कोल्हापूरच्या ‘त्या’ खुनाचा लागला छडा; तिघा मित्रांनीच केला घात!

प्रेम प्रकरणात अडसर ठरणाऱ्या मित्राचा चाकूने सपासप वार करून अमानुष खून केल्याची घटना साळोखेनगर येथील कोपार्डेकर हायस्कूलसमोरील माळरानावर घडली. (kolhapur crime news) संकेत सर्जेराव पाटील (वय 19, रा. वाल्मिकीनगर, साळोखेनगर) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. रविवारी पहाटे हा प्रकार उघडकीला आला. एलसीबी व जुना राजवाडा पोलिसांच्या संयुक्त पथकाने म्होरक्यासह तिघांना बेड्या ठोकल्या आहेत.

म्होरक्या शिवराज ऊर्फ दाद्या चंद्रकांत बंडगर (वय 22), प्रतीक विजय कांबळे (19), रोहित नामदेव कांबळे (19, रा. वाल्मिकीनगर, साळोखेनगर) अशी मारेकऱ्यांची नावे आहेत. खुनानंतर अवघ्या काही तासांत संशयितांना जेरबंद करण्यात आले. चौकशीत त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली आहे, असे अप्पर पोलिस अधीक्षक तिरुपती काकडे, उपअधीक्षक मंगेश चव्हाण यांनी सांगितले.(kolhapur crime news)

ओळखीचा फायदा घेत मित्राच्या प्रेयसीचा पाठलाग व सतत छेडछाड करून दोघांच्या प्रेमात अडसर आणणाऱ्या संकेतला खल्लास करून त्याला कायमचा संपविण्याचा कट म्होरक्या बंडगरने रचला आणि रविवारी मध्यरात्री घरातून बोलावून घेऊन संकेतचा काटा काढल्याचे चौकशीत निष्पन्न झाले आहे, असे स्थानिक गुन्हे अन्वेषणचे निरीक्षक संजय गोर्ले यांनी सायंकाळी पत्रकारांना सांगितले.

पोलिस सूत्रांकडून सांगण्यात आले की, मूळचा बस्तवडे (ता. कागल) येथील संकेत पाटील हा साळोखेनगर वाल्मिकीनगर येथील चुलते दिलीप पाटील यांच्याकडे लहानपणापासून वास्तव्यास आहे. उद्यमनगर येथील गॅरेजमध्ये मेकॅनिक म्हणून तो कामाला आहे. या परिसरातील शिवराज बंडगर, प्रतीक कांबळे व रोहित कांबळे हे संकेतचे मित्र. चौघेही नेहमी एकमेकांच्या संपर्कात असायचे.

संशयित रोहित कांबळे याचे परिसरातील एका तरुणीशी सूत जुळले होते. त्यांच्यातील प्रेम बहरत होते. दोघांतील प्रेम प्रकरणाची माहिती असतानाही संकेत प्रेयसीचा पाठलाग, वाटेत रोखून बोलण्याचा प्रयत्न करीत होता, असा रोहितला संशय होता. या कारणातून त्यांच्यात दोन महिन्यापूर्वी मतभेदही झाले होते. एकमेकांच्या अंगावर ते धावूनही गेले होते.

…अन्यथा परिणाम भोगावे लागेल : संशयितांची धमकी

म्होरक्या शिवराज बंडगरनेही संकेतला ताकीद देऊन मित्राच्या प्रेम प्रकरणात अडसर ठरू नकोस, असा इशारा दिला होता. त्यानंतरही सतत हे प्रकार घडू लागल्याने तरुणीने प्रतीककडे तक्रार केल्याने तो कमालीचा भडकला होता. त्यातून दोघांनी एकमेकाला खुन्नस देण्याचे सुरू केले होते. आठ-दहा दिवसांपूर्वी तसेच गुरुवारी (दि. 23) त्यांच्यात बैठक होऊन बंडगर, रोहितसह तिघांनी संकेतला हा प्रकार थांबव; अन्यथा त्याचे गंभीर परिणाम भोगावे लागेल, अशी धमकी दिली होती. (kolhapur crime news)

संकेतच्या खुनाचा शिवराजने कट रचला!

