कोल्हापूर जिल्ह्याला जोरदार पावसाने झोडपले..!

आठ दिवसांपासून असह्य करणारा उकाडा आणि त्यामुळे अंगाची होणारी ल्हाई यामुळे हैराण लोकांना काल वळवाच्या पावसाने दिलासा दिला. दिवसभराच्या कडाक्याच्या उन्हानंतर सायंकाळी सोसाट्याच्या वाऱ्यासह आलेल्या धुवाँधार पावसाने (rain) शहर व परिसराला झोडपून काढले. दरम्यान, भेंडवडेत वीज कोसळून घराचे छप्पर उडाले. अनेक ठिकाणी झाडे उन्मळून पडली. पत्रे उडाल्याने प्रापंचिक साहित्याचे नुकसान झाले.
अचानक आलेल्या या पावसाने (rain) सुटीची पर्वणी साधत बाहेर पडलेल्यांची चांगलीच भंबेरी उडाली. या पावसाने सकल भागात पाणी साचले तर गटारी तुडुंब भरून वाहू लागल्या. पावसापासून बचावासाठी लोकांनी रस्त्यावरच मिळेल तिथे आधार शोधला. सुमारे अर्धा तास पडलेल्या या पावसाने पाणी पाणी करून सोडले.
राज्यात आठ दिवसांत उष्णतेची लाट येण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली होती. कोल्हापुरात तर गेल्या चार-पाच दिवसांपासून पारा ३९ अंशांवर पोहोचला होता. सायंकाळनंतर मात्र सुरुवातीला सोसाट्याचा वारा सुरू झाला आणि त्यानंतर लगेच धुवाँधार पावसाला सुरुवात झाली.
भेंडवडेत वीज कोसळली
खोची ः परिसरात काल सायंकाळी वादळी वाऱ्यासह पावसाने दीड ते दोन तास झोडपून काढले. भेंडवडे येथील रंगराव नरूटे यांच्या घरावर वीज पडल्याने छताचे नुकसान झाले आहे. चौगोंडा शिवगौंडा पाटील (भेंडवडे) शेतातून घरी परतत असताना घरावरील पत्रा उडून डोक्यात पडल्याने जखमी झाले. त्यांच्यावर पेठवडगाव येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. सोसाट्याच्या वाऱ्यामुळे अनेक ठिकाणी झाडे उन्मळून पडली. वाऱ्यामुळे अनेकांच्या घरांचे पत्रे उडून गेल्याने प्रापंचिक साहित्याबरोबर धान्य भिजले. विद्युत वाहिन्या तुटल्यामुळे वीजपुरवठा खंडित झाला आहे. खोची ते नरंदे मार्गावर झाड पडल्यामुळे वाहतूक ठप्प होती. रात्री उशिरापर्यंत वीज कर्मचाऱ्यांच्या मार्फत विद्युत वाहिन्या तारा जोडण्याचे काम सुरू होते.
हेही वाचा :