माणुसकी फौंडेशनच्या लम्पी जनावरांवर उपचार छावणीचा समारोप

इचलकरंजी/प्रतिनिधी – लम्पीग्रस्त जनावरांना (Animal)उपचार करणार्‍या माणुसकी फौंडेशच्या वतीने इचलकरंजीत महाराष्ट्रातील पहिल्या छावणीचा समारोप करण्यात आला. तब्बल 108 दिवस चाललेल्या या उपचार केंद्रात 100 पेक्षा अधिक लम्पीग्रस्त भटक्या जनावरांवर योग्य ते उपचार करण्यासह सेवा करण्यात आली. त्याचबरोबर या उपचार केंद्रातील काही जनावरे गरीब व गरजू शेतकर्‍यांना सांभाळण्यासाठी विनामूल्य देण्यात आली.

मध्यंतरीच्या काळात देशभरात लम्पी(Animal) आजाराने थैमान घातले होते. गोवंशातील जनावरांना या आजाराने ग्रासले होते. इचलकरंजी शहरातील अनेक भटक्या जनावरांना लम्पीची लागण झाली होती. अशावेळी माणुसकी फौंडेशनने पुढाकार घेत राजीव गांधी सांस्कृतिक भवन येथे लम्पीग्रस्त जनावरांवर मोफत औषधोपचाराचे राज्यातील पहिले केंद्र सुरु केले. हे उपचार केंद्र सलग 108 दिवस सुरु होते. जवळपास 100 पेक्षा अधिक जनावरांची औषधोपचारासह सेवा करण्यात आली. आमदार प्रकाश आवाडे व महापालिका आयुक्त सुधाकर देशमुख यांची प्रमुख उपस्थितीत या उपचार केंद्राचा समारोप करण्यात आला.

यावेळी आयुक्त सुधाकर देशमुख यांनी, माणुसकी फौंडेशनचे काम अभिमानास्पद असून पुढील काळात समाज हिताची सेवा अशीच घडत राहो, अशा सदिच्छा दिल्या. याप्रसंगी आरोग्याधिकारी डॉ सुनिलदत्त संगेवार, स्वप्नील आवाडे, श्रीरंग खवरे, अभिजित पटवा, माणुसकी फौंडेशनचे अध्यक्ष रवि जावळे व सर्व सदस्य उपस्थित होते.

माणुसकी फौंडेशनच्या वतीने लम्पी जनावरांवर उपचार करणारी छावणी बंद केली आहे. मात्र भविष्यात भटक्या व मूक प्राण्यांची सेवा व उपचार करण्यासाठी महापालिकेने जागा उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी फौंडेशनच्या वतीने रवि जावळे यंनी केली. त्यावर आयुक्त सुधाकर देशमुख यांनी सकारात्मक प्रतिसाद देत निश्‍चितपणे मार्ग काढून जागा देऊ असे सांगितले.

हेही वाचा :