संतापजनक ! इचलकरंजीमधील धनगर समाजाची ८ कुटुंबे ५० वर्षांपासून बहिष्कृत!

रुकडीपाठोपाठच चंदूर (ता. हातकणंगले) येथील धनगर समाजातील काही कुटुंबांना जात पंचायतीने बहिष्कृत (exclusion) केल्याचा आणखी एक प्रकार उघडकीस आला आहे. सुमारे 50 वर्षांपासून आठ कुटुंबांना बहिष्काराच्या यातना सहन कराव्या लागत आहेत. यासंबंधी दोन वर्षांपूर्वी शिवाजीनगर पोलिसांना तक्रार दिली होती. तत्कालीन पोलिस अधिकार्‍यांनी दोन्ही गटांना बोलावून घेऊन तोडगा काढला. त्यावेळी सर्वांना सामावून घेऊन येथून पुढे सर्व व्यवहार करण्याचे आश्‍वासन दिले.

भोपाल शिंगाडी मंगसुळे यांना समाजाने कुटुंबीयांसह गेली 50 वर्षे बहिष्कृत (exclusion) केले आहे. त्यांना समाजाच्या वतीने कोणत्याही धार्मिक, सामाजिक आणि कौटुंबिक कार्यक्रमांना बोलावले जात नाही. कुटुंबात कुणाचा मृत्यू झाला तर समाजातील इतर सदस्य अंत्यविधीसाठीही येत नाहीत. त्यामुळे त्यांना त्यांच्यासारख्याच बहिष्कृत 16 कुटुंबांवर अवलंबून राहावे लागते. चंदूरमध्ये धनगर समाजाची लोकसंख्या सुमारे चार हजार आहे.

गावातील प्रमुख पदांवर समाजातील लोक आहेत. परंतु, सर्वजण अजूनही जात पंचायतीला मानतात. गावामध्येच नातेसंबंध असल्यामुळे चांगल्या-वाईट घटनांना एकमेकांकडे जावे लागते. परंतु, बहिष्कृत समाजातील घरात गेले तरी त्याला दंड भरावा लागतो. तो जात पंचायतीच्या समोर ठरतो. एखाद्याने दंड देण्यास नकार दिला तर त्याच्यावरही बहिष्काराचे हत्यार उपसले जाते. राजर्षी छत्रपती शाहू महाराजांच्या विचाराने वाटचाल करणारा पुरोगामी जिल्हा म्हणून कोल्हापूर जिल्ह्याची महाराष्ट्रामध्ये वेगळी ओळख आहे. परंतु, धनगर समाजाच्या या जात पंचायतीचा पगडा 21 व्या शतकातही गोरगरीब बांधवांच्या मानगुटीवरून उतरायला तयार नाही. सध्या जात पंचायत विरोधातील कायदा अस्तित्वात असतानाही त्याची भीती अजून तरी अशा समाजातील स्वयंभू कारभार्‍यांना वाटत नाही. जिल्ह्यामध्ये विविध गावांत अनेक समाजामध्ये अजूनही जात पंचायतीच्या नावाखाली कारभारी सर्वसामान्यांना दंड करून त्रास देत आहेत.

सख्ख्या चुलत भावाच्या अंत्यसंस्कारापासून वंचित
भोपाल मंगसुळे यांनी सांगितले की, काही वर्षांपूर्वी माझ्या भावाचे निधन झाले. भोपाल यांना समाजाने बहिष्कृत केले होते. परंतु, त्यांचे सख्खे चुलत भाऊ दुसर्‍या गटामध्ये होते. परंतु, आपणासही बहिष्कृत करतील या भीतीने तो भावाच्या अंत्ययात्रेलाही आला नाही.

दवाखान्याच्या उद्घाटनाला आलेल्यांना दंड
समाजातील एकजण बी.एच.एम.एस., एम.डी. आहेत. त्यांचे कुटुंब यापूर्वीच बहिष्कृत केले होते. त्यांनी गावात दवाखाना सुरू केला. परंतु, डॉक्टरांचेच कुुटुंब बहिष्कृत असल्याने त्यांच्या कार्यक्रमाला गेलेल्या इतर सर्वांना जात पंचायतीने दंड ठोठावला.

मुलीच्या लग्‍नातही खोडा घालण्याचा प्रकार
एका समाज बांधवाने सांगितले की, माझ्या मुलीचे लग्‍न ठरले होते. परंतु, पाहुण्यांना बहिष्कार घातल्याचे सांगितले. त्यामुळे बहिष्कार काढून बोलणी करायला या, असे संबंधित गावातील समाजाने सांगितले. वधुपित्याने समाजात व्यथा मांडली; मग त्याला दंड करून परवानगी देण्यात आली.

125 जण जगतात भीतीच्या छायेखाली
पुरोगामी कोल्हापूर जिल्ह्यातील दुसरी घटना

हेही वाचा :


इचलकरंजीत सोसाट्याचा वारा, गारांचा पाऊस

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *