इचलकरंजी : सुसाट वाहने उठताहेत जीवावर!

सुसाट वाहनांचा प्रश्न जटिल होत असताना आता गंभीरता वाढली आहे. घरासमोर खेळणाऱ्या एका सहा वर्षीय बालकाचा अशाच धूमस्टाईल बाईकस्वाराने जीव घेतला. दिवस मावळला की शहराच्या मुख्य मार्गावरुन सुरू होणारा या वाहनांचा सुसाटपणा गल्लीबोळातही डोकेदुखी ठरत आहे. त्यामुळे बेदकार दुचाकीस्वारांनी डोके पुन्हा वर काढले असून सुसाट बाईक चालवण्याची क्रेझ शहरात वाढत आहे. त्यामुळे वेळीच कारवाई (action) करण्याची मागणी होत आहे.
शहरात तरुण मोटारसायकल चालवताना वेगाची मर्यादा झुगारत आहेत. मोटारसायकलवर ट्रिपल सीट वाहतूक करत वाहतुकीचे नियम गुंडाळत आहेत. बेदकार वाहने चालवणे किंवा ट्रिपल सीट घेऊन दुचाकी चालवणे हा गुन्हा असला तरी नियमांची पायमल्ली होतच आहे. शहरातील प्रमुख मार्ग, अंतर्गत रस्ते दर्जेदार झाले आहेत. अशा ठिकाणी सुसाट वेगाने दुचाकी चालवणारे तरुण दिसून येतात. मुख्य चौक, प्रमुख रस्ते याला त्रासले आहेत. पोलिसांची नजर चुकवून बेफामपणे वाहने चालवत असल्याचे शहरात पाहायला मिळत आहे.
मुख्य मार्गासह गल्लीबोळात असे प्रकार वाढत आहेत. यामुळे शहरातील एका सहा वर्षीय बालकाला जीव गमवावा लागला. सायलेंसर यंत्रणेत बदल करून फटाक्यासारख्या आवाजामुळे पादचाऱ्यांना त्रास सहन करावा लागत आहे. राजवाडा चौक ते कोल्हापूर नाका या वर्दळीच्या मार्गावर अशा कर्णकर्कश वाहनांना नागरिक त्रासले आहेत. अशांना वाहतूक शाखेने नियमांचे डोस पाजून कारवाईत सातत्य ठेवण्याची मागणी नागरिक करत आहेत. ड्राइव्हच्या भीतीने नियम तोडून वाहन चालवणाऱ्यांमध्ये आपोआप धास्ती निर्माण होते. बेफाम बाईकस्वारांवरही अशा पद्धतीचा ड्राइव्ह (action) राबवणे गरजेचे आहे.
अल्पवयीन बाईकस्वार
अलीकडे धूमस्टाईल आणि स्पोर्टस्बाईक स्वारांमध्ये अल्पवयीन मुले दिसू लागली आहेत. अशांवर काहीवेळा अल्पवयीनमुळे कारवाई केली जात नाही. मात्र सहा वर्षांच्या बालकाला एका अल्पवयीन बाईकस्वारानेच ठोकरले. त्यामुळे ही गंभीरता लक्षात घेऊन कारवाईची गरज आहे.
हेही वाचा :