने पेपर सोडवण्यासाठी वेळ दिला पाहिजे. लाइफ सायन्ससाठी दिवसातून किमान ९ ते १० तासांचा वेळ देऊन अभ्यास करावा लागेल.

हेही वाचा :

ग्राहकांना मोठा धक्का! आईस्क्रीम, केक आणि चॉकलेट होणार महाग

सूर्यग्रहण, अमावस्या आणि नरेंद्र मोदींची सभा; उद्धव ठाकरेंची भाजपवर जोरदार टीका

सांगली ठाकरेंच्या शिवसेनेकडेच; काँग्रेसच्या स्थानिक नेत्यांनी तातडीने बोलावली बैठक