‘तर’ मासे प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या कार्यालयात टाकणार : राजू शेट्टी

जिल्ह्यातील तिन्ही मंत्री विकासकामाच्या गप्पा मारण्यापलीकडे काहीच करत नाहीत. पंचगंगा प्रदूषण मुक्तीसाठी पालकमंत्र्यांनी एकतरी बैठक घेतली का? असा सवाल माजी खासदार राजू शेट्टी यांनी केला. आरोग्य राज्यमंत्र्यांना शिरोळ तालुक्यातून पंचगंगा नदी गेली आहे हे माहीत नसावे अशी खरमरीत टीका करत, दोन दिवसात पंचगंगा प्रदूषण (polluted water) करणाऱ्या घटकावर कारवाई न केल्यास डंपरमध्ये मृत मासे भरून प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या कार्यालयात ओतू, असा गर्भित इशारा त्‍यांनी दिला.

कुरुंदवाड दरम्यानच्या शिरढोण पुलाजवळ पंचगंगा नदीचे प्रदूषित पाणी (polluted water) आल्याने मासे मृत्युमुखी पडून परिसरात दुर्गंधी सुटली आहे. नदी परिसराची पाहणी करण्यासाठी माजी खासदार शेट्टी आले असता, दै. पुढारीच्या प्रतिनिधींशी बोलताना त्यांनी हा इशारा दिला आहे. ते म्हणाले की प्रदूषित पाण्याने निर्माण झालेल्या कावीळ आजारामुळे 7 वर्षांपूर्वी शिरोळ तालुक्यासह इंचलकरंजी शहरातील एकूण सुमारे 84 जणांना जीव गमवावा लागला होता. प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अधिकारी माणसे मरण्याची वाट पाहत आहे का? अशी खंत त्‍यांनी व्यक्‍त केली.

नदीच्या प्रदूषणाला कारणीभूत असणाऱ्या घटकांवर कारवाई करा यासाठी अधिकाऱ्यांना मृत माशांचा हार देण्यापासून ते अधिकाऱ्यांना डांबून ठेवण्यापर्यंत अनेक आंदोलने केली. पर्यावरण मंत्र्यांपर्यंत निवेदने दिली.

आजपर्यंत शासनाने कोणतीच महत्वाची भूमिका बजावली नाही. उलट शेतकऱ्यांवरच गुन्हे दाखल करून अन्याय केला आहे. पंचगंगा नदी गटारगंगा होण्यात कुचकामी अधिकारीच जबाबदार असल्याचा आरोप त्‍यांनी केला.

ते म्हणाले, कोल्हापूर महानगरपालिका, इचलकरंजी नगरपरिषद आणि अन्य औद्योगिक वसाहतींचे सांडपाणी सोडण्यासाठी प्रदूषण नियंत्रण मंडळाचे क्लिअरिंग सर्टिफिकेट घेणे गरजेचे आहे. त्या शिवाय प्रदूषण नियंत्रण मंडळ परवानगी देऊ शकत नाही. तरीही प्रक्रियेविना बेकायदेशीररित्या पंचगंगा नदीत पाणी सोडले जाते. नागरिकांच्या आरोग्‍याशी आणि जीवनाशी हा एकप्रकारे खेळ केला जातो. याला प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अधीकारी जबाबदार आहेत. केवळ जुजबी कारवाईचा फार्स केला जातो असेही ते म्हणाले.

हेही वाचा :


मोबाईल चोरणाऱ्या दोघांना अटक

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *