इचलकरंजी महापालिकेचा मुहूर्त लांबणीवर! मंत्री एकनाथ शिंदे यांच्या बंडाचा परिणाम

महाविकास आघाडी सरकारमधील नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांचा बंडाचा अप्रत्यक्ष परिणाम इचलकरंजी शहरातील ( politics) राजकारणावर होणार आहे. याचा पहिला फटका महापालिकेला बसणार असून जून अखेरचा मुहूर्त काही लांबणीवर पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे शहरात सुरू असलेल्या महापालिकेच्या लगीनघाईला तूर्तास ब-ेक लागणार आहे.

इचलकरंजीला महापालिकेचा दर्जा मिळावा यासाठी गेल्या काही वर्षांपासून प्रयत्न सुरू होते. खासदार धैर्यशील माने यांच्या पुढाकाराने महापालिकेसाठी प्रयत्न सुरू झाले. नगरविकास विभागाने अधिसूचना काढून हरकतीही मागवल्या. प्राप्‍त हरकती नुकत्याच जिल्हाधिकार्‍यांच्या अभिप्रायासह आयुक्‍तांना सादर झाल्या आहेत.

दरम्यानच्या काळात राज्यसभा, विधान परिषद निवडणुकीमुळे पुढील प्रक्रिया लांबणीवर पडली. या निवडणुकीनंतर म्हणजेच 30 जून किंवा 1 जुलै कृषिदिनाचे औचित्य साधत इचलकरंजी महापालिकेचीही घोषणा करण्याची लगबग सुरू होती. परंतु मंगळवारी नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी बंड केले. शिवसेनेचे 35 आमदार घेऊन त्यांनी पक्षनेतृत्वाला आव्हान दिल्याच्या वृत्ताने खळबळ उडाली. याचा अप्रत्यक्ष परिणाम इचलकरंजी महापालिकेच्या प्रक्रियेवर झाला आहे. राज्याच्या ( politics) राजकाराणात आता पुढे काय होईल, कोणते सरकार येणार यावरच महापालिकेसंदर्भात पुढील दिशा ठरणार आहे.

कबनूरच्याही हालचाली मंदावल्या
कबनूरला नगरपरिषद होण्यासाठी कृती समिती दोन वर्षांपासून प्रयत्नशील आहे. मात्र स्थानिक राजकारणातून विषय मागे पडला. कृती समितीचे अध्यक्ष दत्ता शिंदे यांनी सातत्याने हा विषय लावून धरला. जिल्हाधिकारी कार्यालय, मंत्रालय पातळीवर पाठपुरावा सुरू ठेवला. जिल्हाधिकार्‍यांनी नुकतेच नव्याने ठराव सादर करण्याचे पत्र ग्रामपंचायतीला पाठवले आहे. यावरून गावात परस्पर विरोधी चर्चा सुरू झाली. दरम्यान, नगरपरिषद समर्थक आणि विरोधकांनी खासदार धैर्यशील माने यांची भेट घेतली. यावेळी खा. माने यांनी दोन्ही बाजूंचा विचार करून गावाच्या हिताचा निर्णय घ्या, अशी सूचना केली होती, मात्र ऐनवेळी राज्यात राजकीय भूकंप झाल्याने नगरपरिषदेचा प्रश्‍न लांबणीवर पडला आहे.

हेही वाचा :


मुंबई : रंगलेल्या डावात फडणवीसांच्या हाती ‘एक्का’

Leave a Reply

Your email address will not be published.