कुरुंदवाड : पंचगंगेच्या काठी माशांचा खच मासे नेण्यासाठी नागरिकांची गर्दी!

शिरढोण पुलाजवळ पंचगंगा नदीपात्रत रसायनयुक्त प्रदूषित पाणी (chemically polluted water) आल्याने माशांना ऑक्सिजन मिळत नाही, त्यामुळे मासे तडफडून नदीकडेला तरंगत आहेत. काही मृत झाले आहेत. मासे निर्जीव झाल्याने सहजरित्या हाती लागत असल्याने मासे घेण्यासाठी नागरिकांनी प्रचंड गर्दी केली आहे. दरम्यान, काही मासेमार करणारे या संधीचा फायदा घेऊन तडफडणारे व मृत मासे विक्रीसाठी नेत आहेत. प्रदूषण नियंत्रण मंडळाने याकडे गंभीरपूर्वक लक्ष देण्याची गरज निर्माण झाली आहे.
महापुरानंतर सतत 5 ते 6 वेळा पंचगंगा नदीला प्रदूषित पाणी (chemically polluted water) आल्याने शेतीबरोबरच पिण्याच्या पाण्याबाबत ग्रामीण भागातील जनजीवन विस्कळीत झाले आहे. सध्या शिरढोण पूल ते तेरवाड बंधाऱ्यापर्यंत जलपर्णीने नदीपात्र व्यापले आहे. दोन महिन्यापासून इचलकरंजीला जाणारी कृष्णा पाणी योजनेच्या पाईपलाईनचे काम नदीपात्रात सुरू आहे. यासाठी बांध घातल्याने पाणी काही प्रमाणात तुंबून राहिले आहे. इचलकरंजी येथील काळ्या-ओढ्याचे रासायनिक पाणी नदीत येऊन मिळाले आहे. सध्या धरणातून पाणी सोडल्याने काळ्या-ओढ्याचे पाणी थेट शिरढोण-पुलाजवळ येऊन तुंबले आहे.
प्रदूषित पाण्यामुळे माशांना ऑक्सिजन मिळत नसल्याने मासे तडफडू लागले आहेत. नदीपात्राच्या कडेला येऊन पाण्यात उड्या मारत आहेत. काही मासे मृत होऊन नदीकडेला पडले आहेत. पुलावरून ये-जा करणार्या नागरिकांनी सहजरित्या मासे हाताला लागत असल्याने, नदीकाठी गर्दी केली आहे. ही संधी मासेमारी करणाऱ्यांनाही न सोडता, पोत्याने मृत व तडफडणारी मासे विक्रीला नेण्यासाठी गर्दी केली आहे.
शिरढोण पूल ते अब्दुललाट पाणवठयापर्यंतच्या पंचगंगेवर आधारित गावच्या पिण्याच्या पाण्याचाही प्रश्न प्रदूषित पाण्यामुळे निर्माण झाला आहे. प्रदूषण नियंत्रण मंडळाला पंचगंगा शुद्ध करण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिलेल्या आदेशाला त्यांनी केराची टोपली दाखवल्याचे स्पष्ट झाले आहे.
प्रदूषण करणाऱ्या घटकांवर कारवाई करा : वैभव उगळे
पंचगंगा प्रदूषित करून शिरोळ तालुक्याला विषारी पाणी पाजून विविध आजाराला निमंत्रण द्यायला लावणाऱ्या आणि शेती सर्वसामान्य नागरिकांच्या जीविताशी खेळ केला जात आहे. पंचगंगा प्रदूषित करणाऱ्या घटकांवर कारवाई करण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेऊन अहवाल सादर करणार आहे. पाणी प्रदूषित करणाऱ्या घटकांवर कारवाई करा, अशी मागणी शिवसेना तालुकाप्रमुख वैभव उगळे यांनी केला आहे.
हेही वाचा :