Kolhapur News : शिरोलीत चोरीच्या घटना थांबता थांबेना; पंचगंगा नदीवरील केबल चोरट्यांनी नेली चोरून

शिरोली : कृषी पाणी पुरवठा संस्थेच्या कृषी पंपांच्या मोटरच्या केबल, कॉन्ट्रॅक्ट पट्ट्या आदी तांब्याच्या साहित्यांच्या चोरीच्या(Thieves) घटनात वाढ झाली आहे. रात्रीच्या वेळी हे साहित्य चोरट्याने चोरून नेऊन धुमाकूळ घातला आहे. याबाबत शिरोली एमआयडीसी पोलीसांकडून फिर्याद घेण्यास आणि तपासाबाबत होणाऱ्या दिरंगाईमुळे कृषी सहकारी संस्थांचे आर्थिक नुकसान होत असून, शेतकऱ्यांना पाणी पुरवठा करण्यासही अडचणी येत असल्याने पीकांचेही नुकसान होत आहे.

पुलाची शिरोलीतील शिरोली विकास संस्थेच्या पेटीचा पत्रा उचकटून चोरट्यांनी दोन वेळा चोरी केली आहे. यामुळे संस्थेचे ५० हजारांच्या वर नुकसान झाले आहे. याबाबत संस्थेच्या वतीने चोरीची फिर्याद देण्यासाठी संस्थेचा कर्मचारी शिरोली पोलीस ठाण्यात गेला असता पोलिसांनी टाळाटाळ केली. पण शेवटी चेअरमन सतीश पाटील यांनी चोरीची फिर्याद दाखल करून घेण्यास पोलिसांना भाग पाडले. अद्यापही याप्रकरणाचा तपास झालेला नाही. त्यामुळे चोरट्याने दुसऱ्यांदा त्याच संस्थेच्या इलेक्ट्रिक साहित्याची पुन्हा चोरी(Thieves) झाली आहे.

पंचगंगा नदीवरील या ठिकाणी वारंवार केबल चोरीची व कॉपर पट्ट्यांच्या चोरीचे घटना वारंवार घडत आहेत. या ठिकाणी चोरटे बिनधास्तपणे चोरी करून शेतकऱ्यांचे नुकसान करत आहेत. याच प्रकारे पांडुरंग पाणीपुरवठा संस्थेच्या केबलच्या तारा व केबलही चोरट्याने चोरून नेल्या आहेत. या संस्थेनेही चोरीची फिर्याद शिरोली एमआयडीसी पोलीस ठाण्यात दिली आहे. पुन्हा सुमारे पन्नास फूट लांबीची केबल चोरट्याने तोडून चोरून नेली आहे.

यापूर्वी याच ठिकाणाहून वीज वितरण कंपनीचे ट्रान्सफार्मरचा विद्युत पुरवठा बंद करून ट्रान्सफार्मर खाली उतरून त्यातले ऑईल काढून सुमारे दीड लाख रुपयाची कॉपर वायर चोरून नेण्याचा प्रकार घडला होता. याबाबत वीज वितरण कंपनीनेही शिरोली एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती. पण त्याचा अद्याप तपास लागलेला नसल्याचे समजते.

सध्या तुटलेल्या खोडवा ऊसात आणि नवीन लागणीसाठी पाणीपुरवठा सुरू आहे. चार दिवस रात्रपाळी चार दिवस दिवसपाळी अशामुळे शेतकरी पाण्याचा मेळ घालत मेटाकुटीला आला आहे. पुराच्या पाण्यामुळे मागील वर्षी येथील ऊस शेतीचे मोठ्या प्रमाणातील नुकसान, परत केबल चोरीचे प्रकार घडल्यामुळे पाण्याच्या पुढील पाळीचे नियोजन चुकत आहे.

हेही वाचा :

सरकारी कर्मचाऱ्यांना मोठा धक्का, आठवा वेतन आयोग लांबणीवर?

Jio चा हा रिचार्ज प्लॅन झाला स्वस्त! आता कमी किंमतीत मिळणार जुने फायदे

अरे बाप रे! मुलाने अजगराला उचललं की खेळण्यातली बाहुली, धाडसी मुलाचा व्हिडिओ तुफान व्हायरल