इचलकरंजीत जैन समाजाचा सोमवारी भव्य मोर्चा

जैन धर्मियांचे (jainism) पवित्र सिध्दक्षेत्र श्री सम्मेद शिखरजी पर्यटन स्थळ म्हणून झारखंड सरकारने जाहीर केले आहे. जैन धर्मियांचे पवित्र सिध्दक्षेत्र अपवित्र व प्रदूषित करणारा हा झारखंड सरकारचा निर्णय केवळ तीर्थक्षेत्रच नव्हे तर भारतीय संस्कृती अपवित्र करणारा आहे. तो निर्णय तातडीने मागे घेऊन शिखरजीचे पावित्र अबाधित ठेवावे या मागणीसाठी समस्त इचलकरंजी व परिसरातील सर्व गावातील जैन समाजाच्या वतीने येत्या सोमवारी भव्य मोर्चा काढण्यात येणार आहे. सकाळी अकरा वाजता म. गांधी पुतळा येथून या मोर्चाची सुरुवात होणार असून प्रांत कार्यालय पर्यंत हा मोर्चा जाणार आहे. या ठिकाणी प्रांताधिकारी डॉ विकास खरात यांना निवेदन देऊन जैन समाजाच्या भावना व्यक्त केल्या जाणार आहेत. भारत सरकार व झारखंड सरकार कडे हे सिद्धक्षेत्र अहिंसा जैन तिर्थक्षेत्र जाहीर करावे अशी मागणी करण्यात येणार आहे.

भारतीय राज्यघटनेतील तरतुदीप्रमाणे पवित्र तीर्थक्षेत्रांचे रक्षण व संवर्धन करण्याचा अधिकार अल्पसंख्यांकाचा आहे. सदर तीर्थक्षेत्रे असुरक्षित व अपवित्र होतील असे कोणतेही कृत्य अथवा व्यवस्था त्या ठिकाणी करता येत नाही. देशभरातून लाखो जैन (jainism) भाविक श्रध्देने सम्मेद शिखरजी दर्शन करतात. पर्यटन स्थळ झाल्यास त्यांच्या उपासनेत व्यत्यय येणार आहे. त्यामुळे झारखंड सरकारने घेतलेला निर्णय हा जैन धर्मिक व अहिंसाप्रेमी लोकांच्या भावना दुखावणारा आहे. जैन समाज अहिंसक मार्गाने निषेध करणार आहे.

सरकारच्या या निर्णयाच्या निषेधार्थ जैन बांधव सर्व उद्योग व्यवसाय बंद ठेवून इचलकरंजी शहर व परिसरातील जैन समाज मोर्चा काढणार आहे. याबाबत नियोजन करण्यासाठी समस्त जैन समाज इचलकरंजी ची बैठक झाली. या बैठकीस भ.महावीर जयंती मंडळाचे अध्यक्ष चंद्रकांत पाटील, गुंडाप्पाण्णा रोजे कुंतीलाल पाटणी, बि.एम पाटील, रविंद्र पाटील अजित खंजीरे, बाळासाहेब चौगुले अभिजित पटवा, भूषण शहा यांच्या सह सर्व मंदीर कमिटी अध्यक्ष, वीर सेवा दल, वीर महिला मंडळ विविध युवक मंडळाचे सदस्य मोठ्या संख्येने उपस्थिती होते. या मोर्चामध्ये सर्व पंथीय जैन बांधवांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन संयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.

हेही वाचा :