कोल्हापूर : शाहूवाडीतील रेठरे येथे ‘भानमती’च्या प्रकाराने खळबळ!

शाहूवाडी तालुक्यातील वारणा रेठरे येथे संशयास्पद करणी, भानामतीचा धक्कादायक तितकाच खेदजनक प्रकार गुरुवारी (दि.२) सकाळी उजेडात आला आहे. यामुळे गावात अनामिक भीती सदृश्य वातावरण पसरल्याचे चित्र आहे. स्थानिक विकास सेवा संस्थेच्या चालू निवडणुकीतील संभाव्य जय-पराजयाच्या समीकरणातून हा खळबळजनक प्रकार घडल्याचा संशय व्यक्त होत आहे. संस्थापक (founder) आणि सत्ताधारी पॅनलप्रमुख जालिंदर पाटील यांच्या घरानजीक हा करणी सदृश ‘उतारा’ आढळून आला आहे. रेठरे पंचक्रोशीसह बघताबघता अख्ख्या तालुकाभर भानामतीच्या प्रकाराची चर्चा वाऱ्याच्या वेगाने पसरली. यामुळे घटनास्थळाकडे बघ्यांची रीघ लागली होती.
दरम्यान, रेठरे (ता. शाहूवाडी) येथील विकास सेवा (founder) संस्थेची १३ जागांसाठीची निवडणूक नियोजित कार्यक्रमानुसार शनिवारी (दि. ४ ) होणार आहे. यासाठी सत्ताधारी गटाकडून नवलाई-भराडी-विठ्ठलाई-विठ्ठलाई ग्रामविकास पॅनल तसेच विरोधी गटाकडून नवलाई-भराडी-विठ्ठलाई परिवर्तन पॅनल निवडणूक रिंगणात उतरले आहे. प्रचाराच्या माध्यमातून राजकीय शहकाटशहाने येथे जोर धरला आहे. दादासाहेब पाटील (रेठरेकर) यांच्या माध्यमातून १९६० साली स्थापन झालेल्या या संस्थेवर दादासाहेब यांच्यानंतर त्यांचे चिरंजीव जालिंदर पाटील यांची एकहाती सत्ता आहे. या त्यांच्या वर्चस्वाला जोरदार शह देण्याचा प्रयत्न म्हणून गावातील सर्व विरोधक एकवटले आहेत.
दरम्यान, भानामतीच्या प्रकाराबाबत घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार, रेठरे वारणा येथील माजी पंचायत समिती सदस्य जालिंदर पाटील यांच्या घराच्या परिसरातील तुळशीजवळ ठेवलेली कृत्रिम प्राण्याची प्रतिकृती, यामध्ये फळभाजी वर्गीय ‘कवाळ’ त्याला लाकडी पाय, पाठीवर रूतविलेली एक लाकडी खिट्टी, तसेच या प्रतिकृतीच्या गळ्यात बांगड्या अडकवून तांदूळ, काळे तीळ, हळदीकुंकू, अगरबत्ती आदी साहित्य आढळून आले.
दरम्यान, आज सकाळी रेठरेकर यांच्या भावाची पत्नी या तुळशीला पाणी घालत असताना हा भयावह प्रकार त्यांच्या निदर्शनास आला. एक प्रकारे व्यवस्थेलाच आव्हान देण्याच्या या प्रकाराकडे निदान अंधश्रद्धा निर्मूलन समिती तरी लक्ष देईल का? अशी अगतिकताही स्थानिक नागरिक व्यक्त करताना दिसत आहेत.
एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप
दरम्यान, निवडणूक प्रचाराच्या निमित्ताने बुधवारी रात्री उशिरापर्यंत दोन्ही गटांकडून मतदारांच्या गाठीभेटी घेणे सुरू असल्याने मध्यरात्रीपर्यंत तरी हा प्रकार घडला नव्हता, असे स्थानिकांनी सांगितले. तर सोसायटीच्या निवडणुकीत विजयाची खात्री नसणाऱ्या विरोधी गटाच्या लोकांनी सभासद मतदारांमध्ये भय निर्माण करण्याच्या इराद्याने हा भ्याड प्रकार केल्याचा आरोप सत्ताधारी पॅनल प्रमुख जालिंदर पाटील (रेठरेकर) यांनी केला आहे. दुसऱ्या बाजूला विरोधकांनी हा आरोप फेटाळून लावत याआधीच्या घडलेल्या गावाच्या बदनामीकारक उदाहरणांदाखल विचार करता आताच्या या निंद्य प्रकारामागेही ‘सहानुभूतीतून सत्तेची हाव’ हीच मानसिकता कारणीभूत आहे, याची गावातील सुज्ञ लोकांना खात्री आहे, असा प्रत्यारोप नामोल्लेख टाळून विरोधी पॅनेलच्या लोकांनी सत्ताधारी जालिंदर पाटील यांच्यावर केला आहे.
सर्रास निवडणुकांना अंधश्रद्धेचा आधार
स्थानिक सेवा संस्थेची (founder) निवडणूक तोंडावर असताना घडलेल्या या प्रकाराबाबत स्थानिक नागरिकांमध्ये उलटसुलट चर्चा सुरू आहे. लोकशाही मार्गाने, भयमुक्त वातावरणात निवडणूक पार पडावी. यासाठी निवडणूक अधिनियम तसेच भानामती सारखे भयानक प्रकार समाजातून हद्दपार व्हावेत, यासाठी अंधश्रद्धा निर्मुलनाचा कायदा अस्तित्वात आहे, तरीही शाहूवाडी तालुक्यातील डोंगरीच नव्हे, तर सर्रास निवडणुका या ‘अंधश्रद्धे’चा आधार घेऊनच पार पाडतात, ही वस्तुस्थिती आहे. यासाठी खास अशी नियंत्रण व्यवस्था निर्माण करण्याची गरज व्यक्त होत आहे.
हेही वाचा :