गणरायाला भावपूर्ण निरोप; वीस तास मिरवणूक

वरूणराजाचीही हजेरी, लेसरसह डॉल्बी, पारंपारिक वाद्यांचा समावेश, मिरवणूकीत महिलांचा सहभाग, पर्यावरणपूरक विसर्जनास प्रतिसाद
इचलकरंजी: ता. १० डॉल्बीचा (Dolby) दणदणाट, झांजपथक व बँजोचा निनाद, मनोहरी लेसर शो आणि ढोल-ताशांच्या कडकडाटावर ठेका धरत आणि गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या च्या जयघोषात आपल्या लाडक्या गणरायाला निरोप दिला. मिरवणुकीत कार्यकत्यांचा उत्साह, भव्यदिव्य गणेश मूर्ती आणि आकर्षक आरास अन् या सर्वाला वरुणाराजाची साथ मिळाली. किरकोळ वादावादी वगळता शांततापूर्ण तब्बल २० ते २१ तास मिरवणूक चालली.(Dolby)
दरम्यान, अखेरच्या दिवशी महापालिका प्रशासनाने तयार केलेल्या कृत्रिम जलकुंड, जलाशयासह शहापूर खण येथे ५२९ गणेशमूर्तीचे विसर्जन करण्यात आले. त्यामध्ये शहापूर खण येथे ३६२ तर जलकुंड व जलाशयात १६७ मूर्ती विसर्जित केल्या. तर उर्वरीत गणेशमूर्तीचे पंचगंगेत विसर्जन करण्यात आले. परंपरेनुसार मानाच्या श्री बिरदेव गणेशोत्सव मंडळाच्या पालखीचे मान्यवरांच्या हस्ते पुजन करून शिवतीर्थ येथून विसर्जन मिरवणूकीचा प्रारंभ करण्यात आला. खासदार धैर्यशील माने, आमदार प्रकाश आवाडे, जिल्हाधिकारी राहुल रेखावार, पोलिस अधिक्षक शैलेश बलकवडे, माजी आमदार सुरेश हाळवणकर, अप्पर पोलिस अधिक्षक सौ. जयश्री गायकवाड, महापालिका आयुक्त सुधाकर देशमुख, पोलिस उपअधिक्षक बाबुराव महामुनी, प्रांताधिकारी डॉ. विकास खरात, माजी नगराध्यक्षा सौ. अलका स्वामी, माजी उपनगराध्यक्ष तानाजी पोवार आदी मान्यवरांच्या हस्ते श्री गणेशाचे पूजन करण्यात आले.
यावेळी बंदोबस्तासाठी तैनात असलेल्या पोलिसांनीसुध्दा गाण्यावर ठेका धरत नृत्याचा आनंद लुटला तर महिला होमगार्डनी झिम्मा फुगडीचा फेर धरत मिरवणुकीत सहभाग घेतला. यावेळी पोलिस निरीक्षक महादेव वाघमोडे, राजू ताशिलदार, अप्पर तहसिलदार शरद पाटील, शहर वाहतूक शाखेचे सपोनि विकास अडसूळ, रविंद्र माने, राहुल खंजिरे, शशांक बावचकर, रवी रजपूते, पुंडलिकराव जाधव, शेखर शहा, शशिकला बोहरा आदी मान्यवर उपस्थित होते.
मिरवणूक मार्गात विविध संस्था, पक्षांकडून स्वागत
कॉ. मलाबादे चौक ते नदीवेस नाका या मार्गावर इचलकरंजी शहर काँग्रेस कमिटी, मुस्लिम बेल्फअर असोशिएशन, मारवाडी युवा मंच, शिवसेना, महाराष्ट्र नवनिर्माण सेना, श्री साईप्रसाद ग्रुप, क्रेडाई ब बिल्डर्स असोसिएशन, भारतीय जनता पाटील, अखिल भारतीय होलार समाज, माऊली फौंडेशन, हिंदू एकता, स्वाभिमानी शेतकरी संघटना, शिवगर्जना सेवाभावी संस्था, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, शिवसेना शिंदे गट, इचलकरंजी फेस्टिवल व जय शिवराय मंडळ असे विविध स्वागत कक्ष उभारण्यात आले होते. या व्यासपीठाच्या माध्यमांतून विसर्जन मिरवणूकीतील सहभागी सार्वजनिक गणेश मंडळाचे मानाची पान-सुपारी, श्रीफळ देऊन स्वागत करण्यात येत होते. तर मैत्री परिवार तसेच विविध सामाजिक संघटनेच्यावतीने भक्तांच्यासाठी पिण्याचा पाण्याचा स्टॉल लावण्यात आला होता. कार्यकत्यांसह गणेशभक्त नाराज राज्य शासनाने गणेशोत्सवात अखेरच्या पाच दिवसांसाठी रात्री बारा वाजेपर्यंत वाद्ये आणि साऊंड सिस्टिम सुरु ठेवण्यास परवानगी दिली होती.. त्यानुसार रात्री बारानंतर पोलिस प्रशासनाकडून सर्व मंडळांसह स्वागत कक्षांना सूचना देत वाद्ये, साऊंड सिस्टिम बंद करावयास लावले. त्यामुळे अनेक मंडळांनी लाखो रुपये खर्चून आणलेले लेसर शो, डॉल्बी (Dolby) साऊंड हे केवळ अत्यल्प काळच दिसले व वाजले. रात्री बारानंतर सर्व काही बंद करावे लागल्याने आकर्षक मिरवणूक ही केवळ जयघोष करत पुढे न्यावी लागली. परिणामी कार्यकत्यांसह मिरवणूक पाहण्यासाठी आलेल्या गणेशभक्तांमध्ये नाराजीचा सूर दिसून आला.
नागरिकांना अल्पोपहार वाटप
आमदार प्रकाश आवाडे यांच्या मार्गदर्शनाखाली इचलकरंजी फेस्टिवलच्या माध्यमातून राजवाडा चौक येथे विसर्जन मिरवणूक पाहण्यासाठी येणाऱ्या गणेश भक्तांसाठी पोहे वाटप करण्यात आले. अत्यंत नेटक्या नियोजन पध्दतीने राबविण्यात आलेल्या या उपक्रमाचा सुमारे ५० हजार गणेशभक्तांनी लाभ घेतला. त्याचबरोबर बंदोबस्तासाठी तैनात पोलिस कर्मचाऱ्यांसाठी सकाळी भोजनाची व्यवस्था करुन देण्यात आली होती.
Smart News:-