कोल्हापुरात तब्बल २८ तास विसर्जन मिरवणुक

Ganesh Visarjan

साऊंड सिस्टीम बंद केल्याने वादावादी : कार्यकर्ते संतप्त

कोल्हापूर: कोल्हापुरातील ऐतिहासिक सार्वजनिक गणेश विसर्जन(Ganesh Visarjan) मिरवणुकीत कोणताही अनुचित प्रकार घडू नये. यासाठी शुक्रवारी सकाळी ७ वाजल्यापासून ४ हजार पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला होते. रात्री १२ वाजता साऊंड सिस्टीम बंद केल्यामुळे कार्यकर्ते व पोलीस अधिकाऱ्यांमध्ये वादावादी झाली. मंडळांनी रस्त्यावरच ठाण मांडल्यामुळे तणाव निर्माण झाला होता. मात्र शुक्रवार शेवटचा गणपती पापाची तिकटी येथे आल्यावर भरपावसात पोलिसांनी गाण्याच्या तालावर ठेका धरला. त्यानंतर त्या मंडळाची महाआरती झाल्यानंतर बंदोबस्त विसर्जित झाला. तब्बल २८ तास पोलिसांचा खडा पहारा होता.

सकाळी ७ वाजल्यापासून मिरजकर तिकटी, बिनखांबी गणेश मंदिर, पापाची तिकटी, गंगावेस चौक या प्रमुख मार्गावरच मिरवणुकीचा ताण होता. मिरवणूक रेंगाळण्याचा हा प्रमुख मार्ग असल्याने पोलिसांनी या अडीच किलोमीटरच्या अंतरावर विशेष लक्ष केंद्रित केले होते. पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे, अप्पर पोलीस अधीक्षक तिरुपती काकडे यांनी बंदोबस्ताचे नियोजन केले होते.

शुक्रवारी दुपारी मिरजकर तिकटी ते बिनखांबी गणेश मंदिर रोडवर असलेल्या नगिवली व पाटाकडील तालीम मंडळ यांच्या पुढे जाण्यावरून थोडा वाद निर्माण झाला होता. तेव्हा अप्पर पोलीस अधीक्षक तिरुपती काकडे व पोलिसांनी दोन्ही मंडळाच्या कार्यकत्यांमध्ये समन्वय करून तोडगा काढून, नगीवली मंडळास पहिल्यांदा मिरवणूक मार्गात संधी दिली(Ganesh Visarjan). त्यानंतर पाटाकडील तालीम, बालगोपाल तालीम, यांच्या गणेश मूर्ती व साउंड सिस्टीम  सोडण्यात आल्या. मिरवणूक सरकती ठेवण्यासाठी पोलिसांना काही ठिकाणी कठोर भूमिका घ्यावी लागली. रात्री आठ वाजता चार प्रमुख मोठी मंडळे महाद्वार रोडवर आली होती. डीजेच्या तालावर नृत्य करताना मिरवणूक पुढे सरकली नाही, हे पोलिसांनी त्यांच्या लक्षात आणून दिले. यावेळी पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे, निरीक्षक तानाजी सावंत यांनी कार्यकर्त्यांना समजावून सांगितल्यानंतर मिरवणुकीला प्रारंभ केला. भरपावसात डीजेच्या ठेक्यावर पोलिसांनी मनमुराद नृत्य करून ३० तास केलेल्या ड्युटीचा ताण हलका केला. रात्री १२ वाजता साऊंड सिस्टीम पोलिसांनी बंद केल्यानंतर कार्यकर्ते भडकले. आमच्यावर हवे ते गुन्हे दाखल करा, पण डीजे लावण्यास हरकत घेऊ नका, असा पवित्रा काही मंडळांनी घेतला. ट्रॅक्टर भररस्त्यात सोडून कार्यकर्ते निवांत फिरू लागले. पोलिसांनी बळाचा वापर करून त्यांना मार्गस्थ केले.

Smart News:-