शिवरायांचा अवमान; कोल्हापूरात संतप्त शिवसैनिकांची पोलिसांत तक्रार

सत्तेत आल्यापासून भाजपच्या नेत्यांकडून छत्रपती शिवाजी महाराजांची तुलना नको त्या राजकीय व्यक्तींबरोबर करण्याचे प्रकार घडत आहेत. (kolhapur news) शिवप्रेमींतून त्याचे तीव्र पडसाद उमटत असतानाही राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल आक्षेपार्ह विधान केल्याने सर्वत्र ‘कोश्यारी हटाव’चे संतप्त पडसाद उमटत आहेत. त्यातच आता भाजपचे मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी प्रतापगड येथील शिवप्रतापदिन सोहळ्यात छत्रपती शिवरायांच्या आग्रा सुटकेची तुलना थेट मुख्यमंत्री शिंदे यांच्या बंडाशी करून अकलेचे प्रदर्शन केल्याने पुन्हा एकदा वाद सुरू झाला आहे.

राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्या वादग्रस्त विधानाचे तीव्र पडसाद उमटत असतानाच, पुन्हा एकदा भाजपच्या नेत्यांकडून युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान करण्याचा प्रयत्न झाला. (kolhapur news) प्रतापगडावरील शिवप्रतापदिनी झालेल्या कार्यक्रमात पर्यटनमंत्री मंगलप्रभात लोढा यांनी छत्रपती शिवरायांच्या आग्रा सुटकेची तुलना थेट मुख्यमंत्री शिंदे यांच्या बंडाशी केल्याने, शिवप्रेमींतून संतापाची लाट उसळली आहे. यासंदर्भात आक्रमक झालेल्या शिवसेनेकडून शहर पोलीस उपअधीक्षक मंगेश चव्हाण यांच्याकडे राष्ट्रपुरुषांचा अवमान करणे या कलमानुसार लोढा यांच्यावर गुन्हा दाखल करावा, अशी तक्रार लक्ष्मीपुरी पोलीस ठाण्यात निवेदनाद्वारे करण्यात आली.

छत्रपती शिवाजी महाराजांसह येथील महापुरुषांबाबत भाजपच्या नेत्यांकडून वारंवार अवमानास्पद वक्तव्ये करण्यात येत आहेत. तरीसुद्धा भाजपच्या वरिष्ठ नेत्यांकडून गांभीर्याने दखल घेण्यात येत नसल्याचे चित्र आहे. यातून भाजपला कोणता संस्कार समोर ठेवायचा आहे? असा खडा सवाल करत शिवछत्रपतींच्या या अवमानाची परंपरा कायम ठेवणाऱया आणि राजकारणात सुसंस्कृत व संस्कारक्षमपणाचा बुरखा दाखवणाऱया भाजपने महाराष्ट्राच्या या अस्मितेवर घातलेला सततचा घाला, शिवप्रेमी जनता सहन करणार नाही. राज्यपाल कोश्यारींसह मंगलप्रभात लोढा यांना येथे आल्यानंतर कोल्हापूरचा हिसका दाखवल्याशिवाय जनता स्वस्थ बसणार नाही. तसेच संबंधितांना आवर न घातल्यास आणि त्यांच्यावर कायदेशीर कारवाई न केल्यास शिवप्रेमींचा उद्रेक होईल, असा इशाराही जिल्हा शिवसेनेकडून देण्यात आला आहे.

यासंदर्भात या तक्रारीची योग्य दखल घेऊन कारवाई केली जाईल, असे आश्वासन शहर पोलीस उपअधीक्षक मंगेश चव्हाण यांनी दिले. यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख संजय पवार, विजय देवणे, शहरप्रमुख रविकिरण इंगवले, सुनील मोदी, हर्षल सुर्वे, अवधूत साळोखे, संभाजी भोकरे, विशाल देवकुळे, सुरेश पोवार, सरदार पाटील, संजय धुमाळ, किशोर दाभाडे, सुरेश कदम, किशोर माने, रणजित आयरेकर, उदय सुतार, धनाजी यादव, धोंडिबा कानूरकर, अक्षय ओतारी, किरण पडवळ आदी शिवसैनिक उपस्थित होते.

हेही वाचा :