आजपासून इलेक्ट्रिक बाइक्सच्या किंमती वाढल्या; मोदी सरकारच्या या निर्णयाचा फटका

सध्या इलेक्ट्रिक बाईक्सची लोकप्रियता वाढली आहे. पेट्रोलच्या तुलनेत अगदी कमी खर्च, आणि पर्यावरणाचाही फायदा यामुळे बरेच लोक ईव्हीचा पर्याय स्वीकारत आहेत. तुम्हीदेखील जर इलेक्ट्रिक बाईक घेण्याचा विचार करत असाल, तर तुमच्यासाठी एक महत्त्वाची बातमी आहे. सरकारच्या एका निर्णयामुळे आता इलेक्ट्रिक दुचाकी घेणं महागणार आहे.
केंद्र सरकारच्या अवजड उद्योग मंत्रालयाने इलेक्ट्रिक वाहनांवर दिल्या जाणाऱ्या अनुदानात घट केली आहे. त्यामुळे आता इलेक्ट्रिक वाहनावर केवळ १० हजार रुपये प्रति किलोवॅट एवढे अनुदान मिळणार आहे. यापूर्वी ही रक्कम १५ हजार रुपये होती. फेम-२ साठी असलेल्या दुचाकींबाबत हा निर्णय घेण्यात आला आहे. १९ मे रोजी याबाबत अधिसूचना जारी करण्यात आली होती.
२५-३५ हजारांचा तोटा
या निर्णयाचा थेट परिणाम इलेक्ट्रिक दुचाकींच्या किंमतीवर होणार आहे. अनुदानात कपात केल्यामुळे दुचाकी तयार करणाऱ्या कंपन्या वाहनांचे फीचर्स आणि बॅटरी पॅकमध्ये कपात करण्याचा निर्णय घेऊ शकतात. यामुळे वाहनांच्या किंमती सुमारे २५ ते ३५ हजारांनी वाढू शकतात.