प्रेमात अडसर ठरणाऱ्या संकेतचा ‘गेम’ करून त्याला कायमचा संपविण्यासाठी प्रतीकचा बंडगरसह रोहितकडे तगादा सुरू होता. हा वाद विकोपाला गेल्याने मुख्य संशयित शिवराज बंडगरने संकेतच्या खुनाचा कट रचला.

वाद मिटवून चौघांत पार्टी करू… !

शनिवारी सायंकाळी संकेत पाटील कामावरून घरी परतला. चुलते रात्रपाळीसाठी ड्युटीवर, चुलती पंढरीच्या वारीला गेल्याने तो घरात एकटाच होता. रात्री त्याने घरात जेवण घेतले. रात्री उशिरा मित्रांनी त्याच्याशी मोबाईलवरून संपर्क साधला. प्रतीकशी असलेला वाद मिटवून रात्री चौघेही पार्टी करूया, असे त्यास सांगण्यात आले. साळोखेनगर येथील राजे संभाजी प्राथमिक शाळेच्या पिछाडीस माळरानावर येण्यास सांगण्यात आले. त्यानुसार संकेत रात्री उशिरा माळरानावर गेला.

सपासप वार करून शरीराची केली चाळण!

शंभरफुटी अंतरावर दुचाकी पार्किंग करून माळरानावर थांबलेल्या संशयितांजवळ पोहोचला. काही वेळानंतर त्यांच्यात वादावादी झाली. प्रतीक, रोहितसह बंडगरने तरुणाच्या छातीवर, पोटावर तसेच गळ्याजवळ धारदार चाकूने सपासप वार केले. संकेतने प्रतिकाराचाही प्रयत्न केला. मात्र निष्फळ ठरला. शरीरावर झालेल्या वर्मी हल्ल्यामुळे तरुण रक्ताच्या थारोळ्यात कोसळला. तरुण मृत झाल्याची खात्री झाल्यानंतर संशयितांनी पळ काढला. पहाटेपर्यंत मृतदेह माळरानावर पडून होता.

मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात

साळोखेनगरातील निर्जन ठिकाणी तरुणाचा खून झाल्याची बातमी पहाटे वाऱ्यासारखी पसरताच अप्पर पोलिस अधीक्षक तिरुपती काकडे, शहर पोलिस उपअधीक्षक मंगेश चव्हाण, जुना राजवाडा पोलिस ठाण्याचे निरीक्षक दत्तात्रय नाळे, स्थानिक गुन्हे अन्वेषणचे संजय गोर्ले यांच्यासह पोलिसांचे पथक दाखल झाले. घटनास्थळी रक्ताच्या थारोळ्यातील मृतदेह, दोन चप्पल जोड, शर्टाचे तुटलेले बटण, काही अंतरावर दुचाकी आढळून आली.

मोबाईल कॉल डिटेल्स लोकेशनमुळे मारेकऱ्यांचा छडा

वाल्मिकीनगर परिसरातील नागरिकांमुळे मृतदेहाची ओळख पटली. चुलते तसेच नातेवाईकही घटनास्थळी दाखल झाले. मोबाईल कॉल डिटेल्स, लोकेशन, सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे दुपारी संशयितांची नावे निष्पन्न झाली. पोलिस निरीक्षक दत्तात्रय नाळे, उपनिरीक्षक संदीप जाधव यांच्या पथकाने प्रतीक, रोहित कांबळेला तर एलसीबीने बंडगरला जेरबंद केले.

नातेवाईकांचा आक्रोश

संकेत पाटील लहानपणापासून चुलत्याकडे वास्तव्याला असल्याने त्याचे शालेय शिक्षण कोल्हापुरात झाले. दहावीला तो मूळ गावी गेला. त्यानंतर पुन्हा कोल्हापुरात वास्तव्याला आला. त्याचा मोठा भाऊ नौदलात कार्यरत आहे. ऐन उमेदीतील मुलाचा खून झाल्याचे समजताच आई, वडील, चुलत्यांसह नातेवाईकांनी केलेला आक्रोश मन हेलावणारा होता.

हेही वाचा :


पहिल्याच षटकात भुवनेश्वरचा विश्वविक्रम, दिग्गजांना टाकलं मागे…

Leave a Reply

Your email address will not be published.