सकाळच्या बुगडीकट्टी- गडहिंग्लज बसला “नको रे बाबा…..!

गडहिंग्लज (प्रतिनिधी): बुगडीकट्टीहुन गडहिंग्लजला सकाळी ८.५० वाजता जाणाऱ्या एसटी (st)बसला विद्यार्थ्यांची मोठ्या प्रमाणात गर्दी होत असल्याने इतर प्रवाशांची गोची होत आहे. वयोवृद्ध प्रवाशांना तर तातडीची कामे असतानादेखील गर्दीमुळे चेंगराचेंगरी होत असल्याने ही बस चुकवून घेऊन उशिराच्या बसने गडहिंग्लज गाठावे लागते. याकडे तेरणी ग्रामपंचायतीने लेखी निवेदनाद्वारे गडहिंग्लज आगाराचे लक्ष वेधून देखील दुर्लक्ष होत असल्याने तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.

या गर्दीचा विचार करता गडहिंग्लज आगाराने सकाळी ८ वाजता हलकर्णीपर्यंत येणारी एसटी (st)बस तेरणीपर्यंत सोडावी अशी जोरदार मागणी येथील विद्यार्थी व प्रवासी वर्गातून होत आहे. सकाळी ८.५० वाजता परत जाणारी बुगडीकट्टी- गडहिंग्लज ही बस महाविद्यालयीन विद्यार्थी, इतर शालेय विद्यार्थी, विविध आस्थापनात काम करणारे कर्मचारी वर्ग व इतर प्रवाशांसाठी सोयीचे आहे. मात्र ही बस बुगडीकट्टी वरूनच प्रवाशांनी भरून येते. तेरणीतही ह्या बसला प्रचंड गर्दी होते.

मुळातच बुगडीकट्टीवरून ही बस भरून येत असल्याने तेरणीत बसमध्ये चढणाऱ्या सर्व प्रवाशांना उभे राहूनच प्रवास करावा लागतो. परिणामी काही विद्यार्थी व कामानिमित्त गडहिंग्लजला जाणाऱ्या प्रवाशांना गर्दीमुळे चेंगराचेंगरी होत असल्याने नाईलाजास्तव बस चुकवून घ्यावी लागते. गर्दीमुळे त्यांच्या पुढील कामाचा खोळंबा होत आहे. सकाळी आठ वाजता हलकर्णीपर्यंत येणारी गडहिंग्लज- हलकर्णी ही बस तेरणीपर्यंत सोडण्यात यावी या मागणीचे निवेदन तेरणी ग्रामपंचायतीमार्फत दिनांक २४ ऑगस्ट रोजी गडहिंग्लज आगाराला देण्यात आले आहे. मात्र आगाराने याकडे दुर्लक्ष केल्याने नाराजी व्यक्त होत आहे.

सध्या बुगडीकट्टी, तेरणी या गावांमध्ये महाविद्यालयीन विद्यार्थ्यांची संख्या वाढली आहे. त्यामुळे पासधारक विद्यार्थ्यांची संख्या खूप आहे. महाविद्यालयीन शिक्षणासाठी त्यांना गडहिंग्लज शिवाय पर्याय नाही. मात्र एसटी बसला होत असणाऱ्या गर्दीमुळे विद्यार्थिनींचे मोठे हाल होत आहेत. बुगडीकट्टी वरून तेरणीत आल्यानंतर विद्यार्थ्यांना जागा पकडण्यासाठी मोठी चढाओढ करावी लागते. प्रसंगी जीव धोक्यात घालून खिडकीतून विद्यार्थी बसमध्ये घुसत असल्याचे चित्र आहे. प्रचंड गर्दीमुळे विद्यार्थिनींना जागाच मिळत नसल्याने गडहिंग्लजपर्यंत तासभर थांबूनच दररोजचा प्रवास करावा लागत आहे.

वयोवृद्ध प्रवासी वर्ग व आजारी व्यक्तींना तर या गर्दीमुळे त्रास सहन करावा लागत आहे. हलकर्णी बस तेरणी पर्यंत सोडा दोन वर्षापूर्वी गडहिंग्लज आगाराने सकाळी ८.५० च्या एसटी बसला होणारी गर्दी लक्षात घेऊन सकाळी ८.४० वाजता तेरणी- गडहिंग्लज ही बस सुरू केली होती. त्यामुळे महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना ही बस सोयीस्कर झाली होती. परिणामी ८. ५० च्या बसला गर्दी कमी होत होती. त्यामुळे विद्यार्थी वगळता इतर प्रवाशांना ही बस सोयीची होती. मात्र सध्या ही बस बंद असल्याने गैरसोय होत आहे. आगाराने ही बस सुरू करणे शक्य नसल्यास हलकर्णी पर्यंत येणारी सकाळी आठची बस तेरणी पर्यंत तरी सोडावी अशी मागणी ग्रामपंचायतीने गडहिंग्लज आगाराकडे लेखी निवेदनाद्वारे केली आहे. आगाराने तातडीने प्रवाशांचीही समस्या सोडवावी अशी मागणी होत आहे.

हेही वाचा